औद्योगिक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड एकदा कलकत्त्याला आले होते. त्यावेळी धर्मानंदांनी त्यांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना चर्चेसाठी बडोद्याला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार धर्मानंदांनी बडोद्याला जाऊन त्यांची भेट घेतली.
महाराजा सयाजीराव गायकवाड |
बडोदा भेटीत महाराजांनी धर्मानंदांना विचारले, "कलकत्ता सोडून इकडे काही काम करण्याची तुमची इच्छा आहे काय?" धर्मानंद उत्तरले, "पैसा मिळवून श्रीमंत होण्याची मला मुळीच इच्छा राहिली नाही. माझ्या आवडीचे काम मला मिळाले आणि निर्वाहापुरता पैसा मिळाला तर ते मला हवे आहे." महाराज म्हणाले, "तुम्ही येथे येऊन राहत असाल तर तुम्हाला मी सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे." धर्मानंद म्हणाले, "मी बडोद्यालाच राहावे, अशी अट महाराजांनी घालू नये. मी कोठे असलो तरी बौद्ध धर्माचे ज्ञान आमच्या महाराष्ट्र बांधवांना करून देणे, या माझ्या कर्तव्यास मुकणार नाही. तेव्हा पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी राहून माझे काम मला करू द्यावे व निर्वाहापुरती बडोदे सरकारकडून मला मदत व्हावी." त्यावेळी निश्चित असे कोणतेही आश्वासन न देता महाराज पुण्याला निघून गेले. धर्मानंदही कलकत्त्याला आले. पंधरा वीस दिवसांनी महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींची पुण्याहून तार आली, "तूम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी राहत असाल तर तुम्हाला बडोदे सरकारातून दरमहा ५० रुपये मिळतील व ही मुदत ३ वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र, वर्षातून एखादे पुस्तक बडोदे सरकारसाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे." महाराजांनी देऊ केलेले वेतन धर्मानंदांनी स्वीकारले व तारेनेच त्यांचे आभार मानले. मात्र पत्राने ऑक्टोबर महिन्यात पुण्याला जाईन असे कळवले. एक महिना कलकत्त्यात राहण्यास हरकत नाही असे त्यांच्या सेक्रेटरींकडून उत्तर आले.
धर्मानंदांची कलकत्त्यात मोंग बा टू या ब्राम्ही गृहस्थाशी ओळख झालेली होती. मोंग बा टू यांनी त्रिपिटक या ग्रंथातील छापून प्रसिद्ध झालेला सर्व भाग धर्मानंदांना देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी त्यांनी धर्मानंदांना ब्रम्हदेशात बोलावले होते. त्यांना भेटण्यासाठी धर्मानंद ब्रम्हदेशास गेले. कलकत्ता विद्यापीठाने पाली भाषेतील छापून प्रसिद्ध झालेली सर्व पुस्तके आणण्यासाठी धर्मानंदांना ३००-४०० रुपये रक्कम दिली होती. या भेटीत मोंग बा टू यांनी जवळपास २५० रुपयांची पाली पुस्तके धर्मानंदांना भेट दिली. या पुस्तकांचा धर्मानंदांना पुढे पाली भाषा शिकवण्यासाठी खूप उपयोग झाला.
धर्मानंद ब्रम्हदेशावरून भारतात कलकत्त्याला आले. त्यांच्या अनुपस्थितीत इकडे कलकत्ता विद्यापीठात एक वेगळीच गोष्ट घडून आली होती. नोकरी सोडून जाऊ नये म्हणून विद्यापीठाने धर्मानंदांचा पगार १०० रुपयांवरून २५० रुपये केला होता. त्याचबरोबर कलकत्त्याला ३ वर्षे राहीन अशी हमीदेखील मागितली होती. एका बाजूला पैशाचा लोभ तर दुसरीकडे कर्तव्यास मुकण्याची भीती अशा द्विधा मनःस्थितीत धर्मानंद सापडले. विचाराअंती कर्तव्यास न मुकण्याचा धर्मानंदांचा निश्चय पक्का झाला. "आज बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्या अनुकंपेने मी लोभावर विजय मिळवला, म्हणून मला आनंद वाटत आहे!" असे उद्गार त्यांनी काढले.
धर्मानंद कलकत्त्याहून मुंबईला आले. त्यांच्या ओळखीच्याच असलेल्या माडगावकर यांनी त्यांना राहण्यासाठी आपला बोरिवली येथील बंगला दिला. काहीच दिवसात धर्मानंदांचे कुटुंबही मुंबईत आले. या काळात मुंबईत धर्मानंदांकडे पाली भाषा शिकण्यासाठी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वूड्स नावाचे गृहस्थ येत असत. त्यांनी धर्मानंदांकडून चार महिने पाली भाषेचे धडे घेतले. त्यानंतर डॉ. जेम्स वूड्स स्वदेशी परतले. त्यानंतर धर्मानंदांनी आपले कुटुंब गोव्याला पाठवून दिले व ते पुण्यास आले. याच काळात त्यांनी बडोदा येथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाच व्याख्याने दिली. त्यातील तीन व्याख्यानाचे 'बुद्ध, धर्म आणि संघ' या नावाचे पुस्तक छापून प्रसिद्ध झाले.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!'