Monday, January 08, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ① बालपण व सुरूवातीचे शिक्षण

दामोदर कोसंबी यांचा जन्म ३१ जुलै १९०७ रोजी गोवा येथे झाला. दामोदरच्या जन्माच्या वेळी धर्मानंद कलकत्त्याला नोकरीला होते. घरातील थोरल्या मुलास आजोबाचे नाव ठेवायची त्या काळी प्रथा होती. त्यानुसार ‘दामोदर’ हे ठेवण्यात आले होते. तब्येतीने आधीच अशक्त असलेला दामोदर लहानपणी सर्दी, खोकला व ताप येऊन सतत आजारी पडत असे. त्यामुळे आई बाळाबाई त्याची खूप काळजी घेत. त्याचे लाडही करत. कुटुंबातील सदस्य त्याला प्रेमानं ‘बाबा’ या टोपणनावानं संबोधत. दामोदरची पहिली जवळपास पाच वर्षे गोव्यातच गेली. त्यामुळे त्याला मराठीबरोबरच कोंकणी भाषादेखील अवगत होती.

दामोदर कोसंबी

अमेरिकेचा पहिला दौरा करून आल्यानंतर धर्मानंदांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी पत्करली. त्यामुळे त्यांनी आपले कुटुंब पुण्यास आणले. धर्मानंदांनी १९१२ ते १९१८ अशी सलग सहा वर्षे पुण्यात काढली. या काळात कोसंबी कुटुंब रविवार पेठेत, मोती चौकातील एका चिंचोळया घरात पहिल्या मजल्यावर राहत होते. धर्मानंद-बाळाबाईंना पहिली माणिक नावाची मुलगी होती. त्यानंतर दामोदरच्या पाठीवर त्यांना मनोरमा व कमला अशा आणखी दोन मुली झाल्या.

दामोदरच्या शिक्षणाची सुरुवात पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाली. लहानपणीच शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून त्याने ख्याती प्राप्त केली. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शाळेतील शिक्षकांना त्याने आपल्याकडे आकर्षित केले. वर्गात जर एखाद्या अवघड प्रश्नाचे उत्तर कोणालाच देता आले नाही तर शिक्षक शेवटी तो प्रश्न दामोदरला विचारत व दामोदरही चुटकीत त्याचे उत्तर देत असे. त्यामुळे शाळेतील शिक्षक त्याला प्रेमानं अभिमन्यू म्हणत. वयाची आठ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच दामोदर पाचव्या इयत्तेची परीक्षा पास झाला व अकरावे वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तो आठवीची परीक्षा पास झाला. इतक्या जलद गतीने त्याने इयत्ता पार केल्या.

धर्मानंदांच्या पहिल्या अमेरिका भेटीत ‘विशुद्धीमार्ग’ या बौद्धग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे ते काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. जेम्स वुड्स हे धर्मानंदांना पुन्हा अमेरिकेस येण्याचा पत्राद्वारे आग्रह करत होते. त्यांच्या आग्रहास मान देत धर्मानंद दुसर्‍या वेळेस अमेरिकेला जाण्यास निघाले होते. त्यांची मोठी मुलगी माणिक त्यावेळी कॉलेजची पूर्वपरीक्षा पास झाली होती. तिला पुढील शिक्षणासाठी आपल्याबरोबर अमेरिकेला नेण्याचे धर्मानंदांनी आधीच ठरवले होते. दामोदर व मुलींच्या शिक्षणासाठी बाळाबाई पुण्यातच राहणार होत्या. परंतु त्याच सुमारास बाळाबाईंची तब्येत बिघडली. त्यामुळे धर्मानंदांनी त्यांना मुलींबरोबर गोव्याला पाठवले. दामोदर त्यावेळी आठवी इयत्ता पास झाला होता. तो प्रकृतीने अशक्त होता. त्याला एकट्याला पुण्यात ठेवणे शक्य नव्हते. त्यावेळी मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्यासाठी वयाची अट १७ वर्षे होती. दामोदर १४ व्या वर्षीच मॅट्रिकच्या वर्गात पोहोचणार होता. त्यामुळे त्याची तीन वर्षे वाया जाण्याची शक्यता होती. म्हणून अखेर माणिकबरोबर त्यालाही अमेरिकेला नेण्याचे ठरविण्यात आले.

संदर्भ :
  • धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
  • दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
  • उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्‌मय प्रकाशन २००७
  • संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
  • २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More