१२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून महात्मा गांधीजींची दांडी यात्रा निघाली. ही यात्रा ५ एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचली. मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही यात्रा होती. ६ अप्रिलच्या पहाटे नेहमीची प्रार्थनासभा आटोपल्यानंतर गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी पायी चालत समुद्रकिनाऱ्याकडे जाऊन तयार झालेले मूठभर मीठ उचलून मिठाचा कायदाभंग केला. त्यावेळी इकडे महाराष्ट्रात अप्पांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी व शिरोडे येथे मिठाचा सत्याग्रह झाला. अप्पांनी रत्नागिरी येथे किल्ल्याच्या खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेले मीठ उचलून सत्याग्रह केला. अप्पासाहेबांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह तुरुंगात टाकण्यात आले. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांना सहा महीने ठेवण्यात आले.
रत्नागिरी येथे तुरुंगात अप्पांना समजले की कातकरी समाजाच्या कैद्यांना तुरुंगात भंगीकाम करावे लागते. अप्पांना हे पटले नाही. तुरुंगात भंगीकाम मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून उपोषण सुरू केले. ही बातमी गांधीजींना कळताच त्यांनी अप्पांना एक मोठी तारच केली, “तुझ्या अल्पाशनाची बातमी माझ्या कानावर आली. तुला साथ देणे माझे कर्तव्य असल्याने मीही सरकारला नोटिस देऊन अनशन सुरू केले आहे.” त्यानंतरही अप्पांना हिंडलग्याच्या तुरुंगात तीन महिने सक्तमजुरी, येरवडा जेल येथे सहा महीने व पुनः रत्नागिरीच्या तुरुंगात २ वर्षाची शिक्षा झाली. यावेळी मात्र अप्पांना भंगीकाम देण्यात आले. प्रत्येक दिवशी अप्पांचे १२ वेगवेगळे सवर्ण सहकारी हे काम करत. अप्पा स्वतः दर रविवारी संडास सफाई करत.
१९३३ साली तुरुंगातून सुटल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुका कामिट्यांचे गठन केले. जिल्हा कमिटीही नेमली. पुढे १९३७ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळे तयार झाली तेव्हा काँग्रेसमध्ये भाऊगर्दी सुरू झाली. त्यामुळे अप्पांनी इथून आपण सत्याग्रहात भाग न घेता फक्त रचनात्मक कामातच भाग घेऊ असे गांधीजींना कळवले. याच काळात गांधीजींनी संपूर्ण भारतातील आपल्या निवडक सात अनुयायांचा गांधी सेवा संघ सुरू केला व अप्पांना त्याचे अध्यक्ष केले.