डी. डी. कोसंबी यांना गणिताबरोबरच इतरही अनेक विषयात रुची असल्यामुळे त्यांनी आता इतर विषयातही प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. १९३९ ते १९४४ या पाच वर्षांच्या काळात एकूण ३२ लेख त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यातील १२ गणित व राहिलेले २० इतर विषयातील होते.
![]() |
प्रा. डी. डी. कोसंबी |
नाणकशास्त्राच्या अभ्यासाला गणिती जोड देऊन कोसंबींनी एकूण पाच लेख लिहिले होते. त्यावेळी तक्षशीला येथील उत्खननात जुन्या नाण्यांचे साठे सापडले होते. कोसंबींनी ही सापडलेली नाणी अतिशय काळजीने साफ करून त्यांची बारकाईने वजने केली. वापरामुळे सारख्या नाण्यांच्या वजनांतील आढळून आलेल्या सूक्ष्म फरकांच्या त्यांनी नोंदी घेतल्या. त्यावरून आलेख काढले. त्याला संख्याशास्त्रातील नियम लावून नाण्यांचा चलनवेग काढला तसेच त्यांची कालक्रमानुसार रचना केली. त्यातून वैज्ञानिक पातळीवर उतरू शकतील असे निष्कर्ष त्यांनी काढले. आपण काढलेले निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी कोसंबींनी वापरात असलेली असंख्य चालू चलनी नाणी गोळा केली. त्यासाठी बँकांच्या शाखेत जाऊन विविध प्रकारची नाणी आणली. त्यांची वजने घेऊन आलेख काढले. कोसंबींनी त्यावेळी वापरात असलेल्या जवळजवळ ७००० नाण्यांची अत्यंत बारकाईने वजने घेतली. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे तक्षशिलेच्या काळातील आर्थिक घडामोडींवर प्रकाश पडण्यास मोठी मदत झाली. अशा प्रकारे नाणकशास्त्राची शास्त्र म्हणून पायाभरणी करण्याचे मौलिक कार्य कोसंबींनी केले.
कोसंबींचा नाण्यांवरचा पहिला लेख सी. व्ही. रामन यांच्या भारतीय विज्ञान अॅकॅडमीच्या 'करंट सायन्स' या पत्रिकेत १९४० साली प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी 'न्यू इंडियन अँटिक्वेरी' या पत्रिकेतील प्रसिद्ध झालेला 'ऑन द स्टडी अँड मेट्रोलॉजी ऑफ सिल्व्हर पंच मार्क्ड कॉईन्स' हा त्यांचा लेख तर ६३ पानी होता.
![]() |
संशोधनकार्याचा धडाका |
प्राचीन काळातील नाण्यांवर काम करत असताना कोसंबी यांच्या मनात भारतीय इतिहासाबद्दल कुतुहुल निर्माण झाले. ज्या काळात नाणी पाडली गेली असतील त्या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थितीशी संबंधित निरनिराळे कित्येक प्रश्न त्यांना पडू लागले. केवळ नाण्यांचा अभ्यास पुरेसा नाही हे त्यांच्या लक्षात आले. बारकाईने पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, सापडलेली नाणी ज्या काळात चलनात होती त्या काळातील राजांबद्दल तसेच सर्वसामान्य प्रजेबद्दल विश्वासार्ह म्हणता येईल अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही. जी उपलब्ध कथा, काव्य, पुराणं आहेत त्यातून इतिहासाचे नीट आकलन होणार नाही हे त्यांना समजले होते. पण तरीही जेवढी काही उपलब्ध साधनं असतील त्यांचा आधार घेत त्यांनी प्राचीन भारतविद्या या क्षेत्रात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. कोसंबींचा 'तीन इंडो-युरोपिअन जमातीमधील राष्ट्रीय गुणधर्माचा उदय' हा प्राचीन भारतविद्या क्षेत्रातील इंग्रजी लेख भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या पत्रिकेत १९४० साली प्रसिद्ध झाला.
प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी संस्कृत भाषा कोसंबींना अवगत नव्हती. संस्कृतशिवाय प्राचीन ग्रंथ अभ्यासणे शक्य होणार नव्हते. त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील व्ही. सी. सुखठणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुखठणकर यांनी कोसंबींना संस्कृत शिकण्यासाठी भर्तृहरी या संस्कृत कवीच्या सुभाषितांपासून सुरुवात करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कोसंबींनी सुरुवात केली. भर्तृहरीच्या काव्याचा अभ्यास करताना कोसंबींना जाणवले की भर्तृहरी लोककवी नसून राजाश्रय मिळालेला बुद्धिजीवी वर्गातील एक कवी आहे. त्याच्या काव्यातील तत्वज्ञान वरवरचे व पोकळ असल्याचे त्यांना आढळून आले. त्याचे अनुभव खरे नव्हते. त्यामुळे कबीर, तुकाराम यांच्याप्रमाणे त्याला लोकांनी स्वीकारले नाही. यावर कोसंबींनी १९४१ साली फर्ग्युसन कॉलेजच्या वार्षिकात 'भर्तृहरीच्या काव्यातील विरक्तीचा दर्जा' हा टीकात्मक परखड असा लेख लिहिला. भर्तृहरीचा अभ्यास संपवण्यासाठी कोसंबींना पाच वर्षं लागली. बर्याच वेळा हे काम सोडून द्यायचा विचार त्यांच्या मनात येत असे. परंतु कोणतेही काम अर्धवट सोडणे त्यांना आवडत नसल्याने त्यांनी ते काम अखेर पूर्ण करूनच सोडले. प्रस्थापितांना धक्के देत कोसंबींनी भर्तृहरीवर खूप काम केले.
संस्कृतचा अभ्यास करताना कोसंबींनी विस्मृतीत गेलेले जवळपास ५० संस्कृत कवी उजेडात आणले.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’