२००७ सालची गोष्ट आहे. पुण्यात शिक्षणासाठी येऊन मला अडीच-तीन वर्षे झाली होती. मॉडर्न कॉलेजमध्ये एमसीएस होऊन मी नेट प्रोटेक्टर या अँटीव्हायरस कंपनीत नोकरीला लागलो होतो. तरी पुण्यात नवखाच होतो. माहिती होण्याच्या उद्देशाने सुटीच्या दिवशी पुण्यात कधी चालत तर कधी बसने फिरायचो. असंच एकदा सुटीच्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व परिसरात फिरत होतो. फिरत असताना तिथल्या कलादालनात एक व्यंगचित्र प्रदर्शन भरले असल्याचे समजले. कलेची आवड असल्याने माझी पाऊले कलादालनाकडे वळाली. मंगेश तेंडुलकर नावाच्या एका कलाकाराचे व्यंगचित्र प्रदर्शन होते.
मंगेश तेंडुलकर यांच्यासमवेत.. |
कलादालनात पाऊल टाकताच प्रवेशद्वाराजवळ एक निराळीच पाटी माझ्या नजरेस पडली. त्यावर लिहिले होते, "आत जाताना आपल्या काळज्या विवंचना इथे ठेवाव्यात आणि परत जाताना त्या न चुकता इथेच सोडाव्यात" ही पाटी मला जाम आवडली. उत्तम मानसिकता घेऊनच मी दालनात प्रवेश केला. व्यंगचित्रे पाहत असताना जाणवले की कलाकाराची आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली आहे. रेषेवरची हुकूमत तर स्पष्ट जाणवत होती. समाजातील गुणदोषावर अचूक बोट ठेवणारी व्यंगचित्रे कधी खळखळून हसवणारी तर कधी विचार करायला लावणारी होती. व्यंगचित्रातील विषय इतका सौम्यपणे हाताळण्यात आला होता की पाहणाऱ्याच्या मनाला ती हळूवार स्पर्श करून जातील पण किंचितही दुखावणार नाहीत. संपूर्ण प्रदर्शन पाहून झाल्यावर तिथेच असलेल्या मंगेश तेंडुलकर यांना भेटायला गेलो.