पहिले महायुद्ध सुरू असल्यामुळे त्यांची बोट सिंगापूर, जपान मार्गे चार महिन्यांनंतर अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे पोहोचली. तिथून पुढे आगगाडीने बोस्टनला जात असताना वाटेत एकाएकीच दामोदरच्या अंगात ताप भरला. त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला. माणिक घाबरली. रात्रीची वेळ होती. गाडीतील इतर यात्री झोपले होते. धर्मानंदांनी दामोदरला थोडे थोडे करून पाणी पाजले. त्याने त्याला काहीसे बरे वाटू लागले. धर्मानंद व माणिक रात्रभर त्याच्याजवळ बसून राहिले. त्याला इन्फ्लुएंझा झाला होता. बोस्टनला पोहोचण्यापूर्वी दामोदर बरा झाला. परंतु, त्याच्या अंगातला अशक्तपणा जाण्यास मात्र पुढे बरेच दिवस लागले.
![]() |
दामोदर कोसंबी |
बोस्टनला पोहोचल्यावर धर्मानंद आपल्या दोन्ही मुलांसह केंब्रिज येथे स्थायिक झाले. धर्मानंदांनी माणिकला रॅडक्लिफ कॉलेजमध्ये दाखल केले. बौद्धिक शिक्षणाचा हिंदुस्थानला काही फायदा नाही असे दामोदरचे म्हणणे होते. त्यामुळे धर्मानंदांनी सुरूवातीला त्याला ‘रिंज टेक्निकल हायस्कूल’ मध्ये दाखल केले. परंतु, दामोदर प्रकृतीने अशक्त होता त्यात त्याची तब्येत इन्फ्लुएंझाने खालावलेली होती. त्यामुळे शारीरिक श्रमाची अवजड कामे त्याच्याकडून होणे कठीण होते. मात्र काहीच दिवसांनी दामोदरच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज आल्याने हायस्कूलचे प्राचार्य मि. वूड यांनी धर्मानंदांना बोलावून घेतले व त्यांना असा सल्ला दिला की, दामोदरने आधी हायस्कूलचे शिक्षण घ्यावे आणि मग टेक्नोलॉजिकल इंस्टीट्यूटमध्ये जाऊन उत्तम इंजिनीअर व्हावे. धर्मानंदांनी प्राचार्यांचा सल्ला मानला व दामोदरच्या इच्छेविरुद्ध त्याला घरापासून जवळच असलेल्या ‘हार्वर्ड ग्रामर स्कूल’ मध्ये दाखल केले. तेथे कोणतीही फी नव्हती शिवाय अभ्यासाची पुस्तकेही मिळत. त्यामुळे शिक्षणाचा काहीच खर्च नव्हता. हार्वर्ड ग्रामर स्कूलमध्ये शिकत असताना दामोदरने अभ्यासाबरोबर आपल्या तब्येतीकडेही चांगलेच लक्ष दिले. रोज जिममध्ये जाऊन शरीर कमावले. वजन व ऊंची वाढून बघता बघता तो प्रकृतीने धिप्पाड दिसू लागला.
हार्वर्ड ग्रामर स्कूलमध्ये एक वर्ष पूर्ण केल्यानंतर दामोदर ‘केंब्रिज हाय अँड लॅटिन स्कूल’ मध्ये दाखल झाला. अभ्यासाबरोबरच इथं तो ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंचसह अनेक भाषा शिकला. कोणताही विषय अगदी मूळापासून समजून घेण्याची शिकवण धर्मानंदांनी दामोदरला दिली होती. शाळेच्या ग्रंथालयात विज्ञानाबरोबरच विविध विषयातील अतिशय उत्तम दर्जाची पुस्तके उपलब्ध होती. दामोदरने खूप वाचन केले. अॅलेक्झांडर वॉन हंबोल्ट यांचे 'कॉसमॉस' त्याचबरोबर एच. जी. वेल्स यांचे 'आऊटलाईन ऑफ हिस्टरी' या पुस्तकांनी त्याच्या मनात घर केले. अल्बर्ट आईनस्टाईन, फ्रॉईड, लुई पाश्चर, क्लॉड बर्नार्ड इत्यादी दिग्गजांच्या आपापल्या क्षेत्रातील कामाने तो खूपच प्रभावित झाला. अभ्यासाबरोबरच दामोदर जिममध्ये जाणे, ट्रेकिंगला जाणे त्याचबरोबर हिवाळ्यात बर्फावरचे स्केटिंग करणे या गोष्टी करत असे. त्याने स्काऊटिंगच्याही निरनिराळ्या कार्यक्रमात भाग घेऊन त्यात विशेष प्राविण्य संपादन केले होते. एवढेच नव्हे तर त्यात त्याने ईगल हा किताबही मिळवला.
