महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची वाई येथे ब्राम्हधर्मप्रसार करण्याची इच्छा होती. ४ जुलै १९३३ रोजी वाई येथे प्रार्थनासंघाची स्थापना करण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी नारायणराव चव्हाण व सेक्रेटरीपदी रामराव बाबर यांची निवड करण्यात आली. दर रविवारी चित्तशुद्धीसाठी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करायचे ठरले. अशा मंडळास प्रार्थनासंघ असे नाव देण्यात आले होते. पुढे याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राजा राममोहन रॉय सांवत्सरिक पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक दौरा काढला होता. त्याची सुरुवात त्यांनी वाई येथून करण्याचे ठरवले होते. वाई प्रार्थनासमाजाचे काम पाहावे त्याचबरोबर सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे या उद्देशाने १४ नोव्हेंबर रोजी विठ्ठलराव यांनी भगिनी जनाक्का शिंदे, बी. बी. केसकर, गणपतराव शिंदे यांच्यासमवेत रामराव बाबर यांच्या घरी भेट दिली.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
दोन वर्षांनी १९३५ च्या मे महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे हे भगिनी जनाक्का, यज्ञेश्वरपंत भांडारकर यांच्यासमवेत वाईस आले. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गणपती घाट येथे बुद्धाच्या जीवनावर एक व्याख्यान दिले. या दौऱ्यात प्रार्थनासंघासाठी वाईत जागेची सोय झाली. वाई येथे प्रार्थनासमाजाच्या स्थापनेमुळे विठ्ठलराव खूप समाधानी झाले. वाई व आजूबाजूच्या गावांमध्ये जाताना विठ्ठलरावांच्या बरोबर भगिनी जनाक्का, बाबर कुटुंबीय, नारायणराव चव्हाण कुटुंबीय असत.