धर्मानंद कोसंबी यांचा जन्म गोव्यातील सासष्ट प्रांतातील 'सांखवाळ' या गावी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव 'आनंदीबाई' व वडिलांचे नाव 'दामोदर' असे होते. पाच मुली व दोन मुले अशा एकूण सात भावंडांपैकी धर्मानंद सर्वात धाकटे होते.
![]() |
धर्मानंद कोसंबी |
प्रकृतीने काहीसे अशक्त परंतु बुद्धीने मात्र अतिशय तल्लख असलेल्या धर्मानंदांचे शिक्षण जेमतेम मराठी पाचवीपर्यंत झालेले होते. पुढे त्यांनी पोर्तुगीज शाळेत जाण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यांना पोर्तुगीज भाषा आवडत नव्हती. संस्कृत भाषा शिकण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु, ती भाषा शिकण्याची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे धर्मानंद शाळा सोडून आपल्या वडिलांना घरच्या कारभारात मदत करू लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी धर्मानंदांचा विवाह प्रतिष्ठित लाड घराण्यातील 'बाळाबाई' यांच्याशी झाला. याच सुमारास त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. निबंधमाला, आगरकरांचे निबंध, वर्तमानपत्रे, मासिके, कादंबर्या असं जे मिळेल ते वाचू लागले. वाचन वाढू लागले तसतसा त्यांच्यामधला असंतोष वाढू लागला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या देशाची सेवा केली तशी सेवा तसं कार्य आपल्या हातून होऊ शकेल काय? आपण काय म्हणून हे जीवन जगत आहोत? अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.
धर्मानंदांना एकदा त्यांच्या घरात तुकाराम गाथेची प्रत मिळाली. त्यातील सुरूवातीचे तुकाराम महाराजांचे चरित्र त्यांनी वाचले. त्याने धर्मानंद खूपच प्रभावित झाले. त्यांनी ते चरित्र अनेकदा वाचले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा तुकोबांनी केवढी प्रगती केली मग मी का शोक करत बसलो आहे? असा प्रश्न त्यांना पडला. त्या चरित्राचा अतिशय सकारात्मक असा परिणाम त्यांच्या मनावर झाला. पुढे काही काळानंतर धर्मानंदांच्या वाचनात गौतम बुद्धाचे छोटेसे चरित्र आले. बुद्धाने कधी त्यांच्या मनाची पकड घेतली हे त्यांनादेखील समजले नाही. मित्रांशी चर्चा करतानाही ते गौतम बुद्धाविषयीच बोलू लागले. बुद्धाविषयी त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा निर्माण झाली.
![]() |
गोतम बुद्ध |
धर्मानंदांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. सतत कर्जाचा बोजा डोक्यावर असे. त्यात त्यांचे वडील एकाएकी पक्षाघाताच्या विकाराने वारले. वडिलांच्या मृत्युने धर्मानंद अतिशय दुःखी झाले. त्यांचे चित्त संसारात लागेनासे झाले. एकीकडे त्यांच्या मनात संसाराविषयी विरक्तीची भावना निर्माण होऊ लागली तर दुसरीकडे बुद्धावरची त्यांची श्रद्धा अधिक दृढ होत चालली. बुद्ध हेच जीवन आहे असे त्यांना वाटू लागले. यापुढील आयुष्यात कसल्याही परिस्थितीत बौद्ध धर्माचे ज्ञान मिळवण्याचा ठाम निश्चय त्यांनी केला. संस्कृतचे गाढे अध्ययन करण्याची तर त्यांची पूर्वीचीच इच्छा होती. तेव्हा गोवा सोडून बाहेर पडण्याचा विचार धर्मानंदांच्या मनात बळावत चालला. यापूर्वी एकूण तीन वेळा त्यांनी घर सोडण्याचा प्रयत्न केला होता. एकदा कोल्हापूर, दुसर्या वेळी गोकर्ण व तिसर्या वेळी मंगळूरपर्यंत ते गेले होते. परंतु, प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणांनी काही दिवसांतच ते घरी परतले होते.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी धर्मानंदांनी एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. गतवर्षीच वडील वारलेले तर पत्नीने नुकताच एका मुलीस जन्म दिलेला. अशा परिस्थितीत पत्नी व सव्वा महिन्याची मुलगी यांचा निरोप घेऊन ज्ञान मिळवण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांनी पुन्हा एकदा घर सोडले. सोबत एक तांब्या, सतरंजी व थोडेसे पैसे घेतले. या वेळी मात्र ज्ञानप्राप्ती करण्याचा त्यांच्या मनाचा पक्का निर्धार होता.
संदर्भ :
- धर्मानंद (आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र), ज. स. सुखठणकर, सुगावा प्रकाशन १९७६
- दामोदर धर्मानंद कोसंबी (जीवन आणि कार्य), चिंतामणी देशमुख, ग्रंथघर प्रकाशन १९९३
- उत्तुंग आणि एकाकी संशोधक डी.डी. कोसंबी, सुधीर पानसे, लोकवाङ्मय प्रकाशन २००७
- २१ ऑगस्ट २०१६ रोजी लोकसत्ता मध्ये प्रकाशित सदानंद भटकळ यांच्या ‘सदानंदयात्रा’ पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख ‘कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!’