विठ्ठलरावांनी आपल्या इतर दोन बहिणी तान्याक्का व चंद्राक्का यांनाही हुजुरपागेत शिक्षणासाठी ठेवले होते तर त्यांचे धाकटे बंधू एकनाथराव हे विठ्ठलरावांचे मित्र गोविंदराव सासने यांच्याकडे कोल्हापुरात शिक्षण घेत होते.
विठ्ठल रामजी शिंदे हे विलायतेत धर्मशिक्षण घेऊन ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबईत दाखल झाले.
विलायतेहून आल्यावर विठ्ठलरावांनी धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली. १५ नोहेंबर १९०३ रोजी न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत प्रार्थनासमाजाची सभा भरून सभेत सर्वानुमते विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून नेमण्यात आले.
![]() |
भगिनी जनाक्का शिंदे |
धर्मप्रचाराच्या कार्यासाठी विठ्ठलरावांचे अनेक ठिकाणी दौरे होत होते. एके दिवशी विठ्ठलराव धर्मप्रचारासाठी आपल्या गावी जमखंडी येथे पोहोचले. विठ्ठलरावांच्या घरी पूर्वीपासूनच धार्मिक वातावरण होते. त्यांच्या घरी त्यांचे आईवडील ब्राम्होपासना करत असत. विठ्ठलरावांनी गावात व्याख्यानमाला भरवली होती. परंतु गावातील जुन्या विचाराच्या लोकांना नवे सुधारकी विचार पचनी पडेनात. हळूहळू त्यांचा विरोध वाढू लागला. गावातले वातावरण चिघळून त्याला काहीसे हिंसक रूप प्राप्त झाले. रात्रीच्या वेळी दंगलीचा एक मोर्चा रामजीबाबांच्या घराच्या दिशेने आला. याचा इतका गंभीर परिणाम झाला की विठ्ठलरावांनी आपल्या कुटुंबीयांसह गावच सोडण्याचे ठरवले. त्यावेळी जनाक्का व चंद्राक्का या जमखंडीतच होत्या. त्या पुण्याला शिक्षणास असल्याने त्यांना पुण्यात सोडून विठ्ठलराव इतर कुटुंबियांसह १९०४ च्या पावसाळ्यात मुंबईस आले. प्रार्थनासमाजाच्या राममोहन आश्रमात विठ्ठलरावांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
१९०५ साली प्रार्थनासमाजाचा ३८ वा वार्षिक उत्सव सुरू होता. या काळात प्रार्थनासमाजाच्या उपासना पद्धतीत काही बदल घडून आले. प्रार्थनासमाजाच्या साप्ताहिक उपासनेपूर्वी अर्धा तास भजन करण्याची पद्धत सुरू झाली. कलकत्ता ब्राम्ह समाजाचे गायक प्रबोधकुमार दत्त हे कलकत्त्याहून मुंबईत शिक्षणासाठी आले होते. ते आपल्या सुंदर आवाजात भजन म्हणत. जनाक्कांनी त्यांच्याकडून बंगाली भाषेबरोबर संगीताचीही माहिती करून घेतली व त्याचा आपल्या संगीतात प्रसार केला.
१९०५ या वर्षी विठ्ठलरावांनी पुण्यात जास्त काळ व्यतीत केला. यावेळी ते पुण्याच्या प्रार्थनासमाजाच्या कामात मदत करू लागले. त्यांनी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. शाळेच्या उद्घाटन समारंभास जनाक्का, तान्याक्का या विठ्ठलरावांच्या बहिणी हुजुरपागेतील त्यांच्या बऱ्याच मैत्रिणींसह उपस्थित होत्या. सर्वांना भिजवलेली डाळ व उसाचा रस वाटण्यात आला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असल्यापासून विठ्ठलरावांना अस्पृश्यवर्गासाठी काहीतरी कार्य करण्याची इच्छा होती. ती त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्याचबरोबर मीठगंज हे महात्मा फुले यांचे स्थान असल्यामुळे इथे अस्पृश्यांसाठी शाळा उघडून त्यांचा वारसा चालवण्याचे महत्वपूर्ण कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई