१९२९ साली अमेरिकेत मंदीची लाट आली. बघता बघता अमेरिकी अर्थव्यवस्था डबघाईला आली. कित्येक लोक बेरोजगार झाले, नोकर्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. विद्यार्थ्यांना विद्यापीठात मिळणार्या शिष्यवृत्या, फेलोशिप्स साहजिकच खूप कमी झाल्या. दामोदरलाही याचा फटका बसला. डिस्टिंक्शनसह पदवी प्राप्त केली असूनही त्याला हार्वर्डमध्ये पदव्युत्तर गणित शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली नाही. दामोदर कोसंबी यांचे चरित्रकार चिंतामणी देशमुख यांनी त्यामागे तीन कारणे असण्याची शक्यता वर्तवली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर विद्यापीठात चार-पाच वर्षे काढली असतील तर त्या विद्यार्थ्याने दुसर्या विद्यापीठात जायला हवे अशी हार्वर्ड विद्यापीठाची भूमिका होती. अपवाद म्हणून काही मोजक्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधांनासाठी तेथेच प्रवेश मिळू शकत असे. परंतु, फेलोशिप्सची संख्या अत्यल्प झाल्याने दामोदरला तसा प्रवेश मिळाला नाही. दुसरी शक्यता अशी की, दामोदरला विविध विषयात रस असल्यामुळे त्याला फेलोशिप देण्याची हार्वर्डच्या गणित विभागाची इच्छा नसावी. गणित विषयावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रा. बरकॉफ यांच्या सल्ल्याकडे दामोदरने दुर्लक्ष केले होते. आणि तिसरे असू शकणारे कारण म्हणजे, ‘डिफरन्शियल जॉमेट्री’ या दामोदरच्या आवडीच्या गणितातील शाखेचे मार्गदर्शक प्रा. ग्राउस्टाईन त्यावेळी वर्षभराच्या रजेवर हार्वर्डबाहेर गेले होते.
![]() | |
|
शिक्षणासाठी जवळपास १० वर्षे अमेरिकेत काढल्यानंतर दामोदर भारतात परतला. भारतात परतल्यावर दामोदर आपली मोठी बहीण माणिक हिच्याकडे गेला. माणिक तेव्हा लग्न होऊन त्या बेंगलोर येथे राहत होत्या. माणिक यांचे पती डॉ. राम प्रसाद यांनी दामोदरला कलकत्ता किंवा बनारस हिंदू विद्यापीठात नोकरीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. बनारस हिंदू विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची एक जागा मोकळी होती. दामोदरला तेथे नोकरी मिळाली. पंडित मदन मोहन मालवीय तेव्हा बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना धर्मांनंदांबद्दल अतिशय आदर होता. दामोदर त्यांचा मुलगा असल्याने त्यांना खूप आनंद वाटला.
प्रा. डी. डी. कोसंबी यांची बनारस हिंदू विद्यापीठात छान सुरुवात झाली. ते विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून असत. कोसंबी विद्यार्थ्यांना गणित तर शिकवत असतच परंतु त्यांच्याबरोबर मैदानी खेळातही भाग घेत असत. आपल्या संशोधनकार्यास त्यांनी याच ठिकाणी सुरुवात केली. त्यांचा पहिला संशोधन लेख ‘प्रिसेशन्स ऑफ अॅन एलिप्टिक ऑर्बीट’ हा १९३० सालच्या ‘इंडियन जर्नल ऑफ फिज़िक्स’ मध्ये प्रसिद्ध झाला. आधुनिक विज्ञानात अद्ययावत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांना जर्मन भाषा येणे अत्यावश्यक असल्यामुळे गणित विषय शिकवण्याबरोबरच कोसंबी मोकळ्या वेळेत विद्यार्थ्यांना जर्मन भाषाही शिकवत असत. कारण त्या काळात बहुतांश संशोधनलेख जर्मनमध्येच प्रसिद्ध होत असत.
