Saturday, July 21, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ⑭ काळाची झडप

१५ जून १९६४ रोजी दामोदर कोसंबी यांची वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सी. एस. आय. आर.) 'सन्माननीय वैज्ञानिक' म्हणून पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली. या संस्थेत नियुक्ती होण्यासाठी वैज्ञानिकाने कोणत्यातरी संशोधन संस्थेशी संलग्न असणे आवश्यक होते. कोसंबी पुण्यातील 'महाराष्ट्र विज्ञानवर्धीनी' या संस्थेशी संलग्न झाले. घरापासून जवळच असलेल्या या संस्थेत कोसंबी काम करू शकत होते. परंतु प्रत्यक्ष कामात त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

तिसर्‍या जगातील विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्नांवर १९६६ साली मे महिन्यात दिल्ली येथे एक परिषद भरली होती. कोसंबींनी या परिषदेला हजेरी लावली होती. या परिषदेत 'मागास देशातील प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर कोसंबींनी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या विचारांना अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. कोसंबींचे त्यांच्या आयुष्यातील हे शेवटचे भाषण ठरले.

डी. डी. कोसंबी यांच्यावरील भारत सरकारने
प्रकाशित केलेले पोस्टाचे तिकीट

कोसंबी प्रकृतीच्या बाबतीत अतिशय हळवे होते. २८ जून १९६६ रोजी एका तज्ञ डॉक्टरांकडून त्यांनी आपली संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. त्यानंतर रोजच्याप्रमाणे कोसंबी आपल्या अभ्यासिकेत रात्री उशिरापर्यंत वाचन आणि लेखन करत बसले होते. २९ जूनच्या पहाटे झोपेत असतानाच काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेले. नेहमीची उठण्याची वेळ झाली तरी कोसंबी अजून कसे उठले नाहीत म्हणून सकाळी घरच्यांनी घाबरून दार उघडून पाहिले तर कोसंबी चिरनिद्रावस्थेत होते.

Tuesday, July 03, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ⑬ अधिक जोमाने संशोधनकार्य

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत फेरनेमणूक न झाल्यामुळे कोसंबींनी वाचन, लेखन, संशोधनाच्या कामी स्वतःला झोकून दिले. दख्खनच्या पठारावर त्यांनी मनसोक्त भटकंती केली. ग्रामीण भागांना भेटी देणे, गावकरी मंडळींकडून विविध प्रकारची माहिती गोळा करणे, आडरानात पडलेल्या शिळांवरील चिन्हांचा अभ्यास करणे त्यांच्या नोंदी घेणे अशी त्यांची पुरेपूर अभ्यासपूर्ण भटकंती सतत चालू असे. त्यांच्या या भटकंतीत त्यांच्यासोबत काही विदेशी विद्यार्थी असत. त्यात जर्मनीचा गुंथर सोन्थायमर, अमेरिकन पी. फ्रॅंकलीन त्याचबरोबर जपानसह विविध देशातील तरुण असत. यातील बहुतेक विद्यार्थी हे लंडनमधील प्राच्यविद्या आभास संस्थेशी संबंधित होते. भारतातील संस्थानिक घराण्याशी संबंधित दिव्यभानू सिंह चावडा व विष्णू सिसोदिया हे दोघे त्यांच्यासोबत असायचे. त्यांच्यामुळे कोसंबींना भटकंतीसाठी जीप व मोटार उपलब्ध होत असे. यातील जर्मनीचे गुंथर सोन्थायमर हे पुढे जागतिक किर्तीचे इतिहासकार झाले.

प्रा. डी. डी. कोसंबी

त्यावेळी पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना झाली होती. मेजर जनरल हबीबुल्ला हे तिथले पहिले संचालक होते. ते हौशी प्राच्यविद्या संशोधक असल्याने प्रबोधिनीमध्ये त्यांनी आर्किओलॉजिकल सोसायटीची स्थापना केली होती. कोसंबी तेथील विद्यार्थ्यांना व्याख्याने देत तसेच आसपासच्या प्रदेशाचे ऐतिहसिकदृष्ट्या निरीक्षण करण्यासाठी घेऊन जात. विद्यार्थ्यांकडून त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळत असे. हबीबुल्ला यांनी सांगितलेला त्यातील एक अनुभव खूपच रोचक आहे. कोसंबी यांच्या तर्कानुसार बौद्ध लेणी म्हणजे प्राचीन काळी प्रवासी व्यापार्‍यांसाठीची राहण्याची जागा होती. म्हणजे दिवसभराचा प्रवास संपला की मार्गात कुठेतरी लेणी असायला हवीत. रायगड जिल्ह्यातील जंजीरा येथील खाडीमध्ये प्राचीन काली एक बंदर होते. तिथून कार्ल्याच्या लेण्यापर्यंतचे पायी प्रवासाचे अंतर दोन दिवसांचे होत होते. त्यामुळे मध्ये कुठेतरी लेणी असायला हवीत असा कोसंबींचा कयास होता. कोसंबींची विद्यार्थ्यांसोबत घनदाट जंगलातून शोधमोहीम सुरू झाली. आश्चर्य म्हणजे कोसंबी यांच्या तर्कानुसार साधारण एक दिवसाच्याच पायी प्रवास अंतरावर त्यांना लेणी (करंभळ्याची) सापडली. करंभळ्याच्या लेण्यांत कोसंबींना काही ब्राम्ही शिलालेख आढळले होते. त्या शिलालेखांवर काय लिहिले आहे ते पाहण्यासाठी त्यांनी तो शिलालेख प्लास्टर वर छापून घेतला. हे तंत्र त्यांनी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनाही शिकवले. यापूर्वी कोसंबींनी कार्ल्याच्या लेण्यांचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्या ठिकाणचेही शिलालेख वाचणे त्यांना शक्य झाले होते. मेजर जनरल हबीबुल्ला व प्रबोधिनीचे विद्यार्थी कोसंबींच्या या संशोधन पद्धतीमुळे प्रचंड प्रभावित झाले होते. कोसंबींचे कौतुक करताना एकदा मेजर जनरल हबीबुल्ला म्हणाले, 'गणित वा इतिहासतज्ञ होण्याऐवजी कोसंबी जर लष्करात आले असते तर ते एक उत्तम सेनानी असते'.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More