विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ ही संस्था अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केली. मिशनच्या अध्यक्षपदी सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्षपदी शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित तर मिशनच्या जनरल सेक्रेटरीपदी स्वतः विठ्ठल रामजी शिंदे राहिले. मिशनच्या कामासाठी विठ्ठलरावांनी आपल्या बहिणीला जनाक्कांना पनवेलवरून मुंबईस बोलवून घेतले. मिशनच्या कामात सहभागी होण्यासाठी त्यांनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिका या पदाचा राजीनामा दिला होता. प्रार्थनासमाजाची कामे जसे की भजन करणे, गोरगरिबांची विचारपूस करणे अशी कामे त्या पूर्वीही करत असत. विठ्ठलरावांनी जनाक्कांना मिशनची कार्यवाह म्हणून नेमले. त्यांचे आई-वडीलही मिशनच्या कामात सहभागी झाले.
![]() |
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे |
मिशनचे काम जोमाने सुरू झाले होते. दर शनिवारी व्याख्याने व कीर्तने होत. रविवारी सकाळी धर्मशिक्षणाचे वर्ग व सायंकाळी उपासना चाले. विठ्ठलराव स्वतः व भगिनी जनाक्का ही कामे करत. पाहता पाहता सर्वत्र मिशनचीच चर्चा होऊ लागली. वर्तमानपत्रांनीही दखल घेऊन ते मिशनच्या कार्याबद्दल छापू लागले.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मप्रचाराचे कार्य मुंबईत जोमाने सुरू होते. मुंबईबाहेरचीही निमंत्रणे त्यांना येत होती. अहमदनगर, पुणे, सातारा या महाराष्ट्रातील ठिकाणी, गुजरातमध्ये नवसारी, अहमदाबाद, बडोदा येथे तर मध्य प्रदेशात इंदूर येथे प्रार्थनासमाज होते. विठ्ठलरावांना सगळीकडे जावे लागत असे. अनेकदा जनाक्काही त्यांच्यासोबत दौऱ्यावर जात.
१९०७ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी भगिनी जनाक्कांसमवेत कर्नाटकातील मंगळूर येथे भेट दिली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी खूप लोक कडक उन्हातही त्यांची वाट पाहत होते. त्यांनी केलेले स्वागत पाहून विठ्ठलरावांना भरून आले. तिथल्या प्रेमळ वातावरणात विठ्ठलराव व भगिनी जनाक्का महिनाभर राहिले व धर्मप्रसाराचे कार्य केले.
त्यावेळी मुंबईत मलबारी व दयाराम गिडूमल नावाचे दोन अतिशय दानशूर गृहस्थ होते. चांगल्या कार्यासाठी ही मंडळी कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आर्थिक सहाय्य करीत. विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्या कार्याबद्दल त्यांना माहिती झालेली होती. दयाराम गिडूमल यांच्या मदतीने मिशनच्या मध्यवर्ती आश्रमामध्ये ‘निराश्रित सेवासदन’ नावाने अस्पृश्य समाजातील स्त्रियांसाठी सदन सुरू करण्यात आले. यासाठी दयाराम यांनी महिना १०० रुपये मदत दिली.
अस्पृश्यवर्गातील मुलांना नियमित शाळेत जाण्याची सवय नसे. मुलांच्या पालकांनाही त्याची फिकीर नसे. मग या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून निराश्रित सेवासदनातील स्त्रीप्रचारक घरोघरी जाऊन नियमित शाळेत येण्याचे महत्व पटवून देत. परंतु लोकांना या स्त्रिया ख्रिश्चन धर्मप्रसारक असल्याची शंका येत असे. मग यावर उपाय म्हणून स्त्रीप्रचारक रामायण, महाभारत अशा हिंदू धर्मग्रंथांचे वाचन करत. सदनातील स्त्रियांना आजारी व्यक्तींची सेवा करणे, बाळंतपणात मदत करणे याविषयीचे शिक्षण दिले गेले. भगिनी जनाक्का स्वतः निराश्रित सेवासदनातील घरगुती कामे करत असत. जनाक्कांनी तर ह्या सर्व कामांसाठी ‘निराश्रित महिला समाज’ ही संस्थाच सुरू केली.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई