सीताराम पटवर्धन उर्फ अप्पा यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी रत्नागिरीजवळील आगरगुळे या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम व आईचे नाव राधा होते. सात मुले व चार मुली अशा एकूण ११ भावंडांपैकी अप्पासाहेब पाचवे होते.
अप्पांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. १९११ साली अप्पा मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा पाचवा नंबर येऊन उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९१६ साली अप्पा बी.ए. प्रथम वर्गात पास झाले. १९१७ साली अप्पा एम.ए. चा अभ्यास करू लागले. या काळात अप्पांना पुण्यातील न्यू कॉलेजमध्ये [आताचे एस.पी. कॉलेज] प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन |
अप्पा एस.पी. कॉलेजच्या वसतिगृहात अनेकदा वाढपी म्हणून काम करायचे. एकदा तर अप्पा पुण्यातील भर रस्त्यावरून आपले सामान डोक्यावर घेऊन वसतिगृहाकडे निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा त्यांचा भाऊ म्हणाला, “डोक्यावर का?” त्यावर अप्पा उत्तरले, “जोपर्यंत पांढरपेशे असे करणार नाहीत तोपर्यंत हमाल मजुरांनीच डोक्यावर ओझे घ्यायचे असते असा समज राहील.”
अप्पांच्या वाचनात अगदी तरुण वयात जॉन रस्कीनचे ‘अंटू धीस लास्ट’ हे पुस्तक आले. ह्या पुस्तकाचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यांना कृत्रिम किंवा चैनीचे आयुष्य जगणे खोटेपणाचे वाटू लागले. अगदी साधं आयुष्य जगण्याची ओढ त्यांच्यात निर्माण झाली.
अगदी कळायला लागल्यापासून अप्पांचा कल ब्रम्हचर्याकडे कल होता. त्यांनी आजन्म ब्रम्हचर्याचे पालन केले.
१९१९ साली मार्च महिन्यात महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या रौलट अॅक्ट सत्याग्रहात अप्पांनी सामील व्हायचे ठरवले. अप्पांनी आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा देऊन सत्याग्रहात आपले नाव नोंदवले. नाव नोंदवून घेण्यासाठी महादेवभाई देसाई यांच्यासह गांधीजी स्वतः हजर होते. पुढे मे महिन्यात अप्पासाहेब गांधीजींना भेटायला मुंबईत मणीभवन येथे गेले. गांधीजींनी अप्पासाहेबांकडे पाहिले आणि स्वतःच बोलण्यास सुरुवात केली, “मी अलीकडेच यंग इंडिया हे अर्धसाप्ताहिक चालवायला घेतले आहे. महादेव म्हणतात तुमचा या कामात चांगलाच उपयोग होऊ शकेल. आहे का खुशी या कामात सहभागी भाग घेण्याची?” आप्पांनी त्वरित होकार दिला. घरखर्च व स्वतःचा मासिक खर्च यासाठी आप्पांची ५० रुपयांची मागणी गांधीजींनी मान्य केली. अशा प्रकारे प्राध्यापक म्हणून २०० रुपयांची नोकरी सोडून अप्पा गांधीजींसोबत आले.
गांधीजींनी ह्याच वर्षी म्हणजे १९१९ साली आप्पासाहेबांना मिठाच्या कायद्याचा अभ्यास करायला सांगितले. अप्पांनी अत्यंत कष्टपूर्वक बारकाईने या कायद्याचा अभ्यास केला. वेळोवेळी गांधीजी आणि अप्पा यांच्यात बैठका होत. गांधीजींनी प्रत्यक्ष १९३० साली मिठाचा सत्याग्रह केला पण त्याची पूर्वतयारी किती आधीपासून केली होती ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे.
अप्पांनी साबरमतीच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले. तिथे त्यांची आचार्य विनोबा भावे यांच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये तत्वज्ञान विषयांवर चर्चा झाली. तिथे विनोबा संस्कृत व अप्पा इंग्रजी विषय शिवकत. पुढे गुजरात विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा अप्पा तिथे तत्वज्ञान शिकवू लागले.
अप्पांनी गांधीजींना अगदी सुरुवातीलाच सांगितले होते, “चरखा प्रसार हाच माझ्या कार्याचा मध्यबिंदू राहील. मी गावी घरी राहू इच्छितो. वृद्ध आईची सेवा घडेल व कामही होईल.” त्याप्रमाणे १९२१ साली अप्पा आपल्या जन्मभूमीकडे म्हणजे रत्नागिरीकडे परतले. गांधीजींनी त्यास हरकत घेतली नाही. अप्पांनी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय शाळेत अध्यापन केले. खादी ग्रामोद्योगाचा प्रसार केला. विणकरांच्या परिस्थितीची पाहणी केली. अस्पृश्यता निवारण, कुणबी शिक्षण, कुळ कायदा त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही काम केले.
पुरोगामी विचारांच्या लोकमान्य टिळकांच्या मुलांनी रामभाऊ आणि श्रीधरपंत यांनी ८ एप्रिल १९२८ साली आज ज्याला केसरीवाडा म्हणून ओळखले जाते त्या गायकवाड वाड्यामध्ये समता संघाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कार्यक्रमात गायकवाड वाड्याच्या ग्रंथालयामध्ये अस्पृश्यांसह सहभोजन ठेवण्यात आले होते. तिथे बोलताना अप्पासाहेब म्हणाले, "केवळ सहभोजन पुरेसे नाही. त्याहून अधिक महत्वाचे आहे उपयुक्त व आवश्यक पण घृणित मानल्या गलेल्या धंद्याबाबतची घृणा मोडून काढणे. त्याकरिता आपण न्हावी कामही केले पाहिजे." कार्यक्रम संपल्यावर सगळे जेवण करून पसार झाले. उष्टी काढण्यासाठी एका भंग्यालाच बोलावले होते. त्याने व आप्पांनी उष्टी काढली. त्यावर अप्पा म्हणाले, "माझा कार्यक्रम माझ्या एकमताने पास होऊन तात्काळ आमलातही आला."
१९३० साली अप्पांनी एक अत्यंत महत्वाचे काम केले. त्यांनी महात्मा गांधीजींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्राचे मूळ गुजरातीतून मराठीत भाषांतर केले. अप्पासाहेबांमुळे गांधीजींचे आत्मचरित्र मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले. विशेष म्हणजे यासाठी अप्पांनी कोणतेही मानधन घेतले नाही. नवजीवन प्रेसकडून त्यांनी पुस्तकाची फक्त एक प्रत घेतली.
संदर्भ:
- कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन (चरित्र) - प्रा. सतीशचंद्र तोडणकर
- श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख