दामोदर कोसंबींनी पंडित कृष्णमूर्ती शर्मा यांच्याबरोबर 'शतकत्रयी' व राम आचार्य यांच्याबरोबर 'सुभाषित त्रिशती' ही भर्तृहरीवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध केली. आचार्य मुनी जिनविजयजी यांनी, 'पूर्ण वेळ संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करणार्या विद्वानांनी या तरुण गणितज्ञापासून स्फूर्ती घ्यावी' अशा शब्दात कोसंबींचे कौतुक केले.
हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृतचे प्रा. डॅनिएल इंगाल्स यांनी कोसंबींच्या शतकत्रयी ग्रंथाने प्रभावित होऊन 'सुभाषितरत्नकोश' या ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीचे काम त्यांच्यावर सोपवले. संस्कृत भाषेतील लिखित स्वरुपातील सर्वात प्राचीन असा हा ग्रंथ आहे. यात सहसंपादक म्हणून फर्ग्युसन कॉलेजमधील कोसंबींचे मित्र प्रा. गोखले यांनीही काम केले. हा ग्रंथ अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातर्फे प्रकाशित झाला.
दामोदर कोसंबी यांचा 'भारतीय इतिहासाभ्यासाची ओळख' हा ग्रंथ मुंबईतील पॉप्युलर प्रकाशनाकडून प्रकाशित झाला. १५ वर्षं त्यांनी भारतीय इतिहासावर जे संशोधन केले होते, लेख लिहिले होते त्याचा परिणाम म्हणजे हे पुस्तक होते. लवकरच एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून याला सर्वत्र मान्यता मिळाली. प्रस्थापितांना तर या ग्रंथाची दखल घ्यावीच लागली. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जे. डी. बर्नाल यांनी 'कोसंबींच्या या पुस्तकामुळे प्रथमच भारतीय इतिहासाची संगती लागण्यास सुरुवात झाली' असे म्हटले. कोसंबींचे म्हणणे होते की भारतीय समाज किंवा भारतीय इतिहास हा प्राचीन संस्कृत ग्रंथातून कळत नाही. संस्कृत ग्रंथातून राजे, धनिक तसेच राजाश्रय मिळालेल्या प्रस्थापित वर्गाबद्दल समजते परंतु, खेडोपाडी राहणारा गोरगरीब, कष्टकरी शेतकरी याबद्दल काहीच समजत नाही. यावर त्यांनी एक उपाय शोधला. इतिहास शोधण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या रूढी, परंपरा, दैवतं, लोककथा, लोकगीतं यांचा बारकाईने अभ्यास करून त्यात दडलेला अस्सल भारताचा इतिहास शोधायचा असे त्यांनी ठरवले. कोसंबींना भारताच्या प्राचीन इतिहासावर खूप मोठं संशोधन करायचं होतं. संशोधकांची पथके तयार करून त्यांना देशाच्या विविध भागात पाठवून बारकाईने सर्वेक्षण करायचं अशी त्यांची योजना होती. पण वास्तविकदृष्ट्या हे सगळं करणं शक्य नव्हते. त्यांचे संशोधन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले. बर्याच जणांनी कोसंबींच्या या पद्धतीला मार्क्सवादी म्हटले.
त्यानंतर कोसंबींची 'पुराणकथा आणि वास्तवता' व 'प्राचीन भारतीय संस्कृती' ही अतिशय महत्वाची पुस्तक प्रकाशित झाली. त्यांचे आणखी एक अतिशय महत्वाचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे नाव 'कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया इन हिस्टॉरीकल आउटलाईन' असे होते. लंडनमधील 'रुटलेज अँड केगन पॉल' या प्रकाशन संस्थेतर्फे ते प्रकाशित करण्यात आले. हा ग्रंथ खूप लोकप्रिय झाला. युरोपमधील जर्मन, फ्रेंच या भाषांसह अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’