दामोदर बरीच वर्षे घरच्यांपासून दूर राहिला असल्याने त्याला घरची आठवण येऊ लागली होती. त्यामुळे धर्मानंदांनी त्याला भारतात बोलावून घेतले. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्याऐवजी दामोदर भारतात परतला. त्यावेळी धर्मानंद गुजरात विद्यापीठात पुरातत्व मंदिरात काम करत होते. माणिक इंदूर येथे अहिल्याश्रमात अधीक्षक म्हणून काम करत होत्या. आई व धाकट्या बहिणी त्यांच्याबरोबर असल्याने दामोदरने आपला मोकळा वेळ अहमदाबाद तसेच इंदूर या ठिकाणी घालवला. गोव्यात नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने त्याने गोव्यालाही भेट दिली. तिथल्या जंगलात भटकंती करून जलसंपत्ती, खनिजसंपत्ती याविषयी बऱ्यापैकी माहिती गोळा केली. त्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन केले. गोव्याच्या तेव्हाच्या परिस्थितीचा त्याने बारकाईने अभ्यास केला. एकुणात दामोदरची गोवा भटकंती अभ्यासपूर्ण ठरली.
भारतभेटीचा दामोदरला अत्यंत उपयोग झाला. आपला देश, आपली माणसं, इथली संस्कृती त्याला जवळून पाहता अनुभवता आली. परंतु यात त्याच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न मात्र तसाच बाजूला राहून गेला होता. दामोदरने अमेरिकेत दिलेल्या शालांत परीक्षेला भारतीय विद्यापीठात मान्यता नव्हती. त्यामुळे त्याला इथल्या कॉलेजमध्ये सहजासहजी प्रवेश मिळणे शक्य झाले नाही. वर्ष सव्वा वर्ष भारतात राहिल्यानंतर थोडा उशिरा का होईना पण हा प्रश्न एकदाचा निकाली लागलाच. धर्मानंदांच्या पहिल्या दोन्ही अमेरिका भेटीत विशुद्धीमार्ग या बौद्ध ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पूर्ण होऊ शकलेले नव्हते. डॉ. वूड्स यांनी ते काम पूर्ण करण्यासाठी धर्मानंदांना अमेरिकेला येण्याविषयी आग्रह करणारे पत्र पाठवले होते. त्यामुळे तिसर्या वेळेस त्यांनी अमेरिकेला जायचे ठरवले. जाताना पुढील शिक्षणासाठी त्यांनी दामोदरलाही आपल्या सोबत नेले.
![]() |
हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका |
अमेरिकेत गेल्यावर दामोदरने हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला व आपल्या पुढील शिक्षणास जोमाने सुरुवात केली. दामोदर आपला अभ्यास सांभाळून वडिलांना त्यांच्या संशोधन कार्यात मदत करत असे. प्राचीन ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्तींची कामे, त्यावरील संशोधन प्रक्रिया कशी चालते हे त्याने अत्यंत बारकाईने पाहिले. यावेळी धर्मानंद दीड वर्षे अमेरिकेत राहिले. ते भारतात परतल्यानंतर दामोदर त्याच घराच्या पहिल्या मजल्यावरून सर्वात शेवटच्या मजल्यावरील एका खोलीत राहायला गेला. त्याच्या खोलीत त्याने लक्षवेधक असा महात्मा गांधीजींचा फोटो भिंतीवर लावलेला होता. खोलीत सर्वत्र कित्येक विषयांवरची पुस्तकेच पुस्तके होती. त्यातील बहुतेक पुस्तके जर्मन भाषेतील होती. जर्मनी हे त्यावेळी विज्ञानाचे महत्वाचे केंद्र होते. बहुतांश संशोधनलेखही जर्मनमध्येच प्रसिद्ध होत.
