१९०० साली वासुदेवराव सुखटणकर यांनी आपल्या कुटुंबियांना काही दिवस जमखंडीस ठेवले होते. त्यावेळी त्यांची बहीण शांता हिला क्षयाची बाधा झाली होती. त्यावेळी चंद्राक्काही तिची सेवा करत असल्यामुळे त्यांनाही क्षयाची बाधा झाली. त्यांना हवापालटासाठी म्हणून खंडाळा, अहमदनगर अशा ठिकाणी नेले परंतु काही फरक पडला नाही. अखेर ३ फेब्रुवारी १९०७ रोजी चंद्राक्का निर्वतल्या.
भगिनी जनाक्का शिंदे |
जनाक्का हुजुरपागेत सहावीत होत्या. त्या अचानक आजारी पडल्या. खोकून बेजार झाल्या होत्या. त्यावेळी चंद्राक्का नुकत्याच निर्वतल्या होत्या. शांता सुखटणकरशी जनाक्कांचाही संपर्क आल्याने त्यांनाही क्षयाची बाधा झाली असल्याची शंका व भीती निर्माण झाली. परंतु डॉक्टरांनी निदान केल्यानंतर त्यांना क्षयाची नसून प्लुरसीची बाधा झाल्याचे समजले. या आजारात जनाक्कांना तीन महीने अंथरूणात राहावे लागले. परीक्षा जवळ आली होती. व्यवस्थित परीक्षा पास झालो नाही तर शिष्यवृत्ती बंद होईल या भीतीने जनाक्कांनी आजारपणात तसाच अभ्यास केला व सहावीची परीक्षा त्या उत्तमरीत्या पास झाल्या. पण काही दिवसांनी त्या पुन्हा आजारी पडल्या. आईवडील व बंधू विठ्ठलराव नको म्हणत असतानाही त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला. वाडिया डॉक्टरांनी जनाक्कांची फुफ्फुसे कमजोर झाली असून त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असल्याने अशा परिस्थितीत त्यांना अभ्यास करू देणे योग्य होणार नाही असे सांगितले. डॉक्टर मोदी यांनी तर जनाक्कांची शाळा बंद करण्याचा सल्ला दिला.
चंद्राक्का यांच्या निधनाने आधीच सर्वजण दुःखात होते. आता जनाक्कांच्या बाबतीत धोका पत्करण्याची कुणाचीही तयारी नव्हती. अशा तऱ्हेने जनाक्कांचे शिक्षण कायमचे थांबवण्यात झाले. पुढे जेव्हा त्या आजारातून बऱ्या झाल्या तेव्हा विठ्ठलरावांबरोबर अहमदनगर, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी धर्मप्रचारासाठी जाऊ लागल्या. धर्मप्रचाराचे कार्य कसे चालते हे त्यांनी जवळून पाहिले. प्रार्थनासमाजातील कित्येकांच्या ओळखी झाल्या. डॉ. रा. गो. भांडारकर, सर नारायण चंदावरकर अशा दिग्गजांचे त्यांना जवळून दर्शन झाले.
बलभीम केसकर नावाचे विठ्ठलरावांचे एक जिवलग मित्र होते. ते प्रार्थनासमाजाचे एक निष्ठावंत सदस्यही होते. मुंबईची हवा कोंदट व जनाक्कांच्या प्रकृतीला अनुकूल नसल्याने त्यांनी पनवेल येथे म्युनिसिपल शिक्षिकेची एक जागा मोकळी असल्याने त्यांनी तिथे जावे असे सुचवले. जनाक्कांनी तयारी दर्शवली. विठ्ठलरावांनीही त्वरित होकार दिला. पनवेल येथील मामलेदार श्री. तेंडुलकर यांनी जनाक्कांची पात्रता लक्षात घेऊन मुख्याध्यापिकेच्या जागेवर महिना २५ रुपये पगारावर शिक्षिका म्हणून त्यांची नियुक्ती केली. शाळेत एकूण ६० मुली शिकत होत्या. शाळेच्या जवळच जनाक्कांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. जनाक्कांना सोबत म्हणून त्यांचे वडील रामजीबाबा नातू प्रतापसह राहत होते. पनवेलमध्ये जनाक्का एका ओळखीच्या मुस्लिम कुटुंबाच्या घरी जात असत. त्यांच्या घरातील एका लग्नकार्यासही त्या उपस्थित राहिल्या होत्या. यामुळे पनवेलमधील सनातनी मंडळी त्यांच्यावर राग धरून होती. ही गोष्ट विठ्ठलरावांना समजली. पनवेलमध्ये जाऊन एखादे सुधारणावादी व्याख्यान द्यावे म्हणजे तिथल्या सनातनी मंडळींचा आपल्या बहिणीवरील राग कमी होईल असे वाटून ते पनवेलला गेले. परंतु त्यांच्या अस्पृश्यतानिवारणासंबंधी व्याख्यानाने तिथल्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. उलट अजून विरोध वाढला. त्यात रामजीबाबांनी लष्करातून पेन्शन घेतलेल्या एका महार समाजातील व्यक्तीस चहासाठी म्हणून घरी बोलावले. त्यामुळे तर पनवेलमधील सनातन मंडळी भडकलीच. त्यांनी जनाक्कांच्या घराला वाळीत टाकले. त्यातून अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. रामजीबाबांना केस कापण्यासाठी साधा न्हावीसुद्धा मिळेना. त्यासाठी त्यांना मुंबईस जावे लागले.
जनाक्कांनी आपल्या वडिलांना त्रास होत असल्याचे विठ्ठलरावांना कळवताच त्यांनी मुंबईस निघून येण्यास सांगितले. ‘तू तिथे नोकरी करणे गरजेचे नाही. मिशनच्या कामात तुझी फार आवश्यकता आहे. अस्पृश्यवर्गातील स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे मोठे कार्य तुला करावे लागणार आहे.’ असे त्यांनी जनाक्कांना सांगितले.
जनाक्कांनी विठ्ठलरावांचे पत्र म्युनिसिपल बोर्डाचे चेअरमन श्री. तेंडुलकर यांना दाखवले. त्यांनी वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. त्या संपल्या की मग नोकरी सोडावी असे सांगितले. असे केल्यामुळे इथल्या लोकांना तुम्ही घाबरून नोकरी सोडली असेही वाटणार नाही. जनाक्कांना त्यांचे म्हणणे पटले. बंधू विठ्ठलरावांना त्यांनी तसे कळवले व आपले शाळेतील काम सुरू ठेवले.
शाळेच्या वार्षिक परीक्षा झाल्या. सर्व मुलींच्या उत्तरपत्रिका तपासायला गावातील एका मुख्याध्यापकांकडे गेल्या. हे मुख्याध्यापक जनाक्कांच्या विरोधातील होते. तरीदेखील सर्व मुली उत्तमरीत्या पास झाल्या. जनाक्कांना खूप आनंद झाला. अखेर जनाक्का मुंबईस जाण्यासाठी निघाल्या. पावसाळा असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद होती. अशा वेळी जनाक्कांच्या विरोधात असणाऱ्या या मुख्याध्यापकांनी त्यांना नावेतून सोबत करून सुखरूपपणे मुंबईस पोहोचवले.
अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणात जनाक्कांनी वर्षभर राहून शिक्षिका म्हणून आपले कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडले. हे त्यांना मिळालेले एक मोठे यश होते.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई