Saturday, October 28, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ④

औद्योगिक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड एकदा कलकत्त्याला आले होते. त्यावेळी धर्मानंदांनी त्यांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना चर्चेसाठी बडोद्याला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार धर्मानंदांनी बडोद्याला जाऊन त्यांची भेट घेतली.

महाराजा सयाजीराव गायकवाड

बडोदा भेटीत महाराजांनी धर्मानंदांना विचारले, "कलकत्ता सोडून इकडे काही काम करण्याची तुमची इच्छा आहे काय?" धर्मानंद उत्तरले, "पैसा मिळवून श्रीमंत होण्याची मला मुळीच इच्छा राहिली नाही. माझ्या आवडीचे काम मला मिळाले आणि निर्वाहापुरता पैसा मिळाला तर ते मला हवे आहे." महाराज म्हणाले, "तुम्ही येथे येऊन राहत असाल तर तुम्हाला मी सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे." धर्मानंद म्हणाले, "मी बडोद्यालाच राहावे, अशी अट महाराजांनी घालू नये. मी कोठे असलो तरी बौद्ध धर्माचे ज्ञान आमच्या महाराष्ट्र बांधवांना करून देणे, या माझ्या कर्तव्यास मुकणार नाही. तेव्हा पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी राहून माझे काम मला करू द्यावे व निर्वाहापुरती बडोदे सरकारकडून मला मदत व्हावी." त्यावेळी निश्चित असे कोणतेही आश्वासन न देता महाराज पुण्याला निघून गेले. धर्मानंदही कलकत्त्याला आले. पंधरा वीस दिवसांनी महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींची पुण्याहून तार आली, "तूम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी राहत असाल तर तुम्हाला बडोदे सरकारातून दरमहा ५० रुपये मिळतील व ही मुदत ३ वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र, वर्षातून एखादे पुस्तक बडोदे सरकारसाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे." महाराजांनी देऊ केलेले वेतन धर्मानंदांनी स्वीकारले व तारेनेच त्यांचे आभार मानले. मात्र पत्राने ऑक्टोबर महिन्यात पुण्याला जाईन असे कळवले. एक महिना कलकत्त्यात राहण्यास हरकत नाही असे त्यांच्या सेक्रेटरींकडून उत्तर आले.

Thursday, October 05, 2017

आचार्य धर्मानंद कोसंबी ③

दरम्यानच्या काळात धर्मानंदांनी कलकत्ता सोडून सिक्किमला भेट देण्याचे ठरवले. दक्षिणेप्रमाणे उत्तरेकडील बौद्धधर्माची माहिती मिळवण्याचा उद्देश या भेटीमागे होता. परंतु, सिक्कीममध्ये बौद्धधर्माविषयी कोणतीही माहिती त्यांच्या हाती लागली नाही. बौद्ध धर्माची लयाला गेलेलीच परिस्थिती त्यांना पाहावयास मिळाली. त्यामुळे ते कलकत्त्याला परतले.

प्रा. धर्मानंद कोसंबी

कलकत्त्यात रासबिहारी घोष, गुरुदास बॅनर्जी वगैरे मंडळींनी नॅशनल कॉलेज सुरू करण्याची योजना आखली होती. या कॉलेजच्या विषयपत्रिकेत पाली भाषेचा समावेश व्हावा असे धर्मानंदांना वाटत होते. यासाठी मनमोहन घोष यांच्या मदतीने त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मनमोहन घोष यांनी धर्मानंदांची सत्येंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट करवून दिली. धर्मानंदांच्या प्रयत्नांना यश आले. अगदी अखेरच्या क्षणी पाली भाषेचा कॉलेजच्या विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला. धर्मानंदांना द्यावयाचा पगार मात्र फक्त ३० रुपये ठरविण्यात आला. पगाराची चिंता न करता काम करण्याची संधी मिळाली यामुळेच धर्मानंद जास्त खुश झाले. १५ ऑगस्ट १९०६ पासून म्हणजेच कॉलेज सुरू झाल्यापासून धर्मानंदांनी पाली भाषेचे अध्यापक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

अशा तर्‍हेने पाली भाषा शिकवणारे भारतातील पहिले केंद्र सुरू करण्यात धर्मानंदांना यश मिळाले. धर्मानंद आता प्रा. धर्मानंद कोसंबी झाले.

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More