अगदी लहान असल्यापासून मला अभ्यासाबरोबर सुंदर अक्षर काढण्याची, चित्रकलेची आवड होती. त्यासाठी माझं सर्वत्र कौतुक होत असे. घरी वडिलांना मात्र मी चित्रकलेत रस न घेता अभ्यासात लक्ष द्यावं असं वाटे. एकदा सहावीत असताना मी अमिताभ बच्चन यांचं एक चित्र काढलं आणि वर्गातील मित्रांना दाखवायला म्हणून शाळेत नेलं. चित्र छान काढलंय म्हणून सगळे मित्र कौतुक करू लागले. चित्र पुनःपुन्हा पाहू लागले. मला खूप आनंद झाला. पुढील काही दिवस शाळेत 'बच्चनचं चित्र आणलंय का?' अशी मित्रांकडून विचारणा व्हायची आणि मी त्वरित त्यांना ते चित्र दाखवायचो. आमच्या गल्लीतल्या सर्व मित्रमंडळींनीही बच्चनच्या चित्राचं भरभरून कौतुक केलं. घराजवळच राहणाऱ्या वर्गातील एका मैत्रिणीला तर माझं चित्र इतकं आवडलं की तीने ते चित्र तिच्या घरी नेऊन सर्वांना दाखवलं व चित्र परत करताना 'तू चांगला चित्रकार होशील' म्हणाली. माझं चित्र सर्वांनाच आवडतंय म्हणून मी जाम खुश होतो.
सर्वांना चित्र दाखवून झालं आता एके दिवशी घरी वडिलांना चित्र दाखवायचं मी ठरवलं. माझे वडील ग्रामविकास अधिकारी होते. दुपारच्या सुट्टीत एकदा ते जेवायला घरी आले. जेवण वगैरे झाल्यावर मी अमिताभ बच्चन यांचं चित्र त्यांना दाखवलं. मला वाटलं आता आपलं जाम कौतुक होणार. पण वडिलांनी संतापानं ते चित्र टराटर फाडून टाकलं आणि म्हणाले, "असलं काहीतरी करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. चित्रकार होऊन पोटाला खाशील काय?" मला मोठा धक्का बसला. वडील दुपारच्या सुटीनंतर निघून गेले. त्यानंतर मी खूप रडलो. आपण फार मोठा गुन्हा केल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली. पुढील काही दिवस चित्रकलेच्या वहीचं तोंडही पाहिलं नाही. वर्गात मुलं विचारायची बच्चनचं चित्र कुठंय? मी हरवलं म्हणून सांगायचो. मन नाराज झालेलं होतं.