१२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून महात्मा गांधीजींची दांडी यात्रा निघाली. ही यात्रा ५ एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचली. मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही यात्रा होती. ६ अप्रिलच्या पहाटे नेहमीची प्रार्थनासभा आटोपल्यानंतर गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी पायी चालत समुद्रकिनाऱ्याकडे जाऊन तयार झालेले मूठभर मीठ उचलून मिठाचा कायदाभंग केला. त्यावेळी इकडे महाराष्ट्रात अप्पांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी व शिरोडे येथे मिठाचा सत्याग्रह झाला. अप्पांनी रत्नागिरी येथे किल्ल्याच्या खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेले मीठ उचलून सत्याग्रह केला. अप्पासाहेबांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह तुरुंगात टाकण्यात आले. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांना सहा महीने ठेवण्यात आले.
रत्नागिरी येथे तुरुंगात अप्पांना समजले की कातकरी समाजाच्या कैद्यांना तुरुंगात भंगीकाम करावे लागते. अप्पांना हे पटले नाही. तुरुंगात भंगीकाम मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून उपोषण सुरू केले. ही बातमी गांधीजींना कळताच त्यांनी अप्पांना एक मोठी तारच केली, “तुझ्या अल्पाशनाची बातमी माझ्या कानावर आली. तुला साथ देणे माझे कर्तव्य असल्याने मीही सरकारला नोटिस देऊन अनशन सुरू केले आहे.” त्यानंतरही अप्पांना हिंडलग्याच्या तुरुंगात तीन महिने सक्तमजुरी, येरवडा जेल येथे सहा महीने व पुनः रत्नागिरीच्या तुरुंगात २ वर्षाची शिक्षा झाली. यावेळी मात्र अप्पांना भंगीकाम देण्यात आले. प्रत्येक दिवशी अप्पांचे १२ वेगवेगळे सवर्ण सहकारी हे काम करत. अप्पा स्वतः दर रविवारी संडास सफाई करत.
१९३३ साली तुरुंगातून सुटल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुका कामिट्यांचे गठन केले. जिल्हा कमिटीही नेमली. पुढे १९३७ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळे तयार झाली तेव्हा काँग्रेसमध्ये भाऊगर्दी सुरू झाली. त्यामुळे अप्पांनी इथून आपण सत्याग्रहात भाग न घेता फक्त रचनात्मक कामातच भाग घेऊ असे गांधीजींना कळवले. याच काळात गांधीजींनी संपूर्ण भारतातील आपल्या निवडक सात अनुयायांचा गांधी सेवा संघ सुरू केला व अप्पांना त्याचे अध्यक्ष केले.
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींना तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी अप्पांच्या कानावर धडकली. चार वर्षांपूर्वी हिंडलग्याच्या तुरुंगातून सुटल्यावर अप्पा पाचगणीला गांधीजींना भेटायला गेले होते. ती अप्पांची गांधीजींशी झालेली शेवटची भेट होती. त्या भेटीत महादेवभाईंचा मृत्यू झाल्याने अप्पांना सेक्रेटरी म्हणून ठेवून घेण्याची गांधीजींची इच्छा असल्याचे अप्पांना जाणवले होते. गांधीजींच्या त्या इच्छेची आपल्याकडून अवज्ञा घडल्याची खंत पुढे अप्पांच्या मनात कायम राहिली.
१५ मार्च १९४८ रोजी देशभरच्या गांधीभक्तांचे संमेलन भरवण्यात आले. डॉ. राजेंद्र प्रसाद या संमेलनाचे अध्यक्ष होते. पंडित नेहरूही आले होते. हे संमेलन गांधी सेवा संघातर्फे भरवण्यात आले होते. या संमेलनात सर्वोदय समाजाची स्थापना करण्यात आली. सामाजिक समता + आर्थिक समता = सर्वोदय हे अप्पांचे सूत्र होते. अप्पांनी सर्वोदयच्या दृष्टीने पूर्वीच काम सुरू केले होते. जमीन ब्राम्हणांची कष्ट मात्र कुणब्यांचे ही गोष्ट अप्पांना लहानपणापासून खटकत होती. त्यामुळे प्रांतिक सरकार येताच त्यांनी ‘खोती विसर्जनाचा’ कायदा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.
५ मे १९४८ रोजी अप्पांनी कणकवलीजवळील वाकदे गावात गोपुरी आश्रम स्थापन केला. दलितोद्धार, शेती-गोपालन व ग्रामोद्योग यांची उत्पादनक्षमता वाढवणे, पडीक जमिनीचा वापर करणे, स्वावलंबन, खादी ग्रामोद्योगाचा प्रसार, गोशाळा चालवणे ही काही गोपुरी आश्रमाची उद्दिष्टे होती. दूरदूरचे लोक गोपुरी आश्रम पाहायला येत.
१९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कोकण दौरा झाला. पंडितजींना जेव्हा समजले की अप्पा तिथे आहेत तेव्हा त्यांनी १५ मिनिटे अप्पांसाठी गोपुरीत राखून ठेवली. ठरल्याप्रमाणे पंडितजींनी गोपुरीत अप्पांची भेट घेतली. कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत पंडित नेहरू यांनी अप्पांचा 'कोकण गांधी' असा उल्लेख केला.
आपल्या अखेरच्या दिवसात अप्पांनी भूदान आंदोलन व चलनशुद्धीसाठी महाराष्ट्रभर पदयात्रा काढल्या. भूदान यशस्वी होण्यासाठी व्याजप्रथा बंद व्हायला हवी त्याचबरोबर काहींना जमिनीऐवजी अन्य उद्योग मिळायला हवा असे अप्पांचे म्हणणे होते. व्याजप्रथा बंद होण्यासाठी चलनशुद्धी हा उपाय त्यांनी काढला होता. सरकारने दरवर्षाअखेर नोटा रद्द ठरवल्या पाहिजेत आणि शेकडा सहा टक्के फी घेऊन नव्या नोटा दिल्या तर व्याजप्रथा कमकुवत होईल अशी त्यांची योजना होती. विनोबांनीही चलनशुद्धीसाठी पाठिंबा दिल्याने अप्पा आनंदी झाले होते.
३० जानेवारी १९७० रोजी अप्पा गोपुरीत परतले. त्यांचे शरीर थकले होते. ते आजारी पडले. दूध तर सोडलेच परंतु अॅलोपॅथी औषधेही घेण्याचे नाकारू लागले. त्यांना पुण्याजवळील ऊरुळी कांचन निसर्गोपचार केंद्रात नेण्यात आले परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर १० मार्च १९७१ रोजी वयाच्या ७७व्या वर्षी अप्पांचे निधन झाले.
संदर्भ:
- कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन (चरित्र) - प्रा. सतीशचंद्र तोडणकर
- श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख