पुण्यात येऊन धर्मानंदांना एक वर्ष होत आले होते. एके दिवशी डॉ. जेम्स वूड्स यांचे अमेरिकेहून धर्मानंदांना निकडीचे पत्र आले. त्यात लिहिले होते की, "हार्वर्ड विद्यापीठात माजी प्रोफेसर वारन यांनी चालवलेल्या 'विशुद्धीमार्ग' या बौद्ध ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याच्या कामी तुमच्या मदतीची गरज आहे. त्वरित येण्याची कृपा करावी."
![]() |
आचार्य धर्मानंद कोसंबी |
धर्मानंदांनी अमेरिकेस जाण्याचे ठरवले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकडून जाण्याची परवानगी घेतली. धर्मानंद इंग्लंडमार्गे अमेरिकेला जाण्यास निघाले. वाटेत इंग्लंडमधील मुक्कामात एका डच व्यापार्याने धर्मानंदांना कार्ल मार्क्स व समाजवादी तत्वज्ञान याची माहिती करून दिली. धर्मानंद त्याबद्दल अनभिज्ञ होते. पुढे अमेरिकेत पोहोल्यावर विविध लेखकांनी समाजवादावर लिहिलेले अनेक लेख व पुस्तके धर्मानंदांनी वाचली. जॉन स्पार्गो यांनी लिहीलेल्या कार्ल मार्क्स यांच्या चरित्राचा त्यांनी अभ्यास केला. हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर वारन यांच्या मृत्यूमुळे विशुद्धीमार्ग या बौद्ध ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीच्या कामाची जबाबदारी प्रोफेसर ल्यानमन यांनी घेतली होती. धर्मानंदांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. परंतु, प्रो. ल्यानमन यांच्या आडमुठेपणामुळे विशुद्धीमार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे अखेर दोन वर्षे अमेरिकेत काढून धर्मानंद भारतात परतले.
अमेरिकेतून परतल्यानंतर धर्मानंदांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी करावी असे त्यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुचवले. धर्मानंदांची शिफारस करणारे एक पत्रही त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या प्रा. केशवराव कानिटकर यांना लिहिले. पुण्यात पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी ही चांगली संधी आहे असे धर्मानंदांना वाटले. पाली भाषेस काहीच दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली होती. हे घडून येण्यास धर्मानंदांचे प्रयत्न आणि त्यांस डॉ. रा. गो. भांडारकर यांनी केलेली मदत कारणीभूत झाली होती.
काही दिवसांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे धर्मानंदांना पत्र आले. त्यात म्हटले होते, "फर्ग्युसन कॉलेजात आम्ही तुम्हास कायमचे नोकर म्हणून घेण्यास तयार आहोत. तहहयात मेंबरांचा पगार आता आम्ही १०० रुपये करून घेतला आहे. पण तुम्हास ७५ रुपये मिळतील व तुम्ही निदान पाच वर्षे कॉलेजात शिकवण्याची अट मान्य केली पाहिजे." इतर सभासदांना १०० रुपये परंतु आपणास मात्र ७५ रुपये ही गोष्ट धर्मानंदांना आवडली नाही. दरमहा एवढ्या पगारावर नोकरी करावी की नको या विचारात ते पडले. परंतु, ही नोकरी स्वीकारल्यामुळे महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात का होईना, पाली भाषेचा प्रसार करता येणे शक्य होणार होते. त्याचबरोबर इतर सभासदांच्या त्यागापेक्षा दरमहा २५ रुपयांचा स्वार्थत्याग दाखवण्याची ही आयती संधी आहे असे धर्मानंदांना वाटले. अधिक पैसे न घेता काम करण्याची त्यागवृत्ती तेव्हा अभिमानाची समजली जात होती. पण खर्च कसा भागवावा हा प्रश्न धर्मानंदांना पडला.
हार्वर्ड विद्यापीठाकडून मिळालेल्या वेतनातून सर्व खर्च भागवून धर्मानंदांकडे दीड हजार रुपये शिल्लक राहिले होते. अगदी वडिलांचेदेखील संपूर्ण कर्ज त्यांनी फेडले होते. तेव्हा पाच वर्षे दरमहा २५ रुपयांची तूट सहन करता येईल असा विचार करून धर्मानंदांनी पाच वर्षांकरता फर्ग्युसन कॉलेजची नोकरी स्वीकारली.
धर्मानंदांनी १९१२ ते १९१८ अशी सलग सहा वर्षे फर्ग्युसन कॉलेजमधील नोकरीच्या निमित्ताने पुण्यात काढली. कोसंबी कुटुंब रविवार पेठेत, मोती चौकातील एका चिंचोळया घरात पहिल्या मजल्यावर राहत होते. पहिली मुलगी माणिक त्यानंतर दामोदरच्या पाठीवर त्यांना मनोरमा व कमला अशा आणखी दोन मुली झाल्या.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’