टाटा मूलभूत संशोधन संस्थेत फेरनेमणूक न झाल्यामुळे कोसंबींनी वाचन, लेखन, संशोधनाच्या कामी स्वतःला झोकून दिले. दख्खनच्या पठारावर त्यांनी मनसोक्त भटकंती केली. ग्रामीण भागांना भेटी देणे, गावकरी मंडळींकडून विविध प्रकारची माहिती गोळा करणे, आडरानात पडलेल्या शिळांवरील चिन्हांचा अभ्यास करणे त्यांच्या नोंदी घेणे अशी त्यांची पुरेपूर अभ्यासपूर्ण भटकंती सतत चालू असे. त्यांच्या या भटकंतीत त्यांच्यासोबत काही विदेशी विद्यार्थी असत. त्यात जर्मनीचा गुंथर सोन्थायमर, अमेरिकन पी. फ्रॅंकलीन त्याचबरोबर जपानसह विविध देशातील तरुण असत. यातील बहुतेक विद्यार्थी हे लंडनमधील प्राच्यविद्या आभास संस्थेशी संबंधित होते. भारतातील संस्थानिक घराण्याशी संबंधित दिव्यभानू सिंह चावडा व विष्णू सिसोदिया हे दोघे त्यांच्यासोबत असायचे. त्यांच्यामुळे कोसंबींना भटकंतीसाठी जीप व मोटार उपलब्ध होत असे. यातील जर्मनीचे गुंथर सोन्थायमर हे पुढे जागतिक किर्तीचे इतिहासकार झाले.
![]() |
प्रा. डी. डी. कोसंबी |
त्यावेळी पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना झाली होती. मेजर जनरल हबीबुल्ला हे तिथले पहिले संचालक होते. ते हौशी प्राच्यविद्या संशोधक असल्याने प्रबोधिनीमध्ये त्यांनी आर्किओलॉजिकल सोसायटीची स्थापना केली होती. कोसंबी तेथील विद्यार्थ्यांना व्याख्याने देत तसेच आसपासच्या प्रदेशाचे ऐतिहसिकदृष्ट्या निरीक्षण करण्यासाठी घेऊन जात. विद्यार्थ्यांकडून त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळत असे. हबीबुल्ला यांनी सांगितलेला त्यातील एक अनुभव खूपच रोचक आहे. कोसंबी यांच्या तर्कानुसार बौद्ध लेणी म्हणजे प्राचीन काळी प्रवासी व्यापार्यांसाठीची राहण्याची जागा होती. म्हणजे दिवसभराचा प्रवास संपला की मार्गात कुठेतरी लेणी असायला हवीत. रायगड जिल्ह्यातील जंजीरा येथील खाडीमध्ये प्राचीन काली एक बंदर होते. तिथून कार्ल्याच्या लेण्यापर्यंतचे पायी प्रवासाचे अंतर दोन दिवसांचे होत होते. त्यामुळे मध्ये कुठेतरी लेणी असायला हवीत असा कोसंबींचा कयास होता. कोसंबींची विद्यार्थ्यांसोबत घनदाट जंगलातून शोधमोहीम सुरू झाली. आश्चर्य म्हणजे कोसंबी यांच्या तर्कानुसार साधारण एक दिवसाच्याच पायी प्रवास अंतरावर त्यांना लेणी (करंभळ्याची) सापडली. करंभळ्याच्या लेण्यांत कोसंबींना काही ब्राम्ही शिलालेख आढळले होते. त्या शिलालेखांवर काय लिहिले आहे ते पाहण्यासाठी त्यांनी तो शिलालेख प्लास्टर वर छापून घेतला. हे तंत्र त्यांनी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनाही शिकवले. यापूर्वी कोसंबींनी कार्ल्याच्या लेण्यांचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्या ठिकाणचेही शिलालेख वाचणे त्यांना शक्य झाले होते. मेजर जनरल हबीबुल्ला व प्रबोधिनीचे विद्यार्थी कोसंबींच्या या संशोधन पद्धतीमुळे प्रचंड प्रभावित झाले होते. कोसंबींचे कौतुक करताना एकदा मेजर जनरल हबीबुल्ला म्हणाले, 'गणित वा इतिहासतज्ञ होण्याऐवजी कोसंबी जर लष्करात आले असते तर ते एक उत्तम सेनानी असते'.
कोसंबींनी पुढे उत्तर भारताचा दौरा केला. पाटणा विद्यापीठातील सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक प्रा. आर. एस. शर्मा यांनी कोसंबींना विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण दिले. तिथे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कोसंबींकडून मार्गदर्शन मिळण्याचे भाग्य लाभले. पुढच्या एका उत्तरेच्या दौर्यात कोसंबींना ज्या ठिकाणी त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली त्या बनारस हिंदू विद्यापीठ व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाकडून आमंत्रण मिळाले. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील कोसंबींचे चाहते असणारे ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्रा. नुरूल हसन त्याचबरोबर तरुण इतिहास संशोधक इरफान हबीब, गौड यांच्याशी कोसंबींच्या गाठीभेटी झाल्या.
१९६३ ते १९६५ या काळात कोसंबींचे संख्याशास्त्र व नंबर थिअरी यावरील एकूण पाच लेख प्रसिद्ध झाले. त्यापैकी तीन लेख त्यांनी टोपणनाव वापरुन लिहिले. त्यासाठी त्यांनी S. Duckray असे युरोपियन वाटणारे नाव वापरले. त्याचा मराठीतून उच्चार एस. डुकरे असा होतो. गंमत म्हणजे लेखाच्या शेवटी त्यांनी 'हा लेख प्रा. डी. डी. कोसंबी यांच्या मदतीशिवाय तयार झाला नसता' असेही लिहिले. कोसंबी हे असे कडवट विनोदीही होते.
१९६५ साली टाइम्स ऑफ इंडिया मध्ये दामोदर कोसंबी यांचा 'अशोक स्तंभ : बनारसचे कोडे' हा लेख प्रसिद्ध झाला. पुढे टाइम्सच्या वार्षिकात 'ऐतिहासिक कृष्ण' हा लेख प्रसिद्ध झाला. कोसंबींनी 'नंदीचे वशिंड' ही एक लहान मुलांसाठी एक कथा लिहिली होती. त्याचेही पुस्तक प्रकाशित व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती. अमेरिकेतील संशोधक जे. एल. मॅसन यांच्याबरोबर भासाच्या 'अविमारक' या काव्याची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याचे काम प्रगतीपथावर होते तर 'प्राइम नंबर' वर कोसंबींनी केलेल्या कामाचे हस्तलिखीत पूर्ण झाले होते.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- संस्कृतिभाष्यकार डी.डी. कोसंबी, अशोक चौसाळकर, श्री गंधर्व-वेद प्रकाशन २०१०
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’