याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला भेट देऊन आले होते. त्यांचा रशियावरचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या लेनिनग्राड येथील एका संस्थेविषयी लिहिले होते. हा मजकूर वाचून धर्मानंदांना सोविएत रशियाला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी जवाहरलालजींना पत्र लिहून त्यांचा सल्ला विचारला. त्यास आलेल्या उत्तरात "आपण रशियाला अवश्य जावे, तेथील अनुभव फार उपयोगी पडतील" असे त्यांनी लिहिले होते. सोबत संपर्क साधण्यासाठी पत्ताही पाठवला. धर्मानंद सोविएत रशियाला गेले. रशियातील 'अॅकॅडमी ऑफ सायन्सेस', लेनीनग्राड विद्यापीठ येथे त्यांनी पाली भाषा शिकवण्याचे काम केले. मॉस्को व इतर शहरांना भेटी दिल्या. एक वर्ष रशियात राहून धर्मानंद भारतात परतले.
१२ मार्च १९३० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात झाली. धर्मानंदांनी सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरवले. शिरोड्याच्या मीठ सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना कैद होऊन लगेच सोडून देण्यात आले. त्यानंतर धर्मानंद शिरोड्याहून विलेपार्ले येथील छावणीत आले. मुंबईतील कामगार वर्गात सत्याग्रह चळवळीचा प्रसार झाला नव्हता. काँग्रेसच्या मुंबई प्रांतिक कमिटीने हे काम धर्मानंदांना दिले. पुढे धर्मानंदांकडे पार्ला छावणीचे प्रमुखपद आले. छावणीवर छापा पडून धर्मानंद स्वयंसेवकांसह पकडले गेले. यात अटक होऊन त्यांना एक वर्षाची सक्तमजुरी व दोनशे रुपये दंड आणि हा दंड न दिल्यास आणखी तीन महीने कैद अशी शिक्षा झाली. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पाठवले गेले. परंतु, उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने काहीच दिवसात धर्मानंदांची सुटका झाली.