विठ्ठल रामजी शिंदे यांचे डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम जोमाने सुरू होते. त्यासाठी त्यांना वेळही द्यावा लागत होता. या व इतर काही कारणांमुळे प्रार्थनासमाजातील काही मोठी मंडळी त्यांच्यावर नाराज होती. त्यामुळे नोव्हेंबर १९१० रोजी मुंबईत प्रार्थनासमाजाने एक ठराव करून विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रचारक म्हणून चक्क काढून टाकले.
सलग ७ वर्षे विठ्ठलरावांनी अगदी निष्ठेने प्रचारकाचे काम केल्यानंतर त्यांचे प्रार्थनासमाजाशी असलेले नाते आता संपले होते. असे असले तरी त्यांनी धर्मप्रसार हे जीवनकार्य म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतानाही मोठ्या हिमतीने त्यांनी अजून दोन वर्षे मुंबईत काढली. त्यानंतर आर्थिक अडचणी, मुंबईत जागेचा प्रश्न व अशा अनेक कारणांमुळे त्यांनी आपल्या मिशनचे कार्यालय पुण्यास हलवले.
भगिनी जनाक्का शिंदे |
भगिनी जनाक्कांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने ज्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी पार पाडली ते सदन आर्थिक मदत बंद झाल्याने बंद करावे लागले होते. त्यामुळे त्यांना वऱ्हाड आणि मध्यप्रांताची परिस्थिती पाहण्यासाठी तिकडे पाठवण्यात आले. त्या यवतमाळ येथे एक छोटे वसतिगृह सुरू करून चालवू लागल्या.
१९१२ सालच्या ऑक्टोबर महिन्यातील ५, ६ व ७ या तारखांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ‘महाराष्ट्र परिषद’ भरवण्यात आली होती. या परिषदेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या परिषदेला अनेक ठिकाणांहून आलेल्या महिलांची खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. भगिनी जनाक्काही या परिषदेस उपस्थित राहिल्या. परिषदेच्या व्यवस्थापनेच्या कामात महिलांनी खूप काम केले. प्रसंगी स्वयंपाक करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली.
परिषदेच्या तिसऱ्या दिवशी श्रीमती रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली मिशनच्या लष्कर येथील शाळेत महिलांची सभा भरली. त्या सभेला वरिष्ठ वर्गातील ५० व अस्पृश्य समाजातील २०० महिला उपस्थित होत्या. भगिनी जनाक्का शिंदे यांनी सर्व महिलांचे स्वागत केले व त्यांना डिप्रेस्ड क्लासेस मिशनची माहिती करून दिली. यावेळी श्रीमती रमाबाई रानडे यांचे अध्यक्षपदाचे भाषण झाले.
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची पुण्यात भरलेली ही महाराष्ट्र परिषद एक महत्वाची घटना होती. या परिषदेस सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई