विठ्ठलराव पुण्यास शिक्षण घेत होते. जनाक्कांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. बहिणीस तिच्या पायावर उभे करावे. तिची पुढील शिक्षणाची व्यवस्था करावी या उद्देशाने १८९५ साली ते जनाक्कांना घेऊन पुण्यास आले. सोबतीला आई यमुनाबाईही होत्या. पुण्यात ते सदाशिव पेठेतील नागनाथ पारजवळील पालकर यांच्या वाड्यात राहू लागले.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
पुण्यात जनाक्कांची शिक्षणाची सोय करणे आवश्यक होते. आपल्या बहिणीने खूप शिक्षण घ्यावे व स्वावलंबी व्हावे असे विठ्ठलरावांना वाटत होते. त्यांनी सुरुवातीला जनाक्कांना चिमण्या गणपतीजवळील अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये घातले. मात्र विद्यार्थिनींना ख्रिश्चन धर्मात ओढण्याचा संस्थाचालकांचा डाव वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सहाच महिन्यात जनाक्कांचे नाव त्या शाळेतून काढून घेतले.
पंडिता रमाबाई रानडे यांनी पुण्यातील लष्कर भागात ‘शारदा सदन’ नावाची एक शाळा सुरू केली होती. ही बोर्डिंग शाळा होती. तिथे आपल्या बहिणीची काही सोय होईल का ते पाहण्यासाठी विठ्ठलराव पंडिता रमाबाईंना भेटण्यास गेले. परंतु तिथेही मुलींना ख्रिश्चन धर्मात ओढले जाण्याची शक्यता वाटल्याने त्यांनी अण्णासाहेब कर्वे यांची भेट घेतली. त्यांनी हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रमाची मंडळी’ ही विधवांसाठीची गरजू महिलांना आधार देणारी संस्था १८९६ साली स्थापन केली होती. परंतु त्यांनी ‘ब्राम्हणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही’ असे सांगून जनाक्कांना दाखल करून घेण्यास नाही म्हटले. सगळीकडे प्रयत्न करून झाले. कुठेही यश मिळाले नाही. अखेर विठ्ठलरावांनी जनाक्कांचे नाव हुजूरपागा नावाच्या मुलींच्या शाळेत इंग्रजी पहिल्या इयत्तेत घालण्याचे ठरवले. जनाक्कांचे जमखंडीत चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्याने इथे त्यांना प्रवेश मिळण्यासाठी तशी कोणतीच अडचण नव्हती. परंतु जनाक्कांच्या शिक्षणप्रवेशात येणाऱ्या समस्या काही थांबता थांबत नव्हत्या. इथेही एक नवी समस्या निर्माण झाली. शाळेने जनाक्कांच्या प्रवेशासाठी त्यांच्या पतींची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर विठ्ठलरावांनी मुख्याध्यापिका मिस् हरफर्ड व शाळेच्या एक नावाजलेल्या शिक्षिका मिस् मेरी भोर यांना आपल्या बहिणीची संपूर्ण हकिगत सांगितली. दोघीनांही ऐकून खूप वाईट वाटले. शाळेने जनाक्कांच्या नवऱ्याला एक पत्र पाठवून शाळेत दाखल करून घेण्यासाठी परवानगी मागितली. त्यावर उत्तरादाखल कृष्णरावांनी परवानगी नसल्याचे स्पष्टच कळवले. या उत्तरामुळे मिस् हरफर्ड व मिस् मेरी भोर यांना आणखीनच वाईट वाटले. त्यांनी जनाक्कांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी एक मार्ग काढला. जनाक्कांनी सासरचे आडनाव लावण्यापेक्षा माहेरचे शिंदे हे आडनाव लावून प्रवेश घ्यावा असे सांगितले. विठ्ठलराव त्वरित तयार झाले. जनाक्कांनी सासरचे कामते हे आडनाव काढून टाकले व माहेरचे शिंदे हे नाव लावले आणि त्यांचा पुण्यातील शिक्षणप्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला. हुजुरपागेत जनाक्का शिंदे यांचे शिक्षण सुरू झाले.
जनाक्कांना हुजुरपागेत प्रवेश मिळाला. आता विठ्ठलरावांच्या पुढे आर्थिक गणिते जुळवण्याचे आव्हान होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे जनाक्कांना मुधोळ संस्थानाची दरमहा दहा रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. १८९६ साली विठ्ठलरावांनी आपली पत्नी रुक्मिणीबाईंनाही पुण्यात आणून जनाक्कांबरोबर शाळेत घातले. पुण्यात तिघांचा खर्च भागवून जमखंडीस आईवडील व इतर भावंडांच्या खर्चाची तजवीज त्यांना करावी लागे.
पुण्यात शिक्षण घेत असताना जनाक्कांना पुण्यातील त्यावेळच्या प्रतिगामी वातावरणाचा सामना करावा लागला. पालकरांच्या वाड्यातून बाहेर पडून अनवाणी पायी शाळेत जाताना रस्त्यावरील लोक कुत्सितपणे त्यांच्या पोषाखावरून बोलत. त्यामुळे जनाक्कांना घाबरल्यासारखे होत असे. शाळेच्या जागी पूर्वी पागा असल्याने मुली शाळेत चालल्या की “ह्या बघा घोड्या चालल्या” असे पुरुषांबरोबर बायकाही बोलत असत. हा प्रकार विठ्ठलरावांना सांगितल्यावर ते जनाक्कांची समजूत काढत व अशा लोकांकडे दुर्लक्ष करून शिक्षणावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगत.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई