२५ मे १९२८ च्या सायंकाळी श्रीधरपंत टिळक नेहमीप्रमाणे फिरायला जायच्या तयारीत होते. घरातून बाहेर पडण्याआधी त्यांनी आपली पत्नी आणि मुलांना डोळेभरून पाहिले. त्याच दिवशी सकाळी लिहिलेली तीन पत्रे त्यांनी आपल्या सोबत घेतली आणि घराबाहेर पडले. श्रीधरपंतांनी तिन्ही पत्रे त्यांनी टपालपेटीत टाकली आणि थेट भांबुर्डा (आताचे शिवाजीनगर) रेल्वेस्थानकावर गेले. तिथे ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाट पाहू लागले. काही वेळाने रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. गाडी जवळ येताच अंगातील बळ एकवटून त्यांनी रेल्वेसमोर उडी घेतली. क्षणार्धात श्रीधरपंतांनी जगाचा निरोप घेतला. सर्वत्र सन्नाटा पसरला..
![]() |
लोकमान्य श्रीधरपंत टिळक |
लोकमान्य टिळकांच्या धाकट्या मुलाच्या आत्महत्येची बातमी बघता बघता पुण्यात पसरली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. पंचनामा झाला. पार्थिव गायकवाड वाड्यात आणले गेले. श्रीधरपंतांनी स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते तिथे मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता. त्यापाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती. चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते.
लोकमान्य टिळकांना तीन मुलं आणि तीन मुली अशी एकूण सहा अपत्ये होती. त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला. टिळकांनी त्यांच्या तिन्ही मुलींचे हयात असतानाच लग्न लावून दिले. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि सर्वात धाकटे श्रीधरपंत होते.
श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आत्महत्येच्या दिवशी जी तीन पत्रे लिहिली होती त्यातील एका पत्रातून कळते. २५ मे रोजी आत्महत्येपूर्वी त्यांनी एकूण तीन पत्रे लिहिली होती. एक विविधवृत्त मासिकाच्या संपादकांना, दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आणि तिसरे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना. तिन्ही पत्रे पुढीलप्रमाणे..
पत्र क्रमांक १. श्रीधरपंतांनी विविधवृत्त मासिकाच्या संपादकांना लिहिलेलं पत्र
कृ. सा. न. वि. वि.शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविधवृत्तच्या अंकात छापून येईलच. तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच. कारण आपला मजवर फारच लोभ होता. इतका की, त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही. या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही. मित्रमंडळींस नमस्कार कळवावा. कळावे, ही विनंती.आपला,श्री. ब. टिळक
पत्र क्रमांक २. श्रीधरपंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं पत्र
स. न. वि. वि.हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल! आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा.कळावे, लोभ असावा ही विनंती.आपला नम्र,श्रीधर बळवंत टिळक
पत्र क्रमांक ३. श्रीधरपंतांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र
"मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो."
वरीलपैकी पत्र क्रमांक ३ म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये श्रीधरपंतांच्या आत्महत्येचे कारण दडले आहे.
संदर्भ:
- श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख
- श्रीधर टिळक : लोकमान्य टिळकांच्या मुलानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली आत्महत्या का केली होती? (लेख) - नामदेव काटकर