दुसर्या महायुद्धात अमेरिकेकडून जेव्हा जपानच्या 'हिरोशिमा' व 'नागासाकी' या शहरांवर प्रत्यक्ष अणुबॉम्बचा वापर केला गेला तेव्हा जगभरच्या वैज्ञानिकांबरोबरच प्रत्यक्ष अणुबॉम्बप्रकल्पावर काम केलेल्या वैज्ञानिकांचीदेखील झोपच उडाली. यातून जगाला विनाशाच्या खाईत लोटणार्या अण्वस्त्रांना व अण्वस्त्र स्पर्धेला विरोध करण्यासाठी जगभर शांतता चळवळ सुरू झाली. अनेक वैज्ञानिक व बुद्धिवादी विचारवंत या चळवळीत सामील झाले. त्यात दामोदर कोसंबीही होते. त्यांनी १९५० पासून जागतिक शांतता परिषदेत काम करण्यास सुरुवात केली. कोसंबी पुढे अखिल भारतीय शांतता परिषदेचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर जागतिक शांतता परिषदेचे सदस्य झाले. यानिमित्ताने शांतता परिषदेच्या सभांना हजर राहण्यासाठी कोसंबींनी अनेक परदेशी दौरे केले. युरोप, सोविएत युनियन, चीन व जपान येथे ते अनेकवेळा जाऊन आले.
![]() |
अणुबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी |
दुसर्या महायुद्धानंतर जगभर अणुशक्ती कार्यक्रम सुरु झाले होते. कोसंबींनी या सर्व अणुशक्ती कार्यक्रमांना विरोध केला. कारण बहुतेक देशांनी अणूऊर्जा कार्यक्रम हे अण्वस्त्रनिर्मिती करण्यासाठीच हाती घेतले होते. अंधपणाने अणुशक्तीच्या मागे धावणे कोसंबींना अयोग्य वाटत होते. अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती संकल्पनेचा त्यांनी मुळात जाऊन अभ्यास केलेला होता. अणुऊर्जानिर्मिती कार्यक्रमातील धोके व त्यावर होणारा अतीप्रचंड खर्च याकडे तर त्यांनी सर्वांचे लक्ष वेधलेच परंतु त्याचबरोबर आपण भारतीयांनी अणूऊर्जेपेक्षा सौरऊर्जेवर भर द्यावा असे आग्रही मत त्यांनी मांडले. अमेरिका किंवा युरोपमध्ये सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते देश सौरऊर्जेचा पुरस्कार करणार नाहीत. भारत हा देश उष्ण कटिबंधात येतो. इथे वर्षातील ८ महीने सौरऊर्जा उपलब्ध होत असल्याने आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे असे ते म्हणत. त्यासाठी उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करणे हे जास्त व्यावहारिक आहे असे ते म्हणत. असते. आज २१व्या शतकात भारत अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत आहे परंतु ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश नाही. यावरून कोसंबी त्यावेळी जी भूमिका मांडत होते त्याचे महत्व लक्षात येते.
आशिया व प्रशांत महासागर विभागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी एक शांतता परिषद होणार होती. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी दामोदर कोसंबी १९५२ साली एक शिष्टमंडळ घेऊन चीनमधील बिजींग येथे तयारी परिषदेसाठी गेले. परिषदेच्या उद्घाटनसत्राचे अध्यक्षपद कोसंबींना देऊन भारतीय शिष्टमंडळाला तिथे मोठा मान दिला गेला.
१९५५ सालच्या जून महिन्यात फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे जागतिक शांतता परिषदेचे अधिवेशन आयोजित केले गेले. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नोबेल परितोषिक विजेत्या फ्रेंच अणुवैज्ञानिक मारी क्युरी यांचे जावई 'फ्रेडरीक जोलिओ-क्युरी' हे होते. या परिषदेत अनेक देशांची शिष्टमंडळे आली होती. भारताचे शिष्टमंडळ परिषदेतील सर्वात मोठे शिष्टमंडळ होते. त्यात एकूण नव्वद प्रतिनिधी होते व त्याचे नेतृत्व दामोदर कोसंबी यांच्याकडे होते. कोसंबींचे प्रतिनिधित्व सरकारी नसले तरी त्याचे खूप मोठे महत्व होते. या परिषदेत कोसंबी यांचे शांततेचा पुरस्कार करणारे भाषण खूपच लक्षवेधी ठरले. हेलसिंकी शांतता परिषदेनंतर याच वर्षीच्या जुलै महिन्यात सोविएत युनियनने अणुशक्तीच्या शांततामय वापरासंबंधी एका परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला थोर भारतीय शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्याबरोबर दामोदर कोसंबी यांनीही उपस्थिती लावली. यावेळी कोसंबींनी मॉस्को विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहासावर व्याख्याने दिली. त्याला भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला.
जवळजवळ दोन महिन्यांच्या दीर्घ अशा दौर्यानंतर कोसंबी जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांना आपल्या आईच्या निधनाची धक्कादायक बातमी समजली. 'बाबा आला का, बाबा आला का' असे म्हणत ४ जुलै १९५५ रोजी बाळाबाईंनी प्राण सोडलेला होता. दामोदर बंगलोरला गेले तेव्हा ढसाढसा रडले. त्यांच्या मनात आईबद्दल हळवेपणा होता. माय लेकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते. भर्तृहरीवरील पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दामोदर यांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे प्रकाशन लांबणीवर पडण्याची वेळ आली होती तेव्हा बाळाबाईंनी मागितले नसतानाही आयुष्यभर साठवलेले पैसे त्वरित दामोदर यांना देऊन टाकले. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शांतता परिषदेचे काम कोसंबी अतिशय गंभीरपणे करत होते. पुढे १९६२ साली त्यांनी परिषदेच्या कामानिमित्त रुमेनियाला भेट दिली. कोसंबींनी या भेटीत शांतता परिषदेच्या कामाबरोबरच तिथल्या पुरातत्व या विषयांतील तज्ञांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या.
अण्वस्त्र स्पर्धेला विरोध करण्यासाठी जगभर सुरु झालेल्या शांतता चळवळीला तडा गेला होता. चळवळीत आता पूर्वीसारखी एकी राहिली नव्हती. विविध गट निर्माण झाले होते. प्रत्येक गट आपापली धोरणं राबवण्यासाठी परिषदेचा उपयोग करून घेऊ पाहत होता. इतरही अनेक कारण होती ज्याला कोसंबी कंटाळून गेले होते. अखेर कोसंबीनी १९६३ साली शांतता परिषदेचा राजीनामा दिला.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’