हार्वर्डमध्ये दामोदर नियमित वाचन-अभ्यास करत असे. त्यामुळे जर कधी ताण आला तर तो घालवण्यासाठी दामोदर हलकी फुलकी पुस्तके वाचत असे किंवा सिनेमा पाहायला जात असे. पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमांना तर तो आवर्जून उपस्थित राहत असे. त्याचबरोबर खोलीत मित्रांसमवेत पत्त्यांचे डाव खेळणे, हास्यविनोद करणे, आरडाओरडा करणे अशी धमाल सुरू असे. याशिवाय हॉटेल मध्ये जाऊन विविध पदार्थ अगदी चवीने खाण्याची भारी हौस त्याला होती. महाशय चॉकलेटचेही चांगलेच शौकीन होते. चॉकलेटची सवय तर पुढेही कायम राहिली. दामोदरला भटकंतीचा खूप नाद होता. चार्ल्स नदीकाठच्या जंगलात मित्रांसमवेत तो दुरदूरवर फिरायला जात असे. त्यात त्याला खूप आनंद मिळत असे. तो सुट्टीच्या वेळी कोणाच्या तरी फळबागेत जाऊन किंवा एखाद्या दुग्धालयात जाऊन काम करून पैसेही कमवत असे. दामोदर अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास व मजेच्या वेळी मजा करत असे.
दामोदरने अभ्यासासाठी ढीगभर विषय घ्यावेत व ते केवळ पूर्ण करावेत हा उद्देश धर्मानंदांना अजिबात आवडणारा नव्हता. घेतलेल्या प्रत्येक विषयात सर्वोत्तम कामगिरी त्यांना हवी असे. एकदा एका सत्र परीक्षेत दामोदरला तीन विषयात ‘अ’ तर एकात ‘ब’ श्रेणी मिळाली होती. ही गोष्ट जेव्हा धर्मानंदांना समजली तेव्हा त्यांचा पारा चढला. त्यांनी त्याला एक पत्र लिहिले व खडसावून सांगितले, सर्व विषयात ‘अ’ श्रेणी मिळवता येत नसेल तर वेळ व्यर्थ न घालवता भारतात परत ये. आपल्या वडिलांचे हे शब्द दामोदरच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्याने वडिलांना कृतीतून उत्तर द्यायचे ठरवले. विविध भाषा शिकण्याची दामोदरला आवड होती. दामोदरने उन्हाळ्याच्या सुट्टीत इटालियन भाषेचा कोर्स लावला. त्यासाठी इटालियन साहित्यातील खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या सोप्या आवृत्ती अभ्यासासाठी ठेवलेल्या होत्या. एकूण चार पुस्तके होती. त्यापैकी कोणत्याही दोन पुस्तकांचा अभ्यास करायचा होता. दामोदरने चारही पुस्तकांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले. इटालियन भाषा शिकवणार्या प्राध्यापकाने दामोदरला एक पत्र पाठवले. त्यात लिहिले होते, "गेली अनेक वर्षे इटालियन भाषेचा प्राध्यापक म्हणून मी काम करत आहे. परंतु अ+ श्रेणी देण्याची माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली आहे." दामोदरने प्राध्यापकांचे ते पत्र भारतात वडिलांना पाठवून दिले.
विषयाचा मुळापासून अभ्यास करण्याची सवय, अफाट वाचन, वाचनाचा प्रचंड आवाका व जबरदस्त स्मरणशक्ती यामुळे कुठे जाईल तिथे दामोदरच्या बुद्धीचे तेज दिसून येऊ लागले. तो कधी दांते या इटालियन कवीवर डॉक्टरेट करणार्या विद्यार्थ्यांना सल्ला देत असे तर कधी कुणाला अणूविज्ञान विषयाशी संबंधित बारीकीने अभ्यासलेल्या आईनस्टाईनच्या लेखांचा संदर्भ देत असे. कधी-कधी तर दामोदरकडे असलेली माहिती बाकीच्या विद्यार्थ्यांना माहितही नसे.
१९२९ साली दामोदरला हार्वर्ड विद्यापीठाची ए. बी.(आर्ट्स बॅचलर) ही पदवी डिस्टिंक्शनसह मिळाली. त्याचबरोबर त्याने मानाचे फाय-बीटा-कॅप्पा सदस्यत्वही मिळवले. याच काळात दामोदरने लेखन करण्यास सुरूवात केली.
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’