श्रीधरपंतांनी लिहिलेल्या तिसऱ्या म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात 'माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.' हे वाक्य आले आहे. या वाक्यातून श्रीधरपंतांच्या मृत्यूचे कारण समजण्यास मदत होते. श्रीधरपंतांना वडिलांचा केसरी आपल्या हातात मिळवण्याची खूप इच्छा होती. परंतु त्यांचा केसरीच्या ट्रस्टींबरोबर 'केसरी' वृत्तपत्राच्या मालकीवरून व इतर मालकी हक्कांसाठी कायदेशीर लढा सुरू होता. सतत कोर्टाच्या फेऱ्या त्यांना माराव्या लागत होत्या. त्याचा त्यांना मनस्ताप होत होता.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राचा दाखला देत जावई विश्वनाथ केतकर वकिलांनी माहिती दिली होती की मृत्यूपत्रानुसार टिळकपुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही. टिळकपुत्रांनी त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवला खरा पण पुढे पुरोगामी वर्तुळात वावरणाऱ्या टिळकपुत्रांच्या लवकरच लक्षात आले की, 'केसरी' आणि 'मराठा' ट्रस्टबाबत आपणास फसवण्यात आले आहे. केसरी-मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये, असं स्पष्टपणे लोकमान्य टिळकांनी लिहिले नव्हते तर 'लायक वाटल्यास' घ्यावे असे लिहिले होते.
![]() |
श्रीधरपंतांनी आत्महत्येपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेले पत्र |
रामभाऊ आणि श्रीधरपंत हे दोघे बंधु पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते. श्रीधरपंताना महाविद्यालयीन जीवनापासूनच लिखाणाची आवड होती. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. त्यांनी श्रीधरपंताना लिखाणासाठी कायम उत्तेजनच दिले. ‘A Midsummer Nights Dream!’ किंवा ‘ऐन उन्हाळ्यातील एक स्वप्नदृश्य!’ आणि ‘मराठी शाकुंतलाचे परीक्षण’ हे लेख वाङमयसमीक्षेचा नमूना म्हणता येतात. ‘बादरायण संबंध’, ‘कलमबहादुराचे शेलापागोटे!’ असे त्यांचे लेख प्रसिद्ध होते. प्रागतिक विचारांच्या श्रीधरपंतांचे कुठल्याही प्रकारचे लेखन कधीही केसरीत प्रकाशित झाले नाही. केसरीच्या विचारसरणीला प्रागतिक विचार झेपणार कसे? श्रीधरपंत काकासाहेब लिमये यांच्या ज्ञानप्रकाश आणि विविधवृत्त या नियतकालिकांमधून लिखाण करत. आपल्या लेखणीतून ते जातीयता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, ब्राम्हण्यवाद यावर सडकून टीका करत. आपण गोपाळ गणेश आगरकरवादी आहोत असं श्रीधरपंत छातीठोकपणे सांगत. एकदा का केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन असंही म्हणत. श्रीधरपंतांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते.
पुरोगामी विचारांच्या टिळकबंधूंनी ८ एप्रिल १९२८ साली आज ज्याला केसरीवाडा म्हणून ओळखले जाते त्या गायकवाड वाड्यामध्ये समता संघाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कार्यक्रमात गायकवाड वाड्याच्या ग्रंथालयामध्ये अस्पृश्यांसह सहभोजन ठेवण्यात आले होते. हे पुण्यातील कर्मठ टिळकवाद्यांना रुचले नाही. वीजपुरवठा तोडून कार्यक्रमात विघ्न आणण्यात आले. श्रीधरपंतांनी तेलाचे दिवे लावून आनंदाने सहभोजन पार पाडले. टिळकपुत्रांच्या ह्या गोष्टी साहजिकच केसरीचे ट्रस्टी आणि सनातनी टिळकभक्तांना आवडणाऱ्या नव्हत्या.
त्याकाळी गणेशोत्सवात मनोरंजनातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी मेळ्यांचे आयोजन होत असे. टिळक बंधूनी गायकवाड वाड्यामधल्या गणपतीसमोर पांडोबा राजभोज यांच्या अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळ्याचे आयोजन केले. यामुळे ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. टिळकबंधूंचा धीटपणा त्यांना माहित होता. निदान अस्पृश्यांची सावली तरी टिळकांच्या गणपतीवर पडू नये म्हणून मूर्तीला लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त करून त्यास मोठे टाळे लावले. हे टाळेही फोडले जाईल ह्या भीतीने ट्रस्टींनी कोर्टात धाव घेऊन त्याचाही मनाई हुकूम काढून आणला. गायकवाडवाड्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला. रामभाऊंनी कोर्टाची नोटिस घेण्यास नकार दिला. त्यांनी सदऱ्याखाली लपवून आणलेल्या हातोड्याने पिंजऱ्याचे टाळे घाव घालून फोडले आणि पिंजरा उखडून भिरकावून दिला. रामभाऊंनी टिळकांच्या गणपतीला कर्मठतेच्या बंधनातून मुक्त केले. सायंकाळी श्रीधरपंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या कचेरीहून अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा घेऊन सदाशिव पेठेतून गायकवाड वाड्याकडे आले. रामभाऊ त्यांची वाटच पाहत होते. पेठेमध्ये लोक हा अजबप्रकार पाहण्यासाठी गर्दी करून होते. वाड्याच्या दाराशी मेळ्याला गोऱ्या पोलिसांनी अडवले. टिळक बंधूंची त्यांच्याशी हमरीतुमरी झाली. त्यांच्या जोरापुढे पोलिसांची ताकद कमी पडली आणि मेळा अखेर वाड्यामध्ये घुसला. मेळा पार पडताच श्रीधरपंतांच्या हातात पुन्हा नोटिस देण्यात आली तेव्हा त्यांनी तो कागदच फाडून टाकला. दुसऱ्या दिवशी श्रीधरपंतांच्या कायम पाठीशी राहणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या लोकहितवादी या सप्ताहिकाच्या बातमीचा मथळा होता, “गायकवाड वाड्यावर अस्पृश्य मेळ्याची स्वारी”
टिळकबंधूंच्या अशा उपद्व्यापांमुळे ट्रस्टी मंडळी आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. एकदा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून लिहिलेल्या 'गीतारहस्य' या ग्रंथाची जाहिरात 'केसरी'मध्ये छापली नाही म्हणून क्रोधित रामभाऊंनी छापखान्यात जाऊन मोडतोड केली. त्यामुळे केसरीच्या ट्रस्टींनी पुन्हा एकदा टिळकपुत्रांविरोधात खटला दाखल करून कोर्टकचेरीचे अजून एक लचांड त्यांच्या मागे लावून दिले. रामभाऊंच्या ह्या कृत्यांमुळे आधीच मालमत्तेचा वाद सुरू असताना त्यात नवी भर पडली होती. त्याचा श्रीधरपंतांच्या संवेदनशील मनावर परिणाम झाला जो त्यांना आत्महत्येच्या निर्णयापर्यंत घेऊन गेला.
श्रीधरपंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह होता. श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकर यांच्या 'दुनिया' साप्ताहिकात टिळक अंक प्रसिद्ध झाला होता. त्यात बाबासाहेबांनी श्रीधरपंतांवर एक लेख लिहिला होता. डॉ. आंबेडकर लिहितात, 'कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.'
संदर्भ:
- श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख
- श्रीधर टिळक : लोकमान्य टिळकांच्या मुलानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली आत्महत्या का केली होती? (लेख) - नामदेव काटकर