याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला भेट देऊन आले होते. त्यांचा रशियावरचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या लेनिनग्राड येथील एका संस्थेविषयी लिहिले होते. हा मजकूर वाचून धर्मानंदांना सोविएत रशियाला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी जवाहरलालजींना पत्र लिहून त्यांचा सल्ला विचारला. त्यास आलेल्या उत्तरात "आपण रशियाला अवश्य जावे, तेथील अनुभव फार उपयोगी पडतील" असे त्यांनी लिहिले होते. सोबत संपर्क साधण्यासाठी पत्ताही पाठवला. धर्मानंद सोविएत रशियाला गेले. रशियातील 'अॅकॅडमी ऑफ सायन्सेस', लेनीनग्राड विद्यापीठ येथे त्यांनी पाली भाषा शिकवण्याचे काम केले. मॉस्को व इतर शहरांना भेटी दिल्या. एक वर्ष रशियात राहून धर्मानंद भारतात परतले.
१२ मार्च १९३० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात झाली. धर्मानंदांनी सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरवले. शिरोड्याच्या मीठ सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना कैद होऊन लगेच सोडून देण्यात आले. त्यानंतर धर्मानंद शिरोड्याहून विलेपार्ले येथील छावणीत आले. मुंबईतील कामगार वर्गात सत्याग्रह चळवळीचा प्रसार झाला नव्हता. काँग्रेसच्या मुंबई प्रांतिक कमिटीने हे काम धर्मानंदांना दिले. पुढे धर्मानंदांकडे पार्ला छावणीचे प्रमुखपद आले. छावणीवर छापा पडून धर्मानंद स्वयंसेवकांसह पकडले गेले. यात अटक होऊन त्यांना एक वर्षाची सक्तमजुरी व दोनशे रुपये दंड आणि हा दंड न दिल्यास आणखी तीन महीने कैद अशी शिक्षा झाली. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पाठवले गेले. परंतु, उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने काहीच दिवसात धर्मानंदांची सुटका झाली.
धर्मानंदांना शिक्षा होऊन तुरुंगवास भोगावा लागला आहे ही बातमी जेव्हा अमेरिकेत डॉ. जेम्स वूड्स यांना समजली तेव्हा त्यांनी तेथून १०० डॉलर्स धर्मानंदांच्या मुलीकडे पाठवून देऊन त्यांची तुरुंगात योग्य व्यवस्था ठेवण्यास कळवले होते. नंतर धर्मानंद तुरुंगातून सुटल्याचे कळताच, धर्मानंदांच्या मागे लागून आग्रहपूर्वक डॉ. वूड्स यांनी त्यांना अमेरिकेस बोलावून घेतले. ही धर्मानंदांची अमेरिकेची चौथी व अखेरची सफर. धर्मानंद तेथे एक वर्ष राहिले. या एक वर्षात त्यांनी इतर काही राहिलेल्या पाली ग्रंथांच्या संपादनाची कामे पूर्ण केली. अमेरिकेहून परतताना ते रशियामार्गे आले. रशियात दोन आठवडे राहून नंतर भारतात आले.
भारतात परतल्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी पुण्यातच काढली. या काळात त्यांनी दामोदरसाठी पुण्यात बांधत असलेल्या बंगल्याचे काम स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले.
धर्मानंदांना तरुणपणीच मधुमेह या विकाराने ग्रासले होते. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ते करत असत. परंतु, उतारवयात त्यांचा त्रास वाढत चालला होता. तरीही धर्मानंद कामाच्या निमित्ताने बनारस हिंदू विद्यापीठ, काशी विद्यापीठ, सारनाथ या ठिकाणी काही काळाकरीता फिरत राहिले. मुंबईत परळ येथे त्यांनी 'बहुजन विहार' स्थापन केला. या विहारात त्यांनी आपल्याला हवे तसे काम केले. पुढील काळातही पुणे, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद या ठिकाणी ते येत-जात राहिले. आपली कर्तव्ये करत राहिले.
धर्मानंद सत्तरीत पोहोचले होते. त्यांचे शरीर आता थकले होते. मधुमेहाचा त्रास खूपच वाढला होता. अंगाला खाज सुटून त्यांना रात्री झोप येत नसे. यापुढे आपल्या हातून फार काम होणार नाही याची जाणीव त्यांना झाली होती. आपले इहलोकीचे कार्य संपले असेल तर पुढे आपण या समाजावर भार म्हणून का जगावे असे त्यांना वाटू लागले. तेव्हा जैन धर्मातील 'मरणांतिक सल्लेखन' या व्रतानुसार म्हणजेच आमरण उपवास करून देह सोडण्याचे धर्मानंदांनी ठरवले. त्यानुसार गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात त्यांनी उपोषण सुरू केले. गांधीजींना ही गोष्ट कळवण्यात आली. आपल्या अखेरच्या क्षणी भावनिकता टाळण्यासाठी कुटुंबीयांना भेटायला येण्यास धर्मानंदांनी मनाई केली. मृत्यूनंतर आपल्या अंत्यसंस्कारासाठी नवीन कपडे न आणता जुनेच वापरा, दहन व दफन यात कमी खर्च येईल तेच करा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी आश्रमाचे व्यवस्थापक बलवंतसिंहजींना देऊन ठेवल्या.
४ जून १९४७ रोजी दुपारी बारा वाजता धर्मानंदांनी आता आपली जाण्याची वेळ झाल्याचे बलवंतसिंहजींना सांगितले. दुपारी दोन वाजता ते थोडेसे पाणी प्याले. त्यानंतर त्यांनी सर्व दारे-खिडक्या उघडण्यास सांगितले. हळूहळू त्यांचे शरीर शिथील होत गेले व दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली..
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’