Sunday, May 30, 2021

भगिनी जनाक्का शिंदे ④

शिक्षण घेत असताना एकीकडे जनाक्का येणाऱ्या अडचणींचा सामना तर करतच होत्या परंतु दुसरीकडे त्यांना शाळेत एका नव्या जीवनपद्धतीचा परिचयही होत होता. हुजुरपागेतील शिक्षिका या आपले काम अतिशय निष्ठापूर्वक करणाऱ्या होत्या. मिस् हरफर्ड या मुलींचा व्यायाम व्हावा या उद्देशाने त्यांना विविध खेळ खेळायला लावत. मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा त्या स्वतःही खेळात भाग घेत. त्यांना स्वच्छता टापटीप आधुनिक पाश्चात्य पद्धतीची आवड होती. मुलींनीही तसेच स्वच्छ टापटीप वागावे अशी त्यांची अपेक्षा असे.

भगिनी जनाक्का शिंदे

१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली. विठ्ठलरावांना सर्वांना घेऊन काही काळ जमखंडीस जाणे भाग पडले.

हुजुरपागेत जनाक्कांना अनेक मैत्रिणी मिळाल्या. अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परतले होते. जनाक्का या मोकळ्या स्वभावाच्या होत्या. मनाने त्या खूप मोठ्या होत्या. त्यांच्यात एक प्रकारचा सेवाभावही वसत होता.

१८९८ साली विठ्ठलरावांनी आपल्या मित्रांसमवेत कोल्हापूर, पन्हाळगड, विशालगड अशी सहल केली. या सहलीत त्यांनी आपली बहीण जनाक्कांनाही सोबत घेतले होते. या सहलीत विठ्ठलरावांचे कोल्हापूरचे एक मित्र वासुदेव सुखटणकरही होते. विशालगडाकडे जात असताना वासुदेवरावांच्या विनंतीवरून विठ्ठलरावांनी पन्हाळ्यात त्यांच्या बहीणीकडे दोन-एक दिवस मुक्काम केला. तिथे जनाक्कांना वासुदेवरावांची ११-१२ वर्षाची आजारी बहीण शांता दृष्टीस पडली. ती नवज्वरातून कशीबशी वाचली होती. परंतु त्यातून वाचली तरी तिला पक्षाघात या विकाराने ग्रासले. तिची आई सुंदराबाई तिची सर्व काळजी घेत. तिचे अंग लटलटत असे, मान वर करता येत नव्हती, चालता येत नव्हते, डोक्यावरचे केस गेलेले होते, तिला बोलताही येत नव्हते. तिला अशा परावलंबी अवस्थेत बघून तिचे पुढे कसे होईल या विचाराने जनाक्कांचे मन अगदी व्यथित झाले.

डॉ. रा. गो. भांडारकर हे हुजुरपागा शाळेच्या प्रमुख चालकांपैकी एक होते. शाळेतील काही मुली स्वखुशीने प्रार्थनासमाजात जाऊ लागल्या होत्या. जनाक्कांनाही जाऊ वाटत होते. त्यांनी आपल्या बंधूंकडे विठ्ठलरावांकडे परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. जनाक्का प्रार्थनासमाजात जाऊ लागल्या. डॉ. भांडारकरांसारख्या विद्वान व्यक्तींच्या उपासना ऐकून त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली. प्रार्थना सुरू झाल्यावर त्या अगदी तल्लीन होऊन जात. अशा प्रकारे जनाक्का या १८९८ साली बंधू विठ्ठलरावांच्या आधी प्रार्थनासमाजात जाऊ लागल्या.

जनाक्कांचे शिक्षण व्यवस्थित सुरू होते. तिकडे विठ्ठलरावही त्यांच्या स्वतःच्या शिक्षणबद्दल दक्ष होते. लवकरच ते धर्मशिक्षणासाठी विलायतेस जाणार होते. ते विलायतेस जाणार या बातमीने त्यांच्या घरी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. रामजीबाबांची तर तब्येतच बिघडली. त्यामुळे वडिलांना पाहण्यासाठी विठ्ठलराव जनाक्कांना घेऊन १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात जमखंडीस गेले. त्यावेळी आपल्याच घरी जनाक्कांनी वासुदेव सुखटणकरांची बहीण शांता हिला पुन्हा एकदा पाहिले. वासुदेवराव सुखटणकर हे सारस्वत ब्राह्मण होते. तेही सुधारकी विचाराचे होते. त्यांचे वडील एकाएकी वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईचे केशवपन न करण्याचे त्यांनी ठरवले. लोकांच्या टीकेपासून दूर राहण्यासाठी त्यांनी आपली आई, बहीण शांता व धाकटा भाऊ राजाराम या तिघांना विठ्ठलरावांच्या परवानगीने जमखंडीस ठेवले होते. इथेही शांताची आईच तिची सर्व काळजी घेत असे. जनाक्कांची बहीण चंद्राक्काही तिची सेवा करण्यात मदत करत असे.

संदर्भ :
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‌मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More