Thursday, July 22, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ⑩

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची वाई येथे ब्राम्हधर्मप्रसार करण्याची इच्छा होती. ४ जुलै १९३३ रोजी वाई येथे प्रार्थनासंघाची स्थापना करण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी नारायणराव चव्हाण व सेक्रेटरीपदी रामराव बाबर यांची निवड करण्यात आली. दर रविवारी चित्तशुद्धीसाठी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करायचे ठरले. अशा मंडळास प्रार्थनासंघ असे नाव देण्यात आले होते. पुढे याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राजा राममोहन रॉय सांवत्स‍रिक पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक दौरा काढला होता. त्याची सुरुवात त्यांनी वाई येथून करण्याचे ठरवले होते. वाई प्रार्थनासमाजाचे काम पाहावे त्याचबरोबर सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे या उद्देशाने १४ नोव्हेंबर रोजी विठ्ठलराव यांनी भगिनी जनाक्का शिंदे, बी. बी. केसकर, गणपतराव शिंदे यांच्यासमवेत रामराव बाबर यांच्या घरी भेट दिली.

भगिनी जनाक्का शिंदे

दोन वर्षांनी १९३५ च्या मे महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे हे भगिनी जनाक्का, यज्ञेश्वरपंत भांडारकर यांच्यासमवेत वाईस आले. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गणपती घाट येथे बुद्धाच्या जीवनावर एक व्याख्यान दिले. या दौऱ्यात प्रार्थनासंघासाठी वाईत जागेची सोय झाली. वाई येथे प्रार्थनासमाजाच्या स्थापनेमुळे विठ्ठलराव खूप समाधानी झाले. वाई व आजूबाजूच्या गावांमध्ये जाताना विठ्ठलरावांच्या बरोबर भगिनी जनाक्का, बाबर कुटुंबीय, नारायणराव चव्हाण कुटुंबीय असत.

साधारणतः १९३८ सालापासून भगिनी जनाक्का यांना मोतिबिंदुचा त्रास सुरू होऊन त्यांना दृष्टीसमस्या सुरू झाल्या. तरीही त्या आपल्या परीने मिशनचे काम करतच राहिल्या.

भगिनी जनाक्का यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपले बंधू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्या कार्यात अत्यंत मोलाची साथ दिली. मिशनच्या कामात त्यांच्यावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत निष्ठापूर्वक व सेवाभावी वृत्तीने पार पाडल्या.

मागे वळून जर आपण भगिनी जनाक्का शिंदे यांचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिला तर लहानपणी माहेरी अगदी लाडात, मुक्त वातावरणात वाढलेल्या, शिकलेल्या जनाक्का यांची लग्नानंतर शिकलेली बायको म्हणून नवऱ्याने केलेली अवहेलना, सासरी झालेला छळ, माहेरी बंधू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलेला खंबीर आधार, त्यातून झालेले शिक्षण - पनवेल येथे शिक्षिकेची नोकरी, प्रार्थनासमाजाचे कार्य, निराश्रित साहाय्यकारी मिशनचे आजीवन कार्य.. असा त्यांचा जीवनप्रवास प्रचंड संघर्षमय तर आहेच परंतु त्याचबरोबर प्रेरणादायीही आहे.

२७ एप्रिल १९५६ रोजी भगिनी जनाक्का शिंदे यांच्या संघर्षमय जीवनाची अखेर मात्र अत्यंत वेदनादायी अशी झाली. त्यांच्या शेजारीच राहत असलेली सौ. मट्टू नावाची एक महिला आगीच्या अपघातात सापडली होती. त्या महिलेस वाचवण्याच्या प्रयत्नात भगिनी जनाक्का यांचा भाजून मृत्यू झाला.

संदर्भ :
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‌मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More