१९४७ साली अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्षपद डॉ. होमी भाभांकडेच होते. त्यामुळे भाभांवर खूप महत्वाच्या जबाबदार्या आल्या होत्या. १९४९ पासून (कोसंबी परदेशात असताना) भाभांनी अनेक उत्तमोत्तम संशोधकांची संस्थेत भरती केली. यात अमेरिकेतील प्रिन्स्टन येथे हर्मान वाईल या नावाजलेल्या गणितज्ञाचे शिष्य डॉ. कोमारवलू चंद्रशेखरन यांचा समावेश होता. अतिशय बुद्धिवान अशा डॉ. कोमारवलू चंद्रशेखरन यांची संस्थेत गणित विभागात प्रमुख म्हणून भाभांनी नेमणूक केली. मनुष्यबळ वाढल्याने पेडर रोडवरील केनिलवर्थ बंगल्यातील जागा संस्थेसाठी अपुरी पडू लागली होती. त्यामुळे भाभांनी संस्थेसाठी गेट वे ऑफ इंडिया शेजारच्या ओल्ड यॉट क्लबची मोठी इमारत घेतली व संस्था तेथे हलवली. कोसंबी आपला विदेश दौरा पूर्ण करून आले तेव्हा संस्थेच्या नव्या इमारतीत रुजू झाले. त्यांच्या अनुपस्थितीत झालेले बदल त्यांना दिसून आले. साहजिकच त्यांचा अहंकार दुखावला गेला. या घटनेमुळे भाभा व कोसंबी यांच्यात ताण निर्माण होण्यास सुरुवात झाली.
![]() |
डी.डी. कोसंबी व डॉ. होमी भाभा यांच्यात वैचारिक मतभेद |
एकीकडे भाभा अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष असल्याने त्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. तर दुसरीकडे कोसंबी जागतिक शांतता परिषदेत सहभागी होऊन अणुकार्यक्रमाच्या विरोधात उभे राहिले होते. भारतात ऊर्जानिर्मिती करण्यासाठी ते सौरऊर्जेचा पुरस्कार करू लागले. यामुळे परिस्थिती जास्तच चिघळत गेली. भाभा व कोसंबी एकमेकांशी बोलणे तर सोडाच साधी नजरानजर देखील करेनासे झाले. दोघेही आपापल्या तत्वांशी एकनिष्ठ असल्यामुळे कुणीही माघार घ्यायला तयार नव्हते.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एक ऊर्जास्त्रोत म्हणून अणुशक्तीला कोसंबींनी पूर्णतः विरोध केला नाही. काही विशिष्ट परिस्थितीत अणूऊर्जेचा वापर फायद्याचा ठरू शकतो असेदेखील त्यांनी सांगून ठेवले आहे. परंतु, अणूऊर्जा केंद्र ही अत्यंत दुर्गम भागात, कमीत कमी वस्तीच्या ठिकाणी उभारायला हवीत असे ते म्हणत
१९५९ साली 'जर्नल ऑफ इंडियन सोसायटी अॅग्रीकल्चरल स्टॅटीस्टीक्स' या संशोधन पत्रिकेत कोसंबींचा 'अॅन अॅप्लीकेशन ऑफ स्टोकॅस्टिक कॉन्व्हर्जन' हा संशोधन लेख प्रसिद्ध झाला होता. आपल्या या लेखामध्ये कोसंबी 'रिमान हायपोथीसिस यातून सिद्ध होऊ शकेल' असे लिहून गेले. 'रिमान हायपोथीसिस' हा एक गणितातील कुटप्रश्न आहे. तो सिद्ध करण्याचे अनेक गणितज्ञांनी प्रयत्न केले पण त्यात कधीही कुणाला यश मिळाले नव्हते. कोसंबींनी ज्या नियतकालिकात लेख लिहिला ते गणित विषयावरचे नव्हतेच. ते शेतीविषयीचे सांख्यिकी नियतकालिक होते. लेखाचा मूळ विषयही वेगळाच होता. परंतु तरीही या गोष्टीवरून टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांच्याविरुद्ध वादळ उठवले गेले. खरं तर कोसंबींनी काही गृहितकांच्या आधारावर रिमान हायपोथीसिस सिद्ध होऊ शकेल असे म्हटले होते. परंतु, त्या गृहितकांचा उल्लेख करायचे ते विसरुन गेले होते. प्रा. मसानी यांनी तर म्हटले की, कोसंबी रिमान हायपोथीसिस सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले, परंतु त्यांच्या लेखात असणार्या उपयुक्त नवीन कल्पनांकडे दुर्दैवाने कुणीही लक्ष दिले नाही.
रीमान हायपोथीसिस प्रकरणामुळे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कोसंबींच्या विरोधकांना कोसंबींना लक्ष करण्यासाठी एक निमित्तच मिळाले. कोसंबींच्या अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते असे बोलले जाऊ लागले. भाभांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले परंतु, संस्थेने त्वरित कोसंबींवर कोणतीही कारवाई केली नाही. संस्थेतील वातावरणात कोसंबी हळूहळू एकटे पडत गेले. रोज पुण्याहून मुंबईला संस्थेत जायचे ते टाळू लागले. आठवड्यातून तीनच दिवस ते संस्थेत जाऊ लागले. खरंतर तीन दिवस जाणेही त्यांना जड जाऊ लागले होते. १९६२ साली कोसंबींच्या वयाची ५५ वर्षे पूर्ण होणार होती. ५५ हे त्यावेळी सरकारी निवृत्तीचे वय होते. ती संधी साधून संस्थेच्या संचालक मंडळाने त्यांची फेरनेमणुक केली नाही. कोसंबी तेव्हा पुण्यात उन्हाळ्याच्या सुटीवर होते. भाभांनी त्यांना पत्र लिहून संस्थेत येण्याची आवश्यकता नाही असे कळवले. याच दरम्यान संस्था नेव्हीनगर इथल्या नवीन वास्तूत हलवण्यात आली. परंतु त्याची साधी माहितीही त्यांना कुणी दिली नाही. कोसंबींनी तब्बल १७ वर्षं टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. संस्थेच्या उभारणीत स्थापनेपासून प्रचंड कष्ट केलेल्या, भाभांपाठोपाठ स्थान असलेल्या कोसंबींना संस्थेने सन्मानाने निरोप दिला नाही.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’