धर्मानंदांची पुण्यातील या वास्तव्यात महात्मा गांधीजींशी पहिल्यांदा भेट झाली. आचार्य कृपलानी एकदा पुण्याला आले होते. त्यावेळी काकासाहेब कालेलकर यांच्यामुळे धर्मानंदांची आचार्य कृपलानी यांच्याशी ओळख व पुढे मैत्री झाली होती. पुढे १९१६ साली गांधीजी पुण्याला आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कृपलानीही होते. याच वेळी कृपलानी यांनी धर्मानंदांची गांधीजींशी भेट घडवून आणली.
महात्मा गांधी |
पहिल्या अमेरिका भेटीत ‘विशुद्धीमार्ग’ या बौद्धग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे ते काम तडीस नेण्याच्या उद्देशाने हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वुड्स हे धर्मानंदांना पुन्हा अमेरिकेस येण्यासाठी पत्राद्वारे आग्रह करत होते. विशुद्धीमार्गाचे काम पूर्ण करण्याची ही छान संधी आहे असे समजून धर्मानंदांनी सहा वर्षांनंतर दुसर्या वेळेस अमेरिकेला जाण्याचे ठरवले. फर्ग्युसन कॉलेजने त्यांना कॉलेज सोडून जाऊ नये म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पगार इतर सभासदांइतका १०० रुपये करण्याचीही तयारी दर्शवली. अखेर कॉलेजने त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांना दोन वर्षाची बिनपगारी रजा दिली.
या वेळी धर्मानंद आपल्याबरोबर मोठी मुलगी माणिक व मुलगा दामोदर यांना शिक्षणासाठी अमेरिकेत घेऊन गेले. बाळाबाईंची तब्येत बिघडल्याने धर्मानंदांनी त्यांना मुलींबरोबर गोव्याला पाठवले. याही अमेरिका भेटीत विशुद्धीमार्गाचे काम प्रोफेसर ल्यानमन यांच्या दुराग्रहामुळे होऊ शकले नाही. पाली भाषा शिकवणे आणि इतर पाली ग्रंथांच्या संपादनाची कामे करणे अशी कामे त्यांनी केली. या काळात धर्मानंदांची हार्वर्डमधील पोलंडचे रहिवासी असलेले लिओ वीनर यांच्याशी मैत्री झाली. ते स्लाव्ह भाषांचे प्राध्यापक होते. धर्मानंद त्यांच्याकडून रशियन भाषा शिकले. दरम्यान माणिकताईंनी रॅडक्लिफ कॉलेजमधून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. धर्मानंदांचेही अमेरिकेतील काम संपत आले होते. त्यामुळे दामोदरला शिक्षणासाठी मागे ठेवून धर्मानंद चार वर्षांनंतर मुलीसह भारतात मुंबईत परतले.
धर्मानंद माणिकसह मुंबईत पोहोचल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या पत्नी बाळाबाई गोव्याहून मुंबईस आल्या. धर्मानंद कुटुंबासमवेत बोरिवलीस राहू लागले. आर्थिक अडचणी होत्या. दामोदरला अमेरिकेत पैसे पाठवावे लागत होते. त्यामुळे धर्मानंदांना चांगली नोकरी शोधण्याची गरज होती. महात्मा गांधींनी राष्ट्रीय शिक्षणाची एक संस्था अहमदाबाद येथे काढली होती. या संस्थेची वाढ करून तिला गुजरात विद्यापीठ असे नाव दिले होते. येथे जुन्या वाङ्मयाचे संशोधन करण्यासाठी 'पुरातत्व मंदिर' नावाचा विभाग होता. महात्मा गांधीजींशी १९१६ सालीच धर्मानंदांची ओळख झाली होती. गांधीजींनी या मंदिरात काम करण्यासाठी धर्मानंदांच्या नावास पसंती दर्शवली. इतर विद्वान मंडळींना पुरातत्व मंदिरात काम करण्यासाठी २५० रुपये वेतन द्यायचे ठरले होते, पण धर्मानंदांना मात्र त्यांची गरज लक्षात घेऊन १०० रुपये जास्त देण्याचे गांधीजींनी ठरवले होते. धर्मानंदांनी गुजरात विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली.
धर्मानंदांनी या काळात 'बौद्ध संघाचा परिचय', 'समाधीमार्ग', 'बुद्धचरीत' हे महत्वाचे ग्रंथ लिहिले. जैन वाङ्मयाची ओळखही त्यांना याच काळात झाली. तिकडे केंब्रिज हाय अँड लॅटिन स्कूलमधून दामोदर अतिशय उत्तमरीत्या शालांत परीक्षा पास झाला. त्याला घरची सतत आठवण येत असल्यामुळे धर्मानंदांनी त्याला भारतात बोलावून घेतले. त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्याऐवजी दामोदर भारतात परतला. इथे त्याला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल व त्यामुळे आपला खर्च कमी होईल असे धर्मानंदांना वाटले. वडिलांचे कर्ज तर त्यांनी मागेच फेडून टाकले होते. त्यामुळे त्यांनी गुजरात विद्यापीठातील आपले वेतन एकदम १५० रुपयांनी कमी करून घेतले व जास्त वेतन स्वीकारण्याच्या धर्मसंकटातून आपली मुक्तता करून घेतली.
गुजरात विद्यापीठात काम करून तीन वर्षे पूर्ण होत आली होती. याच दरम्यान हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वूड्स यांचे धर्मानंदांना पुन्हा अमेरिकेस येण्याचे पत्राद्वारे निमंत्रण आले. विशुद्धीमार्गाचे काम ज्यांच्यामुळे अपूर्ण राहिले होते ते प्रोफेसर ल्यानमन सेवानिवृत्त झाले होते. विशुद्धीमार्गाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची आलेली ही संधी स्वीकारण्याबद्दल त्यांनी धर्मानंदांना लिहिले होते. विशुद्धीमार्गाचे काम पूर्ण व्हावे असे धर्मानंदांना मनापासून वाटत होते. दामोदरने अमेरिकेत दिलेल्या शालान्त परीक्षेला इथे मान्यता नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्याला घेऊन धर्मानंद परत अमेरिकेला गेले. धर्मानंदांची अमेरिकेस जाण्याची ही तिसरी वेळ होती. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी दामोदरची हार्वर्डमध्ये शिक्षणाची सोय करून दिली. मागील दोन्ही वेळेस पूर्ण न होऊ शकलेले विशुद्धीमार्गाचे सर्व काम त्यांनी पूर्ण करून छापून संपवले. या वेळी दीड वर्ष अमेरिकेत राहून धर्मानंद भारतात परतले.
धर्मानंदांच्या पत्नीची बाळाबाईंची भारतातील तीर्थयात्रा करण्याची खूप इच्छा होती. अमेरिकेची तिसरी सफर संपवून भारतात परतल्यावर धर्मानंदानी आपल्या पत्नीची ही इच्छा पूर्ण केली. जवळपास दोन महिने तीर्थयात्रा करून त्यानंतर ते गुजरात विद्यापीठात जाऊन राहिले. या ठिकाणी ते चार पाच महिने होते. या काळात विद्यापीठासाठी त्यांनी दोन पुस्तके तयार केली. 'मज्झिमनिकाय'च्या पन्नास सूत्रांचा सारांश आणि 'सुत्तनिपाताचे' मराठी भाषांतर त्यांनी केले.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’