जनाक्कांची वयाची १२ वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळच्या प्रथेनुसार त्यांची सासरी पाठवणूक करण्यात आली. सासरी गेल्यानंतर मात्र चौथीपर्यंतचे शिक्षण झालेल्या व वाचनाची आवड निर्माण झालेल्या जनाक्कांना वाचनासाठी काहीच मिळेना. त्यांचा काहीसा हिरमोड झाला. आपण आता माहेरी नाही आहोत याची जाणीव त्यांना झाली.
एकदा जनाक्का आपल्या नणंदांसमवेत पाणी भरण्यासाठी गेल्या असताना रस्त्यामध्ये त्यांना एक सरकारी कागदाचा तुकडा सापडला. घरी आल्यावर त्या जेव्हा तो कागद वाचू लागल्या तेव्हा तिच्या नणंदा मोठ्या उत्सुकतेने त्या कसे वाचतात ते पाहू लागल्या. गोपाळरावांचेही लक्ष होते. आपली सून सरकारी कागद वाचू शकते हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. इथून पुढे दिवाणजींची गरज नसून घरचा सगळा हिसाबकिताब आपली सूनच पाहील असे त्यांनी ठरवले. घरातील सर्व मंडळी जनाक्कांचे कौतुक करू लागली.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
सासरी जनाक्कांवर सर्वजण खुश असले तरी त्यांचे पती कृष्णराव मात्र अत्यंत नाखूश होते. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड नसल्याने त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे एकीकडे शिक्षण घेतले नाही म्हणून त्यांना पहिल्यापासूनच वडिलांची सतत बोलणी खावी लागत असत तर दुसरीकडे शिकलेली बायको हा मित्रमंडळींमध्ये त्यांच्या थट्टेचा विषय झाला होता. त्यात शिकलेल्या बायकोचे कौतुक सतत कानावर येत होते. त्यामुळे कृष्णरावांच्या मनात बायकोबद्दल अढी निर्माण होऊन दिवसेंदिवस त्यांचा तिच्याबद्दलचा राग वाढू लागला.
जनाक्कांचे सासर म्हणजे ४०-४२ माणसांचे भले मोठे कुटुंब होते. सकाळी लवकर उठल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत त्यांना कित्येक कामे करावी लागत. घरात आपलेपण जाणवत नव्हते. कृष्णराव रागराग करतच होते. त्यांनी जनाक्कांच्या हातचे जेवण करणे बंद केले. एवढेच नव्हे तर आपल्या डोळ्यांसमोर दिसू नये अशी सक्त ताकीदही दिली. मुलगा दुःखी असल्यामुळे सासूही जनाक्कांचा रागराग करू लागली.
दिवसेंदिवस कृष्णरावांचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते. जनाक्का १३-१४ वर्षांच्या होऊनही त्यांना स्त्रीत्व प्राप्त झालेले नव्हते. कृष्णरावांचा बाहेर पाय घसरू लागला होता. घरात सतत भांडणे होऊ लागली. कृष्णरावांनी बायकोला माहेरी पाठवा मी तिला नांदवणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. दुसऱ्या लग्नाची भाषा करू लागले. परिस्थिती इतकी चिघळली की जनाक्कांच्या जीवाला धोका निर्माण होण्याइतपत शंका येऊ लागली. सासू-नणंदा यांची वागण्या-बोलण्याची पद्धत बदलली. अशा परिस्थितीत सासु-सासऱ्यांनी जनाक्कांना काही दिवस माहेरी पाठवण्याचे ठरवले. माहेरी पाठवताना नवऱ्याने त्यांचे सर्व दागिने काढून घेतले.
जनाक्का माहेरी आल्या. जनाक्का माहेरी येताच तिकडे कृष्णरावांनी वडिलांच्या विरोधास न जुमानता दुसरे लग्न केले. या सर्व प्रकारामुळे जनाक्कांच्या माहेरी सर्वांना प्रचंड दुःख झाले. नुकतेच पुण्याहून इंटरची परीक्षा देऊन घरी आलेल्या विठ्ठलरावांना आपल्या बहिणीची अवस्था पाहून यातना झाल्या. एकूण परिस्थिती पाहता जोपर्यंत कृष्णराव स्वतः न्यायला येत नाहीत तोपर्यंत जनाक्कांना सासरी पाठवणार नाही अशी भूमिका विठ्ठलरावांनी घेतली. रामजीबाबा मात्र जनाक्कांना सासरी पाठवलेच पाहिजे या मताचे होते. एक तर कृष्णराव जनाक्कांच्या जीवावर उठले होते त्यात जनाक्काही जीव देण्याच्या गोष्टी करू लागल्या होत्या. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता विठ्ठलरावांनी जनाक्कांना सासरी न पाठवण्याचा निश्चय पक्का केला.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई