आंद्रे वाईल अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राजकारणाला, तिथल्या एकूण कारभाराला कंटाळून गेले होते. अशा वातावरणात काम करणे शक्य नसल्याची जाणीव त्यांना झाली होती. अखेर कंटाळून त्यांनी तिथली नोकरी सोडली. त्यानंतर त्यांच्या मागोमाग कोसंबी व डॉ. विजयराघवनही तिथून बाहेर पडले. डॉ. विजयराघवन ढाका विद्यापीठात निघून गेले तर कोसंबी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे अध्यापक म्हणून रुजू झाले. कोसंबींनी जवळपास दोन वर्षे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात काम केले.
![]() |
फर्ग्युसन कॉलेज, पुणे |
दामोदर कोसंबींचा बालपणीचा काळ पुण्यात गेला असल्याने पुण्याविषयी त्यांच्या मनात आपलेपणाची भावना होती. पुण्यात आल्यानंतर येथे स्थिर व्हावे असा विचार करून त्यांनी भांडारकर इंस्टीट्यूट रोडवर जागा घेतली व स्वतःचा बंगला बांधण्यास सुरुवात केली. धर्मानंदानी स्वतः लक्ष घालून हे काम करवून घेतले. कोसंबींनी आयुष्याच्या अखेरपर्यंत पुण्यातील आपले वास्तव्य हलवले नाही.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोसंबी विद्यार्थ्यांना उपयोजित गणित, डिफरन्शियल जॉमेट्री, डायनॅमिक्स, टेंसॉर्स इत्यादी उपविषय शिकवत. ते एक शिस्तप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांची स्वतःची अशी एक पद्धत होती. ते विद्यार्थ्यांना आयती उदाहरणे सोडवून देत नसत. विद्यार्थ्यांना आधी विषयातील मूलतत्वे समजावून देत व त्यानंतर ते प्रमेयाकडे वळत. ही प्रमेयं समजत नसतील तर कितीही वेळा समजावून सांगण्याची त्यांची तयारी असे. परंतु एकदा का प्रमेय समजला की मग त्याच्या साह्याने विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रश्न सोडवायला हवेत अशी त्यांची भूमिका असे. त्यामुळे प्रत्यक्षात आकलन होत नाही किंवा परीक्षेच्या दृष्टीने निरुपयोगी आहे म्हणून कित्येक विद्यार्थी त्यांच्या वर्गाला गैरहजर राहत. हुशार व मेहनती विद्यार्थ्यांसाठी कोसंबी एक चांगले शिक्षक होते.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना गणितातील आपल्या संशोधनात कोसंबींनी उत्तम प्रगती केली. भारतीय गणित क्षेत्रातील एक उगवते तरुण गणिती म्हणून कोसंबी पुढे येत होते. हा १९३४ सालचा काळ होता. याच काळात त्यांना पहिले रामानुजन स्मृती परितोषिक मिळाले. त्याचबरोबर सी. व्ही. रामन यांनी बंगलोर येथे स्थापन केलेल्या 'भारतीय विज्ञान अॅकॅडमी'मध्ये संस्थापक फेलो म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. कोसंबींच्या गणितातील संशोधन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती.
फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचे पोषक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने कोसंबींनी इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या कामात जास्त लक्ष घालायला सुरुवात केली. फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातच 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे ग्रंथालय होते. सोसायटीचे ग्रंथालय व स्वतःचा खाजगी ग्रंथसंग्रह यांच्या साह्याने कोसंबी आपले गणिताचे ज्ञान व संशोधन अद्ययावत ठेवत असत. याशिवाय त्यांच्या संशोधन क्षेत्राशी संबंधित गणित विषयातील संशोधक-तज्ञांशी त्यांचा नियमित पत्रव्यवहारही सुरू असे. १९३३ ते १९३९ या कालावधीत दामोदर कोसंबी यांचे गणितातील एकूण १४ शोधनिबंध प्रसिद्ध झाले.
नोकरी, संशोधन याचबरोबर कोसंबींचे कौटुंबिक जीवनही उत्तम चालले होते. १० नोव्हेंबर १९३५ रोजी त्यांची मोठी मुलगी मायाचा जन्म झाला. तिच्या पाठीवर २४ एप्रिल १९३९ रोजी धाकटी मुलगी मीरा जन्मली. आपल्या दोन्ही मुलींना मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे म्हणून कोसंबींनी त्यांना पुढे आवर्जून मराठी शाळेत दाखल केले. इतकेच नव्हे तर आईस 'आई' व वडिलांना 'बाबा' म्हणून हाक मारावी असेही शिकवले.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’