Saturday, May 05, 2018

दामोदर धर्मानंद कोसंबी ⑨ अल्बर्ट आईनस्टाईन आणि ए. एल. बॅशम भेट

डॉ. होमी भाभा हे दूरदृष्टी असणारे शास्त्रज्ञ होते. 'टाटा मूलभूत संशोधन संस्था' कायम अद्ययावत राहील याची ते सतत काळजी घेत. कोसंबींवर त्यांनी कित्येक महत्वाच्या जबाबदार्‍या सोपवल्या होत्या. त्याकाळात नव्याने येऊ घातलेल्या संगणक तंत्रज्ञानातील संशोधनास सुरुवात करण्याचे भाभांच्या मनात होते. या कामासाठी त्यांनी कोसंबींना युनेस्को-फेलो म्हणून अमेरिका-इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यावेळी नुकतेच भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८-४९ सालचा कोसंबींचा हा पहिलाच विदेश दौरा होता. निघण्यापूर्वी भाभांनी आपल्या मलबार हिलवरील घरी कोसंबींना एक पार्टी दिली. संस्थेतील सर्व संशोधक मंडळी त्यावेळी उपस्थित होती.

अल्बर्ट आईनस्टाईन | डी. डी. कोसंबी | ए. एल. बॅशम 

आपल्या अमेरिका दौर्‍यात कोसंबींनी त्यावेळच्या प्राथमिक अवस्थेतील संगणकाशी संबंधीत सर्व आवश्यक गोष्टींचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी शिकागो विद्यापीठात जॉमेट्रीचे पाहुणे प्राध्यापक म्हणूनही काम केले. आपल्या याच दौर्‍यात पुढे कोसंबींनी इंस्टीट्यूट फॉर अॅडव्हान्स स्टडीज, प्रिन्स्टन या संस्थेत काही काळ मुक्काम केला. अल्बर्ट आईनस्टाईन त्यावेळी तेथे ज्येष्ठ प्राध्यापक होते. दामोदर कोसंबींनी अल्बर्ट आईनस्टाईन यांची भेट घेतली व त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली.

आपल्या 'स्टेप्स इन सायन्स' या लेखात कोसंबी म्हणतात,

In 1949, Einstein pointed out to me during one of several long and highly involved private technical discussions that certain beautifully formulated theories of his would mean that the whole universe consisted of no more than two charged particles. Then he added with a rueful smile, 'Perhaps I have been working on the wrong lines, and nature does not obey differential equations after all'.

१९४९ साली आईनस्टाईन यांच्याबरोबर माझी काही तांत्रिक बाबींवर खूप वेळ आणि खूप गहन अशी वैयक्तिक चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांच्या काही अतिशय सुंदर उपपत्तींमधून असा निष्कर्ष निघतो आहे की कदाचित सारे विश्व म्हणजे फक्त दोन विद्युतभारीत कण असावेत. नंतर त्यांच्या चेहर्‍यावर एक विषादपूर्ण हास्य उमटले आणि ते म्हणाले, 'कदाचित मी चुकीच्या दिशेने काम करीत असेन आणि कदाचित हे विश्व शेवटी डीफरंशियल इक्वेशन्स पाळतही नसेल.'

प्रिन्स्टन येथे कोसंबींनी गणित विषयात संशोधन करणार्‍या तरुण भारतीयांची भेट घेतली. हार्वर्डच्या आपल्या जुन्या मित्रांना विशेषतः प्रा. नॉर्बर्ट वीनर यांना भेटायचे कोसंबी विसरले नाहीत. आपला दीर्घ दौरा संपवून भारतात परतत असताना वाटेत त्यांनी लंडन येथे काही काळ मुक्काम केला. भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल अतिशय महत्वपूर्ण लिखाण केलेले प्रा. ए. एल. बॅशम त्यावेळी लंडन विद्यापीठात संशोधन करत होते. कोसंबींनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये पुढे छान मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले.

संदर्भ :
  • धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
  • दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
  • उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्‌मय प्रकाशन २००७
  • संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
  • २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’

Cookies Consent

This website uses cookies to offer you a better Browsing Experience. By using our website, You agree to the use of Cookies

Learn More