कोसंबींची बनारस हिंदू विद्यापीठात सुरुवात छान झाली असली तरी तिथल्या वातावरणाचा त्यांना त्रास होऊ लागला होता. कोसंबी पुरोगामी विचारसरणीचे होते. बनारस हिंदू विद्यापीठातील वातावरण प्रतिगामी होते. तिथल्या त्या वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना त्रासदायक होत चालले होते. तिथे गणिताची आवड असणारे सहकारी नव्हते. त्याचबरोबर विद्यार्थीही केवळ परीक्षार्थीच असल्याचे त्यांना जाणवत होते. गणित विषयात काही संशोधनात्मक भरीव काम करण्यासारखे वातावरण तिथे नव्हते. कोसंबी हे शिस्तप्रिय व स्पष्ट बोलणारे असल्यामुळे त्यांचा स्वभाव अनेकांना खटकत असे. अगदी कुलगुरूंशीही त्यांचे मतभेद होत. एकंदरीत कोसंबी बनारस हिंदू विद्यापीठात अस्वस्थ होते. अखेर दुसरीकडे नोकरी शोधण्याचा ते प्रयत्न करू लागले.
त्यावेळी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रॉस मसूर होते. तिथल्या गणित विभागाच्या प्रमुखपदी आंद्रे वाईल हे फ्रेंच गणितज्ञ होते. कलकत्त्यातील एका परिषदेत कोसंबींची आंद्रे वाईल यांच्याशी ओळख झाली. गणित विभागाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने चांगले सहकारी शोधण्याच्या प्रयत्नात ते होते. कोसंबींबरोबरच दुसरे एक तरुण गणितज्ञ डॉ. विजयराघवन यांच्याशीही त्यांची ओळख झाली. डॉ. विजयराघवन हे प्रा. हार्डी यांचे शिष्य होते. प्रा. हार्डी म्हणजे प्रख्यात भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचे एकेकाळचे सहकारी होते. वाईल यांनी कोसंबी व विजयराघवन या दोघांनाही अलिगढला येण्याचे निमंत्रण दिले.
याच दरम्यान ७ मे १९३१ रोजी दामोदर कोसंबी यांचा विवाह मुंबईतील बळवंतराव माडगावकर यांची मुलगी नलिनी यांच्याशी झाला. त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून संस्कृत आणि गणित विषय घेऊन बी.ए. केले होते. नलिनी या पोहणे, टेनिस खेळणे त्याचबरोबर अश्वारोहण यात निपुण होत्या.
अलिगढ मुस्लिम विद्यापिठामध्ये गणित विभागात प्राध्यापक म्हणून कोसंबी रुजू झाले. आंद्रे वाईल, डॉ. विजयराघवन आणि कोसंबी असे गणिती क्षेत्रातील तीन विद्वान एकत्र आले होते. त्यांची एकमेकांशी छान मैत्री जमली. गणित विषयाशी संबंधीत त्यांच्यात खूप चर्चा-वादविवाद होत. या काळात तिथले वातावरण अतिशय उत्साही असे होते. कोसंबींचे व्यक्तिमत्वच असे होते कि त्यांच्या येण्याने आजूबाजूचे वातावरण चैतन्यमय होत असे. वाईल व विजयराघवन हे अतिशय विचारपूर्वक शांतपणे आपले विचार मांडणारे होते तर कोसंबी मात्र काहीसे आक्रमक वृत्तीचे होते. तिकडे विद्यार्थ्यांमध्ये कोसंबींबद्दल खूप आदराची भावना होती. कोसंबी त्यांना शिकवण्याचे आपले काम अगदी चोखपणे करत. शिकवताना विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे असे वाटल्यास ते त्यांना विनोदी चुटकेही सांगत. गणित या विषयात सतत अद्ययावत राहण्यासाठी ते त्यांना फ्रेंच व जर्मन भाषा शिका असे आवर्जून सांगत. कोसंबींचे वैयक्तिक संशोधनही उत्तमरीत्या चालले होते. दोन वर्षात 'डीफरंशीअल जॉमेट्री', 'पाथ स्पेसेस' या विषयांवरचे त्यांचे एकूण आठ संशोधनलेख प्रसिद्ध झाले. 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' च्या कामातदेखील कोसंबी हळूहळू लक्ष घालू लागले.
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’