Wednesday, July 03, 2024

नशिबाची पुनःपुन्हा हुलकावणी

कोणताही सांघिक खेळ असो चांगला संघ तयार होण्यासाठी कित्येक वर्षे जावी लागतात. सातत्य राखावे लागते. अविरत कष्ट करावे लागतात. हे पाहता दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने उत्तम क्रिकेट खेळत आलेला आहे. क्रिकेट जगतात दक्षिण आफ्रिका हे नाव जरी उच्चारले तरी खेळाबरोबरच वागणूक आणि वर्तणूकीनेही उत्तम असा एक संघ आपल्या डोळ्यासमोर येतो. क्रिकेट या खेळाला जंटलमन्स गेम का म्हणतात हे दक्षिण आफ्रिका संघाकडे पाहून समजते.

T20WC2024 फायनलमध्ये पराभवाचा धक्का
बसलेले दक्षिण आफ्रिकन खेळाडू

आयसीसीकडून 1998 साली बांग्लादेशमध्ये 'आयसीसी नॉकआउट ट्रॉफी' किंवा अधिकृत नाव 'विल्स इंटरनॅशनल कप' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून नॉकआउट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. याच ट्रॉफीला पुढे चॅम्पियन्स ट्रॉफी या नावाने ओळखले जाऊ लागले. चॅम्पियन्स ट्रॉफीला 'मिनी वर्ल्ड कप' असेही संबोधतात. क्रिकेट जगतात ही ट्रॉफी महत्त्वाची समजली जाते. गेल्या 25-30 वर्षांमध्ये अत्यंत दर्जेदार क्रिकेट खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफी हे एकमेव यश जमा आहे. कुठल्याही प्रकारातला एकही विश्वचषक जिंकण्यात अद्यापतरी त्यांना यश आलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए विल्स इंटरनॅशनल 
कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी स्वीकारताना (वर्ष 1998)

असं म्हणतात की चांगल्या खेळाला नशीबाचीही साथ असावी लागते. परंतु दक्षिण आफ्रिका आणि नशीब यांचा काहीही संबंध नाही असाच अनुभव आजवर येत आलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंत पाच एकदिवसीय विश्वचषक (1992, 1999, 2007, 2015, 2023) आणि दोन T20 विश्वचषक (2009 आणि 2014) सामन्यांमध्ये उपांत्य फेरी गाठली परंतु यातील प्रत्येक वेळी फायनलमध्ये जाण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये चोकर्स म्हणजे मोक्याच्या क्षणी मान टाकणारा संघ अशी त्यांची ओळख बनली. परंतु नुकत्याच अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे पार पडलेल्या T20WC2024 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने आपल्यावर बसलेला चोकर्स हा शिक्का जवळजवळ पुसत आणला होता. संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत कारकिर्दीत पहिल्यांदाच उपांत्य फेरी जिंकली आणि मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करून नवा इतिहास रचला. फायनलमध्ये हेनरिक क्लासेनची तडाखेबाज बॅटिंग पाहता फायनलही त्यांनी जवळपास जिंकलीच होती. परंतु भारतीय बॉलर्सनी शेवटच्या षटकांमध्ये अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या घशातून मॅच काढली.

सूर्यकुमार यादवने डेविड मिलरचा बाऊंड्री लाईनवर
पकडलेला अफलातून कॅच जो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला

उपांत्य फेरीत सतत हुलकावणी देत असलेल्या नशिबाने यावेळी फायनलमध्येही ऐन मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेकडे पाठ फिरवली. फायनलमधील हा पराभव नक्कीच त्रासदायक आहे पण तरीही दक्षिण आफ्रिका संघ यातून वर येऊन पुन्हा जोरदार कमबॅक करेल अशी आशा आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अनेक जय-पराजय पचवून आता चांगलाच तयार झाला आहे. विश्व चॅम्पियन होण्याच्या योग्यतेचा तर नक्कीच आहे आणि भविष्यात त्यांना तशा संधीही आहेत.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट म्हटलं की अजून एका गोष्टीची दबक्या आवाजात चर्चा होते ती म्हणजे तिथे असणाऱ्या कोटा सिस्टमची. सर्वांना समान संधी मिळाव्यात म्हणून कायद्यानुसार तिथे खेळामध्ये कोटा सिस्टम आहे. यानुसार दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात किमान सहा कृष्णवर्णीय क्रिकेटपटू असणे आवश्यक आहे. या सहामध्येही एशियन, मिश्र वंशीय किंवा आफ्रिकन वंशाचेच खेळाडू असावे लागतात. एकदिवसीय आणि T20 सामन्यांमध्ये सहापैकी दोन तर कसोटी सामन्यांमध्ये किमान तीन आफ्रिकन कृष्णवर्णीय क्रिकेटपटू असले पाहिजेत. याचा अर्थ संघात पाच गोर्‍या खेळाडूंचा समावेश करता येतो. ही कोटा सिस्टम चूक की बरोबर हे समजून घेण्यासाठी आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात जावे लागेल. तिथल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. तूर्तास एक उत्तम क्रिकेट रसिक म्हणून आपण यात न जाता फक्त एवढीच अपेक्षा करू की कोटा सिस्टम लागू करताना दक्षिण आफ्रिकेने गुणवत्तेच्या आधारावर लवचिकता दाखवावी व आपल्या संघाचा समतोल बिघडला जाणार नाही एवढीच काळजी घ्यावी.

T20WC2024 फायनलमधील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटुंचे सोशल मिडियावर व्हायरल होणारे फोटो मन विचलित करणारे आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासोबतच्या फायनलमधील पराभवानंतर आपलीही अशीच अवस्था होती. आपण आपल्या त्या दुःखाची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या आताच्या दुःखाशी करू शकतो. एक विशेष बाब म्हणजे यावेळी भारतीय क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर आपला विजय साजरा करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्यासाठी सहानुभूतीपर पोस्ट/व्हिडिओ बनवले जात आहेत. भारतीयांकडून प्रतिस्पर्धी संघाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. यात मला एका गोष्टीची मोठी कमाल वाटते. आपल्यासोबत दुसऱ्याच्याही मनाचा विचार करणाऱ्या भारतीयांचं मन खरंच किती सुंदर आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला विश्वचॅम्पियन होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More