पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रस्थान असल्याने तेथे काहीतरी सोय होईल असा विचार करून धर्मानंद पुण्यास पोहोचले. दिवसा काम करून उदरनिर्वाह करावा व शास्त्र्यांजवळ संस्कृत शिकावे असा त्यांचा मानस होता. पुण्यात त्यांची भेट डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याशी झाली. धर्मानंदांनी त्यांना आपली सर्व हकिगत सांगितली. काही दिवस त्यांची तात्पुरती सोय झाली. परंतु, प्रार्थना समाजाचे सभासद होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू असे डॉ. भांडारकरांनी त्यांना सांगितले. त्यावर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन केल्याशिवाय आपणास कोणत्याही संस्थेचा सभासद होण्याची इच्छा नाही असे धर्मानंदांनी स्पष्ट केले. चर्चेत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी नेपाळ किंवा सिलोनला जावे लागेल असे डॉ. भांडारकरांनी सांगितल्यामुळे धर्मानंदांनी पुणे सोडून उत्तरेस जाण्याचे ठरवले.
धर्मानंद कोसंबी |
पुण्याहून निघताना धर्मानंदांनी दोन निश्चय केले. एक, शरीरात प्राण असेपर्यंत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दोन, जर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन करण्यात यश मिळाले तर त्याचा महाराष्ट्रवासीयांना फायदा करून द्यायचा. धर्मानंद पुण्याहून निघून ग्वाल्हेरमार्गे काशीला पोहोचले. काशीमध्ये त्यांची संस्कृत अध्ययन करण्याची सोय लागली. राहण्याची व्यवस्था मठात झाली तर जेवणासाठी त्यांना अन्नछत्राचा आधार घ्यावा लागला. प्रचंड हालअपेष्टा सोसत सव्वा वर्ष त्यांनी तिथे संस्कृतचे अध्ययन केले.
त्यानंतर बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन करण्याच्या उद्देशाने धर्मानंदांनी काशी सोडली व ते पुढे नेपाळला गेले. परंतु नेपाळमधील बौद्ध धर्माची अत्यंत खेदजनक स्थिती पाहून त्यांचे मन उद्विग्न झाले. तिथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे नेपाळ सोडून ते पुढे बुद्धगयेला गेले. परंतु तिथेही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तिथे एका भिक्षुने त्यांना सिलोनला गेल्यास पाली भाषा व बौद्ध धर्माचे ज्ञान होईल असे सांगितले. त्यावरून धर्मानंदांनी सिलोनला जायचे ठरवले. बुद्धगयेहून ते प्रथम कलकत्त्याला गेले. तिथे आवश्यक ती सर्व तयारी करून मद्रास, तुतीकोरीन असा प्रवास करत ते सिलोनला पोहोचले. सिलोनमधील कोलंबोजवळ असलेल्या 'मालिगाकंद' येथे महास्थवीर श्रीसुमंगलाचार्य यांनी स्थापन केलेल्या 'विद्योदय विद्यालय' नावाच्या विहारात ते पाली ग्रंथांचा अभ्यास करू लागले. तिथे त्यांनी श्रामणेराची दीक्षा घेतली. बौद्ध धर्मात आजन्म संन्यासव्रत पाळावे असा नियम नाही. मात्र भिक्षू असेपर्यंत संघाचे नियम पाळावे लागतात. श्रामणेराला फक्त दहा नियम पाळावे लागतात. आपल्या सिलोनमधील वास्तव्यात धर्मानंदांनी पाली भाषा व बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवले. इंग्रजी भाषेचेही धडे त्यांनी घेतले. सिलोनमध्ये खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याकारणाने त्यांची तब्येत बिघडू लागली होती. त्यामुळे एक वर्ष सिलोनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी सिलोन सोडले व ते भारतात मद्रास येथे आले.
धर्मानंद मद्रास येथे सहा महिने राहिले. त्यानंतर बौद्ध धर्माचे अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ते ब्रम्हदेशात गेले. तेथील विहारांमध्ये राहून त्यांनी ध्यानमार्गाचा अभ्यास केला. धर्मानंद श्रामणेर होते. परंतु, त्यांचे पाली भाषेचे ज्ञान पाहून चुंडो चाउन येथील मुख्य आचार्य कुमार स्थवीर यांना धर्मानंदांचे श्रामणेर राहणे योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी धर्मानंदांना रीतसर भिक्षू बनवले. ब्रम्हदेशातही तिथले अन्न धर्मानंदांना मानवत नव्हते. त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागल्याने कुशीनारा येथे जाण्याचा विचार करून ते भारतात कलकत्त्याला आले.
कलकत्त्यात आल्यावर धर्मानंदांनी कुशीनारा, बुद्धगया, राजगृह, श्रावस्ती, कपिलवस्तू, लुंबिनीवन अशी बौद्धक्षेत्रांची यात्रा केली. बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनीवन, बुद्धास ज्ञानप्राप्ती झालेले स्थान बुद्धगया, बुद्धाने पहिला उपदेश केलेले स्थान सारनाथ, व महापरिनिर्वाणस्थान कुशीनारा ही चार क्षेत्रे बौद्ध लोक अत्यंत पवित्र मानतात. बौद्धक्षेत्रांची यात्रा केल्यानंतर धर्मानंद पुन्हा ब्रम्हदेशास गेले. तिथे मंडाले शहराजवळील विविध विहारांमध्ये राहून बौद्ध धर्मग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास करून एक वर्षानंतर ते परत भारतात कलकत्त्याला आले. बौद्ध धर्मातील भिक्षूंसाठीचे परंपरागत नियम फारच कडक होते. बरोबर पैसे न बाळगणे, आपले अन्न स्वतः न शिजवता विशिष्ट वेळीच भिक्षा मागून जेवण करणे इत्यादी. त्यावेळच्या परिस्थितीत हे नियम पाळले जाणे अशक्य होते. काही स्थवीरांचे असेही म्हणणे पडले की, भारतात बौद्ध भिक्षू नसल्याने एकट्या भिक्षुला तेथे विनयाच्या नियमांप्रमाणे राहता येणार नाही. त्यामुळे धर्मानंदांनी भिक्षूकीचा रीतसर त्याग केला. बौद्ध धर्माचे ज्ञान संपादन केल्यावर आता बौद्ध धर्माचा ज्ञानप्रसार करावा अशी धर्मानंदांची इच्छा होती. त्यासाठी पुण्याकडे जावे असा त्यांचा विचार होता. परंतु, कलकत्त्यात पाली भाषेत एम.ए. करण्याची इच्छा असणार्या हरिनाथ दे नावाच्या गृहस्थाची व त्यांची गाठ पडली. हरिनाथ दे यांना 'अठ्ठमालिनी' हा बौद्ध ग्रंथ समजावून हवा होता. त्यामुळे धर्मानंदांचा कलकत्त्यातील मुक्काम वाढला. धर्मानंदांनी हरिनाथ दे यांना अठ्ठमालिनी हा ग्रंथ अतिशय उत्तम प्रकारे समजावून दिला. याच काळात धर्मानंदांची हरिनाथ दे यांच्या घरी मनमोहन घोष यांच्याशी ओळख व मैत्री झाली. मनमोहन घोष हे इंग्रजीचे प्राध्यापक व कवी होते. ते अरविंद घोष व बारींद्र घोष यांचे थोरले बंधु होते.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’