जनाक्का शिंदे यांचा जन्म १८७८ साली कार्तिक महिन्यात जमखंडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई असे होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या. त्या वयाने विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान होत्या.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
रामजीबाबा व यमुनाबाई यांना सुरुवातीला सर्व मुलगेच झाले. भगिनी जनाक्का घरात जन्मलेली पहिलीच मुलगी होत्या. त्यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. त्या लहानपणी अंगाने गुटगुटीत, बुद्धीने चुणचुणीत व बोलक्या स्वभावाच्या होत्या. लहानपणी खेळताना त्यांची बंधू विठ्ठलराव यांच्याबरोबर सतत भांडणे होत. आई यमुनाबाई शांत व सहनशील स्वभावाच्या असल्याने दोघा भाऊ-बहिणींना आईचा तितकासा धाक वाटत नसे परंतु रामजीबाबांचा मात्र चांगलाच धाक असे. बाबा घरात असेपर्यंत घरात सर्वत्र शांतता असे. एकदाका बाबा बाहेर गेले की धांगडधिंगा सुरू. जनाक्कांचे बालपण असे मस्त मजेत चालले होते.
जमखंडीपासून जवळच एक आसंगी नावाचे गाव होते. तिथे गोपाळराव कामते नावाचे एक मोठे शेतकरी होते. शेतीशिवाय त्यांचा सावकारीचाही व्यवसाय होता. रामजीबाबांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांना लक्ष्मीबाई नावाची एक मुलगी व कृष्णराव नावाचा एक मुलगा होता. आपली मुलगी लक्ष्मीबाई हिला रामजीबाबांचे सुपुत्र विठ्ठलराव यांना द्यावी व त्यांची मुलगी जनाक्का हिला आपला मुलगा कृष्णराव यांस करून घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु विठ्ठलराव व लक्ष्मीबाई यांची पत्रिका जुळली नाही. त्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही. कृष्णराव व जनाक्का यांची मात्र पत्रिका जुळली. एकाच मंडपात जनाक्का, विठ्ठलराव आणि त्यांचे बंधू भाऊअण्णा यांचा विवाह पार पडला.
त्याकाळी लहान वयात लग्न होत असल्याने त्यावेळच्या प्रथेनुसार लग्न झाल्यानंतरही मुलगी १२ वर्षाची होईपर्यंत माहेरीच राहत असे. जनाक्कांचे सासरे गोपाळराव यांना शिक्षणाचे महत्व समजले होते. परंतु त्यांचा मुलगा कृष्णराव याला शिक्षणाची अजिबात आवड नव्हती. ही गोष्ट त्यांच्या मनाला त्रास देत असे. आपल्या मुलाला शिक्षणात रस नाही किमान सुनेने तरी शिकावे असे वाटून त्यांनी तसा निरोप रामजीबाबांना कळवला. त्यावेळी तिथले संस्थानिक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांच्या मदतीने जमखंडीस मुलींची शाळा सुरू झाली होती. ही शाळा सुरू करण्यासाठी रामजीबाबांनीच पुढाकार घेतला होता. तेव्हा जनाक्कांचा या शाळेत प्रवेश होऊन त्यांचे शिक्षण सुरू झाले.
जनाक्का माहेरी आपल्या आईवडिलांकडे लाडात अगदी मुक्त वातावरणात वाढलेल्या होत्या. झाडावर चढण्यात त्या अतिशय तरबेज होत्या. त्या जेव्हा ७-८ वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांना काही दिवसांसाठी सासरी पाठवण्यात आले होते. तेव्हा तिथे त्यांना झाडावर चढता येते हा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला होता. दिसायला उजळ, शिकलेली जमखंडीच्या रामजीबाबांची लेक सून म्हणून घरी येणार यामुळे जनाक्कांच्या सासू द्वारकाबाईंना खूप आनंद झाला होता.
जनाक्कांनी माहेरी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेतील कविता त्यांना तोंडपाठ झाल्या होत्या. त्याचबरोबर त्या अगदी स्पष्ट वाचू शकत असत. रामजीबाबा त्यांच्याकडून धार्मिक ग्रंथ वाचून घेत असत. इतक्या लहान वयात वाचनाची प्रचंड आवड निर्माण होऊन जनाक्कांनी बरेच वाचन केले होते.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई