अगदी लहान असल्यापासून मला अभ्यासाबरोबर सुंदर अक्षर काढण्याची, चित्रकलेची आवड होती. त्यासाठी माझं सर्वत्र कौतुक होत असे. घरी वडिलांना मात्र मी चित्रकलेत रस न घेता अभ्यासात लक्ष द्यावं असं वाटे. एकदा सहावीत असताना मी अमिताभ बच्चन यांचं एक चित्र काढलं आणि वर्गातील मित्रांना दाखवायला म्हणून शाळेत नेलं. चित्र छान काढलंय म्हणून सगळे मित्र कौतुक करू लागले. चित्र पुनःपुन्हा पाहू लागले. मला खूप आनंद झाला. पुढील काही दिवस शाळेत 'बच्चनचं चित्र आणलंय का?' अशी मित्रांकडून विचारणा व्हायची आणि मी त्वरित त्यांना ते चित्र दाखवायचो. आमच्या गल्लीतल्या सर्व मित्रमंडळींनीही बच्चनच्या चित्राचं भरभरून कौतुक केलं. घराजवळच राहणाऱ्या वर्गातील एका मैत्रिणीला तर माझं चित्र इतकं आवडलं की तीने ते चित्र तिच्या घरी नेऊन सर्वांना दाखवलं व चित्र परत करताना 'तू चांगला चित्रकार होशील' म्हणाली. माझं चित्र सर्वांनाच आवडतंय म्हणून मी जाम खुश होतो.
सर्वांना चित्र दाखवून झालं आता एके दिवशी घरी वडिलांना चित्र दाखवायचं मी ठरवलं. माझे वडील ग्रामविकास अधिकारी होते. दुपारच्या सुट्टीत एकदा ते जेवायला घरी आले. जेवण वगैरे झाल्यावर मी अमिताभ बच्चन यांचं चित्र त्यांना दाखवलं. मला वाटलं आता आपलं जाम कौतुक होणार. पण वडिलांनी संतापानं ते चित्र टराटर फाडून टाकलं आणि म्हणाले, "असलं काहीतरी करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. चित्रकार होऊन पोटाला खाशील काय?" मला मोठा धक्का बसला. वडील दुपारच्या सुटीनंतर निघून गेले. त्यानंतर मी खूप रडलो. आपण फार मोठा गुन्हा केल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली. पुढील काही दिवस चित्रकलेच्या वहीचं तोंडही पाहिलं नाही. वर्गात मुलं विचारायची बच्चनचं चित्र कुठंय? मी हरवलं म्हणून सांगायचो. मन नाराज झालेलं होतं.
मी अभ्यासात चांगला होतो. कधी कधी फळ्यावर पहिल्या तीनमध्ये माझंही नाव असायचं पण मला त्याचं फारसं कौतुक नसायचं. काही विषयांत तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचो पण त्यातही मला मजा वाटत नव्हती. त्यापेक्षा चित्रकलेच्या तासाला मला खूप मजा यायची. मी घरची सगळी कामं करत असे. रॉकेल, दळण किंवा बाजार आणण्याचं काम माझ्याकडेच असे. त्यानिमित्ताने सायकल घेऊन गावात चालत सुंदर अक्षरातील दुकानावरच्या पाट्या पाहत पाहत मी पुढे जायचो. त्यावरील वळणदार अक्षरं, पेंटिंग्ज पाहून खूप मजा यायची. त्याचबरोबर गावातील गणेश बागेच्या भिंतीवरील चित्रे मला आकर्षित करायची. ती चित्रे मला जणू जाऊ नकोस इथेच थांब म्हणायची. खूप वेळ मी ती चित्रे पाहत बसायचो. सामान आणायला उशीर झाला म्हणून घरचे खूप ओरडायचे. पुढे प्रत्येक वेळी काम सांगण्याआधी 'उगाच कुठेतरी बोंबलत फिरू नकोस काम झालं की सरळ घरी ये' असं सांगितलं जायचं.
वडिलांचा विरोध असला तरी मी गुपचुप चित्रे काढतच राहिलो. एखाद्या वेळी चित्र काढत असलो आणि अचानक घरी वडील आले की पटकन मी चित्रकलेचं सामान कपाटाखाली सरकवायचो आणि अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसायचो. मी चित्रे काढतो हे वडिलांना माहिती होते पण अभ्यासही करत असल्यामुळे मला ते काहीही बोलत नव्हते.
पुढे दहावी झाल्यावर घरी एकदाच मी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जाण्याची माझी इच्छा बोलून दाखवली होती. कला क्षेत्रात करिअर करण्याचा हा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता. परंतु साहजिकच त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पुढे सायन्स शाखेतून मी बारावी केली. पुढे बीसीएसला प्रवेश घेतला. हे शिक्षण बाहेरगावी असल्याने इथे कुणाचा दबाव असण्याची शक्यता नव्हती. इथे मी अभ्यासाबरोबर मनसोक्त स्केचेस काढायचो. बीसीएसच्या पहिल्या दोन वर्षी बऱ्याचदा मी काढलेली स्केचेस कॉलेजच्या शोकेसमध्ये लागलेली असायची. कॉलेजच्या संस्थापकांचं काढलेलं स्केच तर अजूनही कार्यालयात लावलेलं आहे. येता जाता आपण काढलेली स्केचेस सगळे पाहतात हे बघून भारी वाटायचं.
पुढे मी पुण्यात आलो. एमसीएस करून सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर सुरू झालं आणि त्याबरोबर माझा आणि चित्रकलेचा संबंध कमीकमी होत गेला. लर्न आयएनसी या अमेरिकास्थित कंपनीत काम करत असताना माझा बॉस अनिक सिंगल याचं काढलेलं स्केच हे माझं शेवटचं स्केच होतं. तो ते स्केच अमेरिकेला घेऊन गेला. त्यानंतर आजवर मी पेन्सिलला हात लावलेला नाही.