२००७ सालची गोष्ट आहे. पुण्यात शिक्षणासाठी येऊन मला अडीच-तीन वर्षे झाली होती. मॉडर्न कॉलेजमध्ये एमसीएस होऊन मी नेट प्रोटेक्टर या अँटीव्हायरस कंपनीत नोकरीला लागलो होतो. तरी पुण्यात नवखाच होतो. माहिती होण्याच्या उद्देशाने सुटीच्या दिवशी पुण्यात कधी चालत तर कधी बसने फिरायचो. असंच एकदा सुटीच्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व परिसरात फिरत होतो. फिरत असताना तिथल्या कलादालनात एक व्यंगचित्र प्रदर्शन भरले असल्याचे समजले. कलेची आवड असल्याने माझी पाऊले कलादालनाकडे वळाली. मंगेश तेंडुलकर नावाच्या एका कलाकाराचे व्यंगचित्र प्रदर्शन होते.
मंगेश तेंडुलकर यांच्यासमवेत.. |
कलादालनात पाऊल टाकताच प्रवेशद्वाराजवळ एक निराळीच पाटी माझ्या नजरेस पडली. त्यावर लिहिले होते, "आत जाताना आपल्या काळज्या विवंचना इथे ठेवाव्यात आणि परत जाताना त्या न चुकता इथेच सोडाव्यात" ही पाटी मला जाम आवडली. उत्तम मानसिकता घेऊनच मी दालनात प्रवेश केला. व्यंगचित्रे पाहत असताना जाणवले की कलाकाराची आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली आहे. रेषेवरची हुकूमत तर स्पष्ट जाणवत होती. समाजातील गुणदोषावर अचूक बोट ठेवणारी व्यंगचित्रे कधी खळखळून हसवणारी तर कधी विचार करायला लावणारी होती. व्यंगचित्रातील विषय इतका सौम्यपणे हाताळण्यात आला होता की पाहणाऱ्याच्या मनाला ती हळूवार स्पर्श करून जातील पण किंचितही दुखावणार नाहीत. संपूर्ण प्रदर्शन पाहून झाल्यावर तिथेच असलेल्या मंगेश तेंडुलकर यांना भेटायला गेलो.
मंगेश तेंडुलकर यांना भेटताच मी त्यांना नमस्कार केला व व्यंगचित्रे आवडल्याचा अभिप्राय दिला. मला काहीतरी बोलायचंय हे लक्षात येताच हाताने इशारा करत मला त्यांनी शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचा असल्याचे सांगताच त्यांनी खूप वर्षांपूर्वी मंगळवेढ्याला येऊन गेल्याचे सांगितले. किल्लाभाग आणि महादेवाच्या मंदिर परिसराची आठवणही सांगितली. मी वयाने लहान असूनही माझ्याशी ते अत्यंत आदरपूर्वक बोलत होते. आमच्यात कलेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्या. मला सर्व चर्चा आठवत नाहीत परंतु अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या 'इमॅजिनेशन इज मोअर इंपॉर्टन्ट दॅन नॉलेज' या वाक्यावर त्यांनी 'इमॅजिनेशन इज इन्स्टंन्स ऑफ नॉलेज' असं म्हटलेलं मला आजही विशेष लक्षात आहे. निरोप घेतेवेळी त्यांनी मला त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सही असणारं एक व्हिजिटिंग कार्ड दिलं. पुढे अनेक दिवस ते माझ्याकडे होतं.
याच काळात मला साहित्याचीही प्रचंड आवड निर्माण झाली होती. एक वाचक म्हणून मला विजय तेंडुलकर यांचे साहित्य खुणावू लागले होते. त्यांचे सखाराम बाईंडर हे नाटक तर माझे अत्यंत आवडते नाटक होते. आणि अशात मला कुठूनतरी समजलं की मंगेश तेंडुलकर हे विजय तेंडुलकर यांचे बंधू आहेत. मी उडालोच! आपण खूप मोठ्या व्यक्तीला भेटलोय याची जाणीव झाली. साहजिकच मला खूप भारी वाटलं.
पुढे मंगेश तेंडुलकर यांचे कुठे व्यंगचित्र प्रदर्शन असले की मी हमखास जायचो. कधी कधी मित्रांनाही घेऊन जायचो. मला पाहिलं की ते ओळखायचे, स्मितहास्य करायचे, कधी कधी प्रेमानं पाठीवर थापही टाकायचे. मित्रमंडळीही व्यंगचित्र प्रदर्शन पाहून खुश व्हायची. सकाळ वृत्तपत्रात त्यांचे लेखही येत असत. मी व माझे मित्र त्यांचे लेख नियमित वाचायचो. पुढे त्यांची काही पुस्तकंही संग्रही आली.
विशेष बाब म्हणजे मंगेश तेंडुलकर यांना सामाजिक भानही होतं. सिग्नलवर उभारून त्यासाठी ते कामही करत. लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे म्हणून ते त्यांचे एक वाहतुकीवर आधारित व्यंगचित्र आणि त्यासोबत एक गुलाबाचं फुल देऊन अत्यंत विनम्रतेनं नमस्कार करत. माझा रुममेट एकदा त्यांनी सिग्नलवर दिलेलं व्यंगचित्र आणि गुलाबाचं फुल घेऊन आला होता. तो फार आनंदी दिसत होता. आम्ही ते व्यंगचित्र भिंतीवर लावलं होतं.
माणसं नाव कमावतात, मोठी होतात पण ती वागणूक वर्तणुकीने चांगली असतीलच सांगता येत नाही. बऱ्याचदा सेलिब्रिटी घमंडी मीपणा ठासून भरलेले असतात. अशात मंगेश तेंडुलकर यांच्यासारखा माणूस आपलं वेगळेपण घेऊन येतो. चालताना बोलताना त्यांच्यातील विनम्रपणा, मोठ्यांसह लहान मुलांशीही आदरानं वागणं, सर्वांशी मृदू आवाजात बोलणं माणसाचं मन जिंकून जातं. सही किंवा फोटोसाठी सेलिब्रिटींच्या पाठीमागे लागणं मला न आवडणारी गोष्ट आहे. परंतु एकदा बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात मंगेश तेंडुलकर या अस्सल माणसाबरोबर मी आवर्जून एक फोटो काढला. या एका फोटोमुळे सर्व आठवणी जाग्या झाल्या.