१९४४ साली 'अॅनल्स ऑफ युजेनिक्स' या संशोधन पत्रिकेत कोसंबींचा 'द एस्टिमेशन ऑफ मॅप डिस्टन्स फ्रॉम रिकॉम्बिनेशन वॅल्यूज' हा चार पानी लेख प्रसिद्ध झाला.
माणसाच्या पेशींमधील रंग-गुणसुत्रे अनुवंशिकता निश्चित करतात. या रंगसूत्रातील निरनिराळ्या जीन्स किंवा जीन्स गटांमधील 'अंतरे' निश्चित करणारे एक सूत्र त्यांनी मांडले. तोपर्यंत 'हॉल्डेन' यांनी १९१९ साली मांडलेले सूत्र वापरले जात होते. संख्याशास्त्राच्या आधारे निर्मिलेले कोसंबींचे नवीन सूत्र अधिक अचूक तसेच परिणामकारक होते. विज्ञान जगतात या सूत्राला कोसंबी फॉर्म्युला म्हणून ओळखले जाते. आजही हे सूत्र वापरले जाते. अशा प्रकारे अनुवंशशास्त्रातही कोसंबींनी आपले योगदान दिले.
कोसंबी फॉर्म्युला |
हॉल्डेन आणि कोसंबी तुलनात्मक |
सुप्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ ए. आर. जी. ओवेन यांनी "कोसंबींसारखे विद्वान कोसंबी फॉर्म्युला तयार करून उंच भरारी घेतात, परंतु कधीही भरकटत नाहीत." अशा शब्दात कोसंबींचा गौरव केला आहे.
एकीकडे कोसंबींचे विविध विषयातील संशोधनकार्य जोमाने सुरु होते तर दुसरीकडे ते प्रबोधनकारी लेखनही करू लागले होते. त्यांचे लेखन प्रस्थापितांना धक्के देणारे होते. त्यांच्या लिखाणामुळे डाव्या विचाराच्या चळवळीतील लोक त्यांच्याकडे आकर्षिले जाऊ लागले. डाव्या चळवळीमध्ये त्यांना मानसन्मान मिळू लागला. साम्यवादी पक्षाच्या मुखपत्रातही त्यांचे लेख, पुस्तक परीक्षणे येऊ लागली. कोसंबींचे नाव परखड लिखाण करणारा स्वतंत्र बुद्धीचा मार्क्सवादी विचारवंत म्हणून पुढे आले.
'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' च्या ग्रंथालयात कोसंबी ग्रंथपाल म्हणून काम पाहत असत. मागे आपण पाहिलेच आहे की हे ग्रंथालय फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातच होते. एकदा झाले असे की कॉलेजच्या उपप्राचार्यपदी प्रा. स. वा. कोगेकर यांची नियुक्ती झाली. या नव्या उपप्राचार्यांना बसण्यासाठी कॉलेजने 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' च्या ग्रंथालयात एक पार्टिशन टाकून वेगळी जागा दिली. ही गोष्ट कोसंबी यांना न विचारताच झालेली होती. कोसंबींना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते संतापले.
'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' सारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचा हा अपमान आहे असे ते म्हणाले. बराच वादविवाद झाला. यात एक वाईट गोष्ट अशी घडली की ठराव पास करून कोसंबींना कॉलेजमधूनच काढून टाकण्यात आले. १९३३ ते १९४५ अशी बारा वर्षे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात काढली होती. याला ते 'बारा वर्षांचा वनवास' असं म्हणू लागले.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’