१५ जून १९६४ रोजी दामोदर कोसंबी यांची वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सी. एस. आय. आर.) 'सन्माननीय वैज्ञानिक' म्हणून पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली. या संस्थेत नियुक्ती होण्यासाठी वैज्ञानिकाने कोणत्यातरी संशोधन संस्थेशी संलग्न असणे आवश्यक होते. कोसंबी पुण्यातील 'महाराष्ट्र विज्ञानवर्धीनी' या संस्थेशी संलग्न झाले. घरापासून जवळच असलेल्या या संस्थेत कोसंबी काम करू शकत होते. परंतु प्रत्यक्ष कामात त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही.
तिसर्या जगातील विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्नांवर १९६६ साली मे महिन्यात दिल्ली येथे एक परिषद भरली होती. कोसंबींनी या परिषदेला हजेरी लावली होती. या परिषदेत 'मागास देशातील प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर कोसंबींनी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या विचारांना अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. कोसंबींचे त्यांच्या आयुष्यातील हे शेवटचे भाषण ठरले.
डी. डी. कोसंबी यांच्यावरील भारत सरकारने प्रकाशित केलेले पोस्टाचे तिकीट |
कोसंबी प्रकृतीच्या बाबतीत अतिशय हळवे होते. २८ जून १९६६ रोजी एका तज्ञ डॉक्टरांकडून त्यांनी आपली संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. त्यानंतर रोजच्याप्रमाणे कोसंबी आपल्या अभ्यासिकेत रात्री उशिरापर्यंत वाचन आणि लेखन करत बसले होते. २९ जूनच्या पहाटे झोपेत असतानाच काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेले. नेहमीची उठण्याची वेळ झाली तरी कोसंबी अजून कसे उठले नाहीत म्हणून सकाळी घरच्यांनी घाबरून दार उघडून पाहिले तर कोसंबी चिरनिद्रावस्थेत होते.
दामोदर कोसंबींच्या मृत्यूनंतरही त्यांचे लेखन-संशोधन प्रसिद्ध होत राहिले. १९६७ साली 'लिव्हिंग प्रीहिस्टरी इन इंडिया' हा त्यांचा लेख 'सायंटिफिक अमेरिकन'च्या अंकात प्रसिद्ध झाला. १९६९ साली भासाच्या 'अविमारक' या काव्याची चिकित्सक आवृत्ती कोसंबी व अमेरिकेतील जे. एल. मॅसन यांच्या संयुक्त नावाने प्रसिद्ध झाली. १९७४ साली त्यांच्यावर तीन गौरवग्रंथ प्रकाशित झाले. १९८१ साली नाणकशास्त्रावरील त्यांच्या एकत्रित लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले.
१९८० साली कोसंबींना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विज्ञान व समाज यातील परस्परसंबंधावर प्रकाश टाकल्याबद्दल मरणोत्तर 'हरिओमआश्रम पारितोषिक' देण्यात आले. २००८ साली भारत सरकारने त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्यांचा सन्मान केला.
कोसंबींनी १९३० ते १९६६ या काळात जवळपास १५० लेख लिहिले. त्यातले ६० गणित व संख्याशास्त्रावरील आहेत. ६० इतिहास व नाणकशस्त्र यावरील आहेत. राहिलेले विज्ञान व समाज या विषयातील आहेत. कोसंबींची एकूण १४ पुस्तके आहेत. त्यातील दोन भारतीय इतिहासावरची आहेत, सात संस्कृत ग्रंथांचे संपादन केलेली आहेत तर पाच लेखसंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध झालेली आहेत. कोसंबींनी त्यांचे सर्व लिखाण इंग्रजीत केलेले आहे.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’