धर्मानंदांचा हार्वर्ड विद्यापीठातील कामामुळे अनेक विद्वानांशी संपर्क येत असे. हे विद्वान लोक कित्येक वेळा घरीही येत असत. त्यांच्या धर्मानंदांशी विविध विषयांवर चर्चा होत असत. या चर्चा दामोदरच्या कानावर पडत असत. काही विद्वानांशी दामोदरचीही ओळख होत असे. हार्वर्डमधील पोलंडचे रहिवासी असलेले लिओ वीनर हे स्लाविक भाषांचे प्राध्यापक होते. ते धर्मानंदांना रशियन भाषा शिकवण्यासाठी येत असत. त्यानिमित्ताने दोन्ही कुटुंबांचा एकमेकांशी स्नेह जुळला. लीओ वीनर यांचे सुपुत्र नॉर्बर्ट वीनर यांच्याशी दामोदरची मैत्री झाली. या दोघांमध्ये अनेक बाबतीत साम्य होते व त्यांचे विचारही जुळत. नॉर्बर्ट दामोदरपेक्षा १२-१३ वर्षांनी मोठे होते. त्यांची पत्नी व दामोदरची मोठी बहीण माणिक एकाच वर्गात शिकत. नॉर्बर्ट यांच्या शिक्षणासाठी लिओ वीनर यांनी खूप कष्ट घेतले होते. नॉर्बर्ट यांनी एम.आय.टी.च्या गणित विभागात अतिशय महत्वपूर्ण संशोधन करून सायबरनेटिक्स शास्त्राचे जनक म्हणून किर्ती मिळवली. वयाची १९ वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. नास्तिक व मानवतावादी विचार असणार्या नॉर्बर्ट यांचे प्रस्थापितांशी कधीच पटले नाही. समाजातील गरीब व वंचित घटकांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती होती. अमेरिकेतील अत्यंत नावाजलेले गणिती असूनही दुसर्या महायुद्धाच्या काळात नॉर्बर्ट यांनी अणुबॉम्ब निर्मितीसाठीच्या मॅनहॅटन प्रकल्पात सहभागी होण्यास नापसंती दर्शवली होती. परंतु, बचावाशी संबंधित विमानविरोधी तोफांचा मारा अचूक बनविण्याच्या प्रकल्पावर मात्र त्यांनी काम केले. मानवजातीचे कल्याण होईल अशाच गोष्टीत रस असल्यामुळे पुढे त्यांनी लष्करी संशोधन पुर्णपणे बंद करून टाकले. पुढे ते जागतिक शांतता चळवळीशी जोडले गेले.
माणिकने रॅडक्लिफ कॉलेजमधून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. धर्मानंदांचेही अमेरिकेतील काम संपत आले होते. त्यामुळे जवळपास चार वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर माणिकला घेऊन ते भारतात परतले. दामोदरचे शिक्षण सुरू असल्यामुळे उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला तेथेच ठेवले. दामोदर वसतिगृहात राहू लागला. वसतिगृहात दामोदरचे व्यक्तिमत्व आणखी संपन्न होत गेले. अभ्यासाबरोबरच जिममध्ये जाणे, कॅफेटेरियामध्ये जाणे, केंब्रिज गावातील मित्रमंडळींना भेटणे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे या गोष्टी तो करत असे. शाळेच्या शेवटच्या वर्षी त्याने पोहणे, धावणे या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले. निबंध स्पर्धेत भाग घेऊन त्यात नंबरही मिळवला. कोणतीही गोष्ट थोडीशी जरी समजली तरी इतर विद्यार्थी समाधानी होत परंतु दामोदर मात्र ती गोष्ट स्पष्टपणे समजल्याशिवाय स्वस्थ बसत नसे. चाकोरीबद्ध मार्ग सोडून काहीतरी हटके करून प्रस्थापितांना धक्का देण्यात त्याला आनंद वाटू लागला.
केंब्रिज हाय अँड लॅटिन स्कूलमधून दामोदर अतिशय उत्तमरीत्या शालांत परीक्षा पास झाला. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागत होती. दामोदरला मात्र प्रवेश परीक्षा न देताच प्रवेश मिळाला. काही निवडक उच्च गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना असा प्रवेश मिळू शकत असे. त्याचबरोबर त्याने एक शिष्यवृत्तीही मिळवली. याच काळात दामोदरला गणित विषयातील सुस्पष्टपणाचे आकर्षण निर्माण झाले. गणितातून त्याला बौद्धिक आनंद मिळू लागला.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’