डॉ. होमी भाभा मुंबईत आपली स्वतंत्र संशोधन संस्था उभारण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना संस्थेत एखादा बुद्धिमान सहकारी हवा होता. दामोदर कोसंबी यांनी आतापर्यंत आपल्या संशोधन कार्यातून आपली चांगलीच ओळख निर्माण केलेली होती. फर्ग्युसन कॉलेजमधील शेवटच्या काही वर्षात त्यांची डॉ. होमी भाभा यांच्याशी ओळख झालेली होती. तेव्हा कोसंबींनी मुंबईस जाऊन भाभांची भेट घेतली. भाभांच्या गाडीत ते दोघेही चौपाटीवर गेले. विविध विषयांवर त्यांची दीर्घ चर्चा झाली. भाभांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कोसंबींना गणिताचे प्राध्यापक म्हणून येण्याचा प्रस्ताव दिला.
![]() |
डी. डी. कोसंबी | केनिलवर्थ बंगला | डॉ. होमी भाभा |
१ जून १९४५ रोजी मुंबईतील पेडर रोडवरील केनिलवर्थ या बंगल्यात टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली. पहिल्याच दिवशी कोसंबी संस्थेत रुजू झाले. भाभांपाठोपाठ संस्थेत आलेले दुसरे संशोधक कोसंबी होते. फर्ग्युसन कॉलेजने कोसंबींना काढून टाकले ही गोष्ट कोसंबींसाठी लाभदायकच ठरली. आता कोसंबींच्या आयुष्याने एक नवे व महत्वपूर्ण वळण घेतले होते. कुटुंब पुण्यात असल्यामुळे कोसंबींनी पहिली दोन वर्षे रोज पुणे-मुंबई डेक्कन क्वीनने प्रवास करत काढली. पुढची पाच वर्षे ते मुंबईत आपल्या बहिणीच्या घरी राहिले. आपले कुटुंब त्यांनी पुण्यातून मुंबईत हलवले नाही. शुक्रवारी संध्याकाळी डेक्कन क्वीनने पुण्यास जाणे. शनिवार-रविवार कुटुंबियांसमवेत पुण्यात घालवणे. सोमवारी सकाळी परत मुंबई. असा त्यांचा क्रम होता. नंतरची दहा वर्षे पुन्हा पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा प्रवास त्यांनी केला. व्यायाम होतो म्हणून कोसंबी आपल्या भांडारकर रोडवरील घरापासून स्टेशनपर्यंत पायी चालत जात. मुंबईत पोहोचल्यावरही संस्थेच्या ठिकाणापर्यंत ते पायीच चालत जात.
डॉ. होमी भाभांनी विश्वकिरणांसंबंधी काही प्रयोग केले होते. भाभांनी त्यातील आपल्या निरीक्षणांवर आधारीत असे दोन शोधनिबंध लिहिले. संस्थेच्या स्थापनेनंतर काहीच दिवसात त्यांनी ते प्रसिद्ध केले. यात कोसंबींनी भाभांना गणित व संख्याशास्त्रीय मदत केली होती. या मदतीचा भाभांनी शोधनिबंधात आभारपूर्वक उल्लेख केला. संस्थेचे काम अगदी जोमाने सुरु झाले होते. सुरुवातीच्या काळात भाभा विविध कामांच्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर असत. दोन वेळा तर ते मोठ्या कालावधीसाठी विदेश दौऱ्यावर गेले होते. अशा वेळी भाभांच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कामकाजात कोसंबी लक्ष घालत. त्या काळात भाभांवर कोसंबींचा खूपच प्रभाव होता.
बघता बघता दामोदर कोसंबीं यांचे भारतीय विज्ञानक्षेत्रातील महत्व वाढले होते. १९४५ साली मुंबईतील शाही विज्ञानसंस्थेच्या रौप्य मोहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भाषणात होमी भाभा, शांतिस्वरूप भटनागर अशा मोठ्या वैज्ञानिकांच्या बरोबरीने कोसंबींचेही भाषण ठेवले होते. पुढे जानेवारी १९४७ रोजी भारतीय विज्ञान परिषदेचे ३४ वे अधिवेशन दिल्ली येथे भरले होते. या परिषदेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यावेळी गणित विषयाचे विभागीय अध्यक्ष कोसंबी होते. या निमित्ताने त्यांनी त्यावेळी काही मुद्द्यांना घेऊन पंडित नेहरूंशी पत्रव्यवहारही केला.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काहीच महिने आधी धर्मानंदांचे वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात 'मरणांतिक सल्लेखन' व्रत सुरू झाले होते. धर्मानंदांनी अखेरच्या क्षणी भावनिकता टाळण्यासाठी कुटुंबीयांना भेटायला येण्यास सक्त मनाई केली होती. तिथल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी कुटुंबीय सतत आश्रमात फोन करत. दामोदर कोसंबी तर खूप अस्वस्थ होते. जवळच्या लोकांशी बोलताना 'काय करावे सुचत नाही, बापू स्वप्नात येतात' असे ते म्हणत. महिनाभर अनशन करून अखेर ४ जून १९४७ रोजी धर्मानंदांनी या जगाचा निरोप घेतला. हा काळ कोसंबी कुटुंबीयांसाठी अत्यंत कठीण असा काळ ठरला.